वडाप चालकाच्या मुलाची 'गरुड भरारी'; भारतीय वायुसेनेच्या स्पेशल फोर्समध्ये निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 02:49 PM2020-06-09T14:49:03+5:302020-06-09T14:49:44+5:30
झारखंड, सिक्कीम व महाराष्ट्र या तीनही राज्यांच्या एकत्रित निकालात तेजसने आठवा तर महाराष्ट्रात तिसरा क्रमांक मिळवला आहे.
कागलः तमनाकवाडा (ता.कागल) येथील तेजस रघुनाथ शिंत्रे याची भारतीय वायुसेनेत स्पेशल फोर्समध्ये गरुड कमांडो म्हणून निवड झाली. महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकाने तो या परीक्षेत उत्तीर्ण झाला. रविवारी या परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला.
भारतीय वायुसेनेच्या वतीने जुलै २०१९ मध्ये पुणे येथे निवड परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेस झारखंड, सिक्कीम व महाराष्ट्र या राज्यातून एकुण ३८९ विद्यार्थी बसले होते. यामध्ये झारखंड, सिक्कीम व महाराष्ट्र या तीनही राज्यांच्या एकत्रित निकालात तेजसने आठवा तर महाराष्ट्रात तिसरा क्रमांक मिळवला आहे. लाँकडाऊननंतर त्याचे प्रशिक्षण सुरू होणार आहे.
तेजसची घरची परिस्थिती सर्वसामान्य असून वडील कापशी- बाळेघोल रस्त्यावर रिक्षातून वडापचा व्यवसाय करतात. तेजसचे माध्यमिक शिक्षण सेनापती कापशी येथील रानडे हायस्कूलमध्ये झाले असुन सध्या तो देवचंद महाविद्यालयात बी.एस.सी. च्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. सर्वसामान्य कुटुंबातील तेजने मिळविलेल्या या यशाबद्दल परिसरात कौतुक होत आहे.
हवाई दलातील उच्च पदावर काम करण्यासाठी माझी इच्छा असून त्यासाठी सर्वतोपरी मेहनत घ्यायची तयारी आहे. ही यशाची पहिली पायरी आहे, अशा भावना तेजसनं व्यक्त केल्या. तेजस परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचं समजल्यानंतर घरच्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. मित्रांनी गावात फटाके फोडून आपला आनंद साजरा केला.
आणखी वाचाः
2 चालक, 22 प्रवासी, 4600 किमी अंतर!... 'लाल परी'च्या विक्रमी प्रवासाची 'वादळी' गोष्ट
…अन् ३ वर्षाच्या चिमुरडीला थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फोन लावतात; ऑडिओ क्लीप व्हायरल
जरा हटके! ध्येयवेडा अभियंता झोपडीतून देतो गोरगरीबांना शिक्षणाचे धडे
जे बात!...म्हणून त्यानं सगळी संपत्ती दोन हत्तींच्या नावावर केली, रक्ताचे नातलगच झाले वैरी!