कोल्हापुरात मुंबईतील दोघे बुडाले
By admin | Published: March 15, 2017 04:02 AM2017-03-15T04:02:25+5:302017-03-15T04:02:25+5:30
वडणगे (ता. करवीर जि. कोल्हापूर) येथील पंचगंगा नदीघाटावर पोहण्यास गेलेल्या मुंबईच्या दोघा तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
कोल्हापूर : वडणगे (ता. करवीर जि. कोल्हापूर) येथील पंचगंगा नदीघाटावर पोहण्यास गेलेल्या मुंबईच्या दोघा तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. गणेश बबन खोपकर (१८), मयूर सुरेश बनसोडे (१९, रा. दोघे म्हाडा कॉलनी, सायन, मुंबई) अशी त्यांची नावे आहेत. भाच्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या उमद्या तरुणांच्या मृत्यूमुळे वडणगे गाव शोकसागरात बुडाले.
मयूर बनसोडे यांची बहीण वडणगे येथे आहे. भाच्याच्या वाढदिवसासाठी मयूर व त्याचे दोन मित्र गणेश खोपकर व अक्षय नथुराम गोळे (२१) असे तिघे मुंबईहून आले होते. गेल्या दोन दिवसांपासून ते वडणगे येथील पंचगंगा घाटावर अंघोळीसाठी जात होते. नेहमीप्रमाणे मंगळवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास तिघे पोहण्यास गेले. तिघांनाही पोहता येत नव्हते. पाण्याचा अंदाज न आल्याने खोपकर व बनसोडे दोघेही बुडाले. ते बुडत असल्याचे दिसताच नदीकाठावर असलेल्या अक्षयने मोठ्याने आरडाओरड केली. यावेळी शेजारी असलेल्या लोकांनी घाटावर धाव घेतली. काही धाडसी तरुणांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढले; परंतु त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. (प्रतिनिधी)