कोल्हापूरच्या देवदासीचा मुलगा बनणार ‘महाराष्ट्राचा ढोलकीसम्राट’ ?

By Admin | Published: February 3, 2017 12:41 AM2017-02-03T00:41:59+5:302017-02-03T00:41:59+5:30

रविवारी महाअंतिम फेरी : त्याची बोटे धरायला लावतात ठेका

Kolhapur Devdasi will become the son of 'Dholki Samrat of Maharashtra'? | कोल्हापूरच्या देवदासीचा मुलगा बनणार ‘महाराष्ट्राचा ढोलकीसम्राट’ ?

कोल्हापूरच्या देवदासीचा मुलगा बनणार ‘महाराष्ट्राचा ढोलकीसम्राट’ ?

googlenewsNext

कोल्हापूर : वडील लहानपणी वारलेले.. आई देवदासी... त्यामुळे दारोदारी चौंडकं वाजवत आईच्या मागून जोगवा मागत फिरणारा तो.. परंतु त्याच्या बोटांत जादू आहे... तो ढोलकीच्या तालावर डोलायला लावतो.. भार्गव पुंडलिक कांबळे असे त्याचे नाव. येत्या रविवारी (दि. ५) सह्याद्री वाहिनीवरील ‘ढोलकी झाली बोलकी’ कार्यक्रमात तो महाअंतिम फेरीत भाग घेणार आहे. ही स्पर्धा जिंकण्याची ऊर्मी त्याच्या मनात व बोटांतही आहे. जगण्याशी संघर्ष करत अनंत अडचणींवर मात करून कसे यशस्वी होता येते याचा वस्तुपाठच त्याने घालून दिला आहे.
भार्गव कोल्हापुरातील वारे वसाहत परिसरातील झोपडपट्टीमध्ये राहणारा. तो वर्षाचा असतानाच वडिलांचे छत्र हरपले. उदरनिर्वाह करण्यासाठी आई जोगवा मागायची. त्याआधारे त्यांनी दोन बहिणी व भार्गवचे संगोपन केले. मुलगा वसाहतीत राहिला तर बिघडेल म्हणून त्याला जोगवा मागायला घेऊन जात. आईला मदत व्हावी म्हणून तो चौंडकं शिकला. त्याचे शिक्षण कसेबसे सातवीपर्यंत झाले, परंतु चौंडकं वाजवून आयुष्य घडणार नाही, हे माहीत असलेल्या आईने त्याला तबला शिकायला लावला; परंतु घराचे बांधकाम केल्यावर पैशांअभावी तबल्याचा क्लास बंद करावा लागला. मग तो भजनी मंडळात जाऊन ढोलकी वाजवू लागला. त्यातीलच एका सवंगड्याने त्याला शिवशाहीर राजू राऊत यांची भेट घालून दिली. राऊत यांनी भार्गवची दोन वर्षांची फी भरून त्यास महेश देसाई यांच्याकडे तबला शिकायला पाठविले. राऊत यांना तो शाहिरी कार्यक्रमातही साथ करू लागला; त्याला पहिली संधी गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या ‘गावरान मेवा’ या कार्यक्रमात मिळाली. पुढे त्याने झंकार आॅर्केस्ट्रामध्येही काम केले. ढोलकीचे कार्यक्रम करत असतानाच तो सचिन कचोटे यांच्याकडे तबल्याचे प्रशिक्षणही घेत राहिला. आताही ढोलकीपटू पांडुरंग घोलकर (मुंबई) यांच्याकडे तो गेली चार वर्षे ढोलकीचे धडे घेत आहे. याच दरम्यान सह्णाद्री वाहिनीवर ‘ढोलकीचा रिअ‍ॅलिटी शो’ सुरू होत असल्याचे त्याला समजले. घोलकर यांनी त्यास ‘या शोमधून तुला काहीतरी मिळेल म्हणून जाऊ नकोस तर नवीन काही तरी शिकायला मिळेल; असा विचार करून जा,’ असा सल्ला दिला. त्यानुसार त्याने या स्पर्धेत भाग घेतला आहे. आता तो महाअंतिम फेरीपर्यंत धडकला असून रविवारी (दि. ५) होणाऱ्या कार्यक्रमात त्याची स्पर्धा रामचंद्र कांबळे (सातारा), ओंकार इंगवले (पुणे), आणि नांदेडच्या भद्रे या ढोलकीपटूंशी आहे.


संगीतातील मान्यवरांची साथ..
भार्गव ढोलकीचा नाद जपतच ‘दादांची दुनियादारी’ हा कार्यक्रमही करतो. त्याचा तीस कलाकारांचा गु्रप आहे. दादा कोंडके यांच्या गाण्यांवर तो आधारित आहे. त्याशिवाय त्याने संगीतकार बाळ पळसुले, संजय गीते, विठ्ठल उमाप, उषा मंगेशकर, उत्तरा केळकर, वर्षा उसगांवकर, सुरेश वाडकर यांंच्या कार्यक्रमांतही ढोलकीची साथ केली आहे.

Web Title: Kolhapur Devdasi will become the son of 'Dholki Samrat of Maharashtra'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.