'मास्क नाही तर प्रवेश नाही' कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची अभिनव मोहीम राज्यभर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 05:46 PM2020-11-03T17:46:04+5:302020-11-03T17:49:26+5:30
collectoroffice, nomask no entry, coronavirus, kolhapurnews 'मास्क नाही तर प्रवेश नाही' कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सुरु केलेली आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गौरवलेली ही अभिनव मोहीम राज्यभर राबविण्याबाबत नगर विकास विभागाने काल 2 नोव्हेंबर रोजी शासन परिपत्रक प्रसिध्द केले आहे.
कोल्हापूर : 'मास्क नाही तर प्रवेश नाही' कोल्हापूरचेजिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सुरु केलेली आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गौरवलेली ही अभिनव मोहीम राज्यभर राबविण्याबाबत नगर विकास विभागाने काल 2 नोव्हेंबर रोजी शासन परिपत्रक प्रसिध्द केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोव्हीड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेंतर्गत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी ' मास्क नाही मग प्रवेश नाही, मास्क नाही तर वस्तू नाही, सामाजिक अंतर नाही तर वितरणही नाही' अशी अभिनव मोहीम सुरु केली.
यात मास्कचा वापर, सामाजिक अंतर पाळणे, सॅनिटायझर यावर भर दिला आहे. ग्राहकाने मास्क घातला नसेल तर दुकानदार त्याला प्रवेश देणार नाही आणि दुकानदारांने घातला नसेल तर ग्राहक वस्तू खरेदी करणार नाही. याचे उल्लंघन झाल्यास ग्राहकांना दंड तसेच आस्थापना सीलबंद करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी देसाई यांनी दिले आहेत.
या मोहिमेचा मुख्यमंत्र्यांनी गौरव करुन राज्यात इतर जिल्ह्यांनीही याचे अनुकरण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मुंबईत 'बेस्ट' च्या सर्व बस स्थानकावर याचे फलक लावण्यात आले आहेत. ही मोहीम राज्यभर राबविण्याबाबत नगर विकास विभागाचे उप सचिव शंकर जाधव यांनी काल 2 नोव्हेंबर रोजी शासन परिपत्रक प्रसिध्द केले आहे.
नागरिकांमध्ये मास्क वापराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी या शासन परिपत्रकात सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी मास्कशिवाय बाहेर पडू नये. यासाठी सर्व महानगरपालिका/ नगरपरिषदा/ नगरपंचायतींनी विशेष मोहीम राबवावी. यामध्ये मास्क वापरण्यासंदर्भात व्यापक प्रचार, प्रसार व प्रसिध्दी विविध माध्यमांव्दारे करणे.
जसे जागोजागी मोक्याच्या ठिकाणी बॅनर लावणे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आयुक्त/ मुख्याधिकारी यांनी विशेष दक्षता घेवून मोहीम राबविण्यात यावी. मोहीम राबविताना त्यामध्ये सर्व सामान्य नागरिकांचा सहभाग कसा वाढेल, यासाठी नाविन्यपूर्ण कल्पनांचा अवलंब करावा.
या उपरोक्त जे नागरिक मास्क किंवा प्रतिबंधक उपायांचा अवलंब करण्याकडे दुर्लक्ष करीत असतील अशा नागरिकांवर नियमांनुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी. मास्क नाही प्रवेश नाही याबाबत विशेष मोहीम राबवावी. हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक 202011021600541325 असा आहे.