कोल्हापूर अखेर टोलमुक्त!
By admin | Published: December 24, 2015 02:37 AM2015-12-24T02:37:01+5:302015-12-24T02:37:01+5:30
कोल्हापूरचा टोल रद्द करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत केली. अनेक वर्षांपासून राज्यभरात चर्चेत असलेला हा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे
नागपूर/कोल्हापूर : कोल्हापूरचा टोल रद्द करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत केली. अनेक वर्षांपासून राज्यभरात चर्चेत असलेला हा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे; परंतु ‘आयआरबी’ कंपनीचे रस्त्यांचे पैसे कसे देणार आणि टोल रद्दची अंतिम अधिसूचना कधी निघणार, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेले नाही. दरम्यान, या घोषणेनंतर कोल्हापुरकरांनी पेढे वाटून जल्लोष केला.
कोल्हापुरातील टोलवसुलीला ३१ डिसेंबरपर्यंत स्थगिती आहे. परंतु या प्रश्नातून कोल्हापूरकरांची कायमची कधी सुटका होणार, अशी विचारणा टोलविरोधी कृती समितीने केली होती. त्यासाठी आंदोलनाचे रणशिंगही नव्याने फुंकण्यात येणार होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. विधानसभेत हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले. कामकाजाच्या शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांनी स्वत:च हा विषय उपस्थित केला. कोल्हापूरच्या टोलबद्दल सरकारने निर्णय घेतल्याचे सांगून, ‘टोल रद्द’ची घोषणा करून त्यांनी साऱ्यांनाच सुखद धक्का दिला.
नंतर सभागृहाबाहेर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना या प्रकल्पाचे ‘आयआरबी’चे पैसे कसे द्यायचे, या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस, कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बसून निर्णय घेणार आहोत. निर्णय झाल्यानंतर टोल रद्दची अंतिम अधिसूचना काढण्यात येईल, असे शिंदे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)