कोल्हापूर : ताबूत विसर्जन मिरवणुकीत घुसली बस ; 2 ठार 18 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2017 08:35 PM2017-10-01T20:35:41+5:302017-10-01T23:39:21+5:30

ताबूत विसर्जन मिरवणुकीत के एम टी बस घुसली. आज ( रविवार १ ) सायंकाळी ८ च्या सुमारास हा अपघात शहरातील गर्दीने गजबजलेल्या पापाची तिकटी येथे झाला.

KOLHAPUR: KMT infiltration proceedings in KMT infiltration; 2 killed, 1 injured; The bus crashed, the environment is tense | कोल्हापूर : ताबूत विसर्जन मिरवणुकीत घुसली बस ; 2 ठार 18 जखमी

कोल्हापूर : ताबूत विसर्जन मिरवणुकीत घुसली बस ; 2 ठार 18 जखमी

googlenewsNext

कोल्हापूर : भरधाव केएमटी बसचा ब्रेक निकामी होवून ताबूत विसर्जन मिरवणुकीत घुसल्याने बालकासह दोन भाविक जागीच ठार झाले. तर अठरा जण गंभीर जखमी झाले. तानाजी भाऊ साठे (वय ५०), सुजल भानुदास अवघडे (१५, रा. राजारामपुरी तिसरी गल्ली, मातंग वसाहत, कोल्हापूर) अशी मृतांची नावे आहेत. 

भिषण अपघातामुळे संतप्त जमावाने  केएमटी बसची तोडफोड करून ती पेटविण्याचा प्रयत्न केला.  तर अग्निशामकच्या दोन गाड्यांचीही मोडतोड केली. रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पापाची तिकटी ते गंगावेश रस्ता या घटनेने हादरुन गेला. संतप्त जमावाला रोखणे पोलिसांना अवघड झाल्याने जलद कृती दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या. रात्री उशीरापर्यंत घटनास्थळासह सीपीआर रुग्णालयात तणाव होता. बसचालक रंगराव पांडूरंग पाटील (४०, रा. हळदी, ता. करवीर) याला रात्री उशीरा जुनाराजवाडा पोलीसांनी ताब्यात घेतले. 

अधिक माहिती अशी, शहरात सर्वत्र भक्तिमय वातावरणात ताबूत विसर्जन मिरवणुका सुरु होत्या. राजारामपूरी मातंग वसाहतीमध्ये तानाजी साठे यांच्या हजरत दस्तगीर बदामी पंजाची ताबूत  विसर्जन मिरवणूक रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पारंपारिक वाद्यात सुरु झाली. मिरवणुकीमध्ये लहान मुलांसह ५० ते ६० भाविक सहभागी झाले होते. राजारामपूरी, बागल चौक, आझाद मैदान, बिंदू चौक, पापाची तिकटी, गंगावेशमार्गे ही मिरवणुक पंचगंगा नदीकडे प्रयाण होणार होती. त्यांच्या पुढे अन्य पंजे असल्याने पापाची तिकटी ते गंगावेश मार्गावर प्रचंड गर्दी होती. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मार्केट यार्डहून लक्षतीर्थ वसाहतीकडे जाणारी केएमटी बस पापाची तिकटीहून घसरतीला ब्रेक निकामी होवून साठे यांच्या विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीत घुसली. अचानक दहा ते बारा लोक चिरडल्याने हाहाकार उडाला. बसखाली सापडून तानाजी साठे व सुजल अवघडे जागीच ठार झाले. तर अन्य दहा ते बाराजण रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत पडले होते. जखमींचा अक्रोश, किंचाळ्या आणि जमावाची घालमेल असे घटनास्थळावरील दूष्य अंगावर शहारे आनणारे होते. घटनेनंतर बसमधील प्रवासी खाली उतरताच चालक रंगराव पाटील व वाहक अशोक बाविसकर यांनी पलायन केले. संतप्त जमावाने बसची तोडफोड करीत पेटवून दिली. घटनेची माहिती लक्ष्मीपूरी पोलीसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतू जमावाचा उद्रेक पाहून एकाही पोलीसाचे पुढे जाण्याचे धाडस झाले नाही. आजूबाजूच्य लोकांनी मिळेल त्या वाहनाने जखमींना सीपीआर रुग्णालयात हलविले. मोठ्या संखेने जखमी दाखल झाल्याने सीपीआर प्रशासनाची धांदल उडाली. कोणाचा मृत्यू झाला, कोण जखमी झाले हे समजत नव्हते. ती माहिती घेण्यासाठी नातेवाईकांनी झुंबड सीपीआरमध्ये घुसल्याने गोंधळ उडाला. रात्री उशीरापर्यंत अपघातस्थळी व सीपीआरमध्ये सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. 

सोम्य लाठीमार

घटनास्थळावरील परिस्थितीचा अंदाज घेत राज्य राखीव दलासह अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले. जवाण येताच जमाव इतका प्रक्षुब्ध झाला की, त्यांनी त्या ठिकाणी आलेल्या पोलिसांवर हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीमार केला; पण जमावाचा संताप वाढत चालला होता. पेटविलेली केएमटी बस विझविण्यासाठी घटनास्थळी आलेल्या अग्निशामक दलाच्या दोन गाड्यांवरही जमावाने हल्ला चढवून या गाड्यांचीही मोडतोड केली. 

महिला अधिका-यासह तिघे जखमी 

जमावाने केलेल्या हल्यामध्ये जुनाराजवाडा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजिनी एस. चव्हाण (३२, रा. सोन्या मारुती चौक, कोल्हापूर), अग्निशामक दलाचे चालक संजय पांडूरंग पाटील (३५, रा. पाडळी, ता. करवीर), संदीप हरी पवार (२८, रा. कुर्डे, ता. करवीर)  जखमी झाले. त्यामुळे परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण तयार झाले होते. 

जखमींची नावे अशी -

आनंदा राऊत (५०), पृथ्वीराज सहारे (१४), बाळुकृष्ण हेगडे (२३), विनोद ज्ञानु पाटील (२३), स्वप्निल साठे (२२), आकाश तानाजी साठे (२५), सचिन साठे (२५), साहिल घाडगे (१४), संदीप तानाजी साठे (२५), प्रथमेश भंडारे (१९), अनुराग भंडारे (१४), करण साठे (२३), योगेश कवाळे (२६), कुणाल साठे (१७), सनि घारदे (२४), सुमित फाळके (१०), अमर कवाळे (२६),  दत्ता केरबा साठे (२५, सर्व रा. राजारामपूरी ३ गल्ली). 

 

Web Title: KOLHAPUR: KMT infiltration proceedings in KMT infiltration; 2 killed, 1 injured; The bus crashed, the environment is tense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.