कोकणासह कोल्हापूर, साताऱ्यात पाऊस
By Admin | Published: June 9, 2016 05:46 AM2016-06-09T05:46:55+5:302016-06-09T05:46:55+5:30
मॉन्सून केरळात दाखल झाल्यानंतर कोकणासह कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात बुधवारी मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली
कोल्हापूर/पणजी : मॉन्सून केरळात दाखल झाल्यानंतर कोकणासह कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात बुधवारी मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. सिंधुदुर्ग, रत्नागिरीत जोरदार सरी बरसल्या सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात झोडपून काढले तर थंड हवेचे ठिकाण असणारा महाबळेश्वर या पावसाने चिंब भिजला. गोव्यातही बऱ्याच ठिकाणी दमदार पाऊस झाला. खेड (जि. रत्नागिरी) तालुक्यात वीज पडल्याने मायलेक जखमी झाले.
कोकणात सिंधुदुर्गात विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. सर्वाधिक पाऊस मालवण तालुक्यात झाला. खेडमध्ये दुपारी तीनपासून पावसाला सुरूवात झाली. तालुक्यातील निंगडे गावी एका घरावर वीज पडून अंजली सुनील तांबे (४0) आणि त्यांचा मुलगा सुजल हे दोघेजण जखमी झाले असून त्यांना कळंबणी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गोव्यातही संततधार पावसाने सलामी दिली. यामुळे पणजीतील रस्ते जलमय झाले. तासाभरात एक इंचाहून जास्त पाऊस पडल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. मडगाव, खोतीगाव, काणकोण आणि सांगे परिसरातही पाऊस झाला.
कोल्हापूरात दुपारी चारच्या सुमारास सोसाट्याचे वारे सुरू झाले. त्यात पावसाची हलकी सर पडू लागली. सायंकाळी पाचनंतर मात्र पावसाचा जोर वाढला. त्यामुळे सखल भागात पाणी साचून राहण्याचे प्रकार घडले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>वीज पडून मुलगा ठार
सिंधुदुर्गनगरी : शिडवणे कोनेवाडी येथील वेंदात विजय पाटणकर (८ वर्ष ) वीज पडून मृत्यूमुखी पडला. वेदांत गोठ्यातील गुरांना चारापाणी देण्यासाठी गेला होता.त्याला कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र तत्पुर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती.