छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 02:44 PM2024-05-01T14:44:04+5:302024-05-01T14:45:52+5:30
loksabha Election - छत्रपती घराण्याच्या मानापमानावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जुंपली आहे. त्यात उदय सामंत यांनी संभाजीराजेंना तत्कालीन शिवसेनेने उमेदवारी का नाकारली होती असा सवाल केला आहे.
कोल्हापूर - Uday Samant on Sabhajiraje Yuvraj ( Marathi News ) ज्यांना छत्रपतींबाबत आपुलकी आणि गादीचा पुळका आलेला आहे त्यांच्याबाबत स्वत: संभाजीराजेंनी काय म्हटलं होतं, हे जनतेनं ऐकलं आहे. छत्रपती उदयनराजेंनी वंशज असल्याचा पुरावा द्यावा असं संजय राऊत म्हणाले होते. छत्रपती संभाजीराजेंना राज्यसभेची उमेदवारी का दिली नाही याचा खुलासा करावा असं सांगत मंत्री उदय सामंत यांनी संभाजीराजेंच्या उमेदवारीबाबत मोठा दावा केला आहे.
मंत्री उदय सामंत म्हणाले की, माझी नार्को टेस्ट करा, छत्रपती संभाजीराजेंना तिकिट मिळावं अशीच माझी इच्छा होती. त्यांनी गड किल्ल्यांसाठी केलेले काम, त्यासाठी संवर्धन हे मी पाहिले आहे. छत्रपती संभाजीराजे आमचे खासदार व्हावेत हीच प्रामाणिक भावना असल्याने मी प्रयत्न करत होतो. हा ड्राफ्ट बनवताना, मला समोरून फोन यायचा, मी ते हाताने लिहायचो, छत्रपती संभाजीराजेंना दाखवायचो. शेवटी संभाजीराजे म्हणाले, राज्यसभेची निवडणूक आहे, मला तिकिट मिळेल अथवा नाही, परंतु माझ्यासारख्या व्यक्तीची तुम्ही ज्याप्रकारे अवहेलना करतायेत, ती मला मान्य नाही. मला तिकिट द्यायचे असेल तर मी जिथे राहायला आहे तिथे यावे. त्यानंतर बंगल्यातून संभाजीराजे निघून गेले असं त्यांनी सांगितले.
'त्या' ड्राफ्टमध्ये काय लिहिलं होतं?
- ज्यावेळी राज्यसभेची खासदारकी छत्रपती संभाजीराजेंना दिली जाईल. तेव्हा ते ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून संसदेच्या निवडणुकापर्यंत ते शिवसेना पक्षाचा प्रचार करतील.
- संभाजीराजे जरी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असले तरी सभागृहात आणि सभागृहाबाहेर शिवसेना पक्षाचे काम ते करतील. शिवसेना पक्षाचा आदेश हा छत्रपती संभाजीराजेंना बंधनकारक राहील.
- छत्रपती संभाजीराजेंनी राज्यभरात भूमिका मांडत असताना फक्त आणि फक्त शिवसेनेची मांडली पाहिजे.
- छत्रपती संभाजीराजेंनी पत्रकार परिषद घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे माझे नेते असून त्यांचा आदेश मी मानणार आहे.
तसेच या सर्व अटींमधून छत्रपती संभाजीराजेंनी काही बदल करायला सांगितले, त्यातील महत्त्वाचा बदल म्हणजे, कुठल्याही पक्षात काम करण्याचा निर्णय मी घेईन किंवा न घेईन हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे.परंतु मी छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज असल्याने ग्रामपंचायतीपासून खासदारकीच्या स्तरापर्यंत पक्षाच्या प्रचाराचे मुद्दे मांडणे हे मला योग्य वाटत नाही. परंतु मविआ पुरस्कृत उमेदवार मला करत असाल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार तळागाळापर्यंत पोहचवण्याचा मी प्रयत्न करेन, राज्यातील गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्याचा मी प्रयत्न करेन असं त्यांनी म्हटलं. एखादा तरी छत्रपती आपल्या पक्षात हवा असं मला सांगण्यात आले, त्यानंतर मी, मिलिंद नार्वेकर, अनिल देसाई हे तिघे ओबेरॉय हॉटेलला गेलो. तिथे मलाही काही कल्पना नव्हती, तेव्हा संभाजीराजेंना सांगण्यात आले, या ड्राफ्टमध्ये तुम्ही शिवसेनेत प्रवेश करताय, शिवसेना पक्षाची ध्येय धोरणे तुम्हाला माहिती आहेत. शिवसेना पक्षाची पावती तुम्ही फाडणार आहे असं म्हटलं. हा मला आणि संभाजीराजेंनाही धक्का होता असंही उदय सामंत यांनी म्हटलं.
दरम्यान, छत्रपती संभाजीराजेंनी अनिल देसाईंना विचारले, राज्यसभेची उमेदवारी घ्यावी यासाठी सर्वात आधी मला दिल्लीला कोण भेटले, त्यावर देसाईंनी उत्तर दिले. त्यानंतर संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिला, त्यानंतर छत्रपती घराण्याकडे वंशजाचे पुरावे मागून अपमान केला. ज्याप्रकारे ड्राफ्ट लिहिला गेला, ३ तास मी ड्राफ्ट लिहित होतो. त्यात जे डायलॉग सुरू होते, मला फोन यायचे, स्पीकरवर ठेवला जायचे. ड्राफ्ट तयार झाल्यावर त्यावर नोटरी करावी असंही मला सांगण्यात आले होते. आज हे गादीचा मान दाखवतायेत, अशी दुटप्पी भूमिका कोल्हापूरकरांनी ओळखावी. कोल्हापूरचं राजकारण वेगळ्या ट्रॅकवर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातोय. महाराष्ट्रातील कुठल्याही मतदारांना गृहित धरू नये. ज्या लोकांनी छत्रपतींच्या गादीचा, वंशजांचा अपमान केलेला आहे. त्या सर्वांचा विचार कोल्हापूरकरांनी करायला हवा. ज्यांना पुळका आलाय त्यांनी या गोष्टीचा खुलासा केला पाहिजे. संभाजीराजेंना उमेदवारी का दिली नाही, नोटरी का करून घेत होते याची उत्तरे द्यावी अशी मागणी उदय सामंत यांनी उबाठा गटाकडे केली आहे.
...त्यावेळी संभाजीराजे काय म्हणाले होते?
छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरण करून तुम्ही आणि मी दोघांनी तिथं जाऊन कोण चुकीचं बोलतंय हे सांगावे, मी मुंबई आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २ खासदार माझ्याकडे पाठवले, आमची बैठक ओबेरॉयला झाली, त्या दोघांनी सांगितले, तुम्ही शिवसेनेत प्रवेश करा, उद्या तुम्हाला उमेदवारी जाहीर करतो. पण मी स्पष्टपणे ही निवडणूक अपक्ष लढणार असल्याचं सांगितले. मी शिवसेनेत प्रवेश करणार नाही. त्यानंतर २ दिवसांनी मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला, वर्षा बंगल्यावर भेटायला गेलो. तिथे ३ मुद्दे चर्चेत आले. त्यात शिवसेनेत प्रवेश करावा असा प्रस्ताव दिला, पण मी त्यास नकार दिला. त्यानंतर मी एक प्रस्ताव दिला. कोटा नसतानाही ही जागा शिवसेनेची आहे असं ते म्हणत होते, तरीही शिवसेनेच्या माध्यमातून मविआ पुरस्कृत अपक्ष उमेदवार करावं असा प्रस्ताव मी दिला. तो शक्य नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यानंतर २ दिवस विचार करून पुन्हा भेट झाली, सुवर्णमध्य काढून तुम्हाला पुरस्कृत उमेदवारी द्यायची आहे असं सांगितले. आमच्या बैठकीतला ड्राफ्ट तयार झाला. मंत्र्यांच्या अक्षरात ड्राफ्ट आहे. त्यात काही बदल करून ड्राफ्ट फायनल झाला, ती बैठक संपवून मी कोल्हापूरला निघालो. मात्र तिथे संजय पवारांना उमेदवारी देण्यात आली असं संभाजीराजेंनी म्हटलं होते.