उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 12:53 PM2024-05-02T12:53:34+5:302024-05-02T12:54:57+5:30
Kolhapur Loksabha Election - कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शाहू छत्रपतीविरुद्ध संजय मंडलिक असा सामना रंगणार आहेत. त्यात छत्रपती घराण्याच्या मानापमान नाट्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.
कोल्हापूर - Uddhav Thackeray on SambhajiRaje ( Marathi News ) मी संभाजीराजेंबाबत चुकीचा वागलो, असं समजा, वागलो असेल तर मी जाहीर माफी मागतो. पण संभाजीराजेंबाबत मी चुकलो असेल तर शाहू छत्रपतींबाबत तुम्ही ती चूक का करताय, तुम्ही का त्यांना पाडायला उभे आहात असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी युवराज संभाजीराजेंबाबत विरोधकांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्ही चुकीचं करताय, आम्ही बोट दाखवल्यावर उलटं बोट माझ्यावर दाखवता, आम्ही शेण खाल्लं असेल म्हणून तुम्ही शेण खाताय? आज शाहू महाराजांबद्दल मला वैयक्तिक आदर आहे, छत्रपती घराण्याबद्दल प्रेम आहे. कारण या व्यक्तीने मी कुणीतरी आहे असं जाणूनच दिले नाही. संभाजीराजेंबाबत काय निर्णय घेतला हे मला आणि संभाजीराजेंना माहिती आहेत. त्याचा अर्थ आमची मैत्री आणि ऋणानुबंध तुटलेत असं नाही असंही त्यांनी म्हटलं.
तसेच माझ्यात आणि संभाजीराजे यांच्यात जर दुरावा आला असेल तर त्यांनी सर्वांना सांगावे. मला एक कुणकुण लागली होती, जसा तुम्ही माझा संजय पाडला तसा जर दगाफटका संभाजीराजेंबाबत झाला असता तर पाप कुणाच्या माथी आलं असते? असा प्रतिसवालही उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे उदय सामंत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारला आहे.
काय म्हणाले होते उदय सामंत?
संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिला, त्यानंतर छत्रपती घराण्याकडे वंशजाचे पुरावे मागून अपमान केला. ज्याप्रकारे ड्राफ्ट लिहिला गेला, ३ तास मी ड्राफ्ट लिहित होतो. त्यात जे डायलॉग सुरू होते, मला फोन यायचे, स्पीकरवर ठेवला जायचे. ड्राफ्ट तयार झाल्यावर त्यावर नोटरी करावी असंही मला सांगण्यात आले होते. आज हे गादीचा मान दाखवतायेत, अशी दुटप्पी भूमिका कोल्हापूरकरांनी ओळखावी. कोल्हापूरचं राजकारण वेगळ्या ट्रॅकवर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातोय. महाराष्ट्रातील कुठल्याही मतदारांना गृहित धरू नये. ज्या लोकांनी छत्रपतींच्या गादीचा, वंशजांचा अपमान केलेला आहे. त्या सर्वांचा विचार कोल्हापूरकरांनी करायला हवा. ज्यांना पुळका आलाय त्यांनी या गोष्टीचा खुलासा केला पाहिजे. संभाजीराजेंना उमेदवारी का दिली नाही, नोटरी का करून घेत होते याची उत्तरे द्यावी अशी मागणी उदय सामंत यांनी उबाठा गटाकडे केली होती.