Kolhapur Lok Sabha Election Result 2024 : कोल्हापुरात शाहू महाराज ८ हजार मतांनी आघाडीवर; संजय मंडलिक पिछाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 09:41 AM2024-06-04T09:41:55+5:302024-06-04T09:43:13+5:30
Kolhapur Lok Sabha Election Result 2024 : शाहू महाराज ८ हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक पिछाडीवर आहेत.
Kolhapur Lok Sabha Election Result 2024 : कोल्हापूर : संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला (Lok Sabha Election Result 2024) सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. दरम्यान, अत्यंत चुरशीने होत असलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज (Shahu Maharaj) यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी कायम घेतली आहे.
शाहू महाराज ८ हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) पिछाडीवर आहेत. कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर, राधानगरी, चंदगड या विधानसभा मतदार संघात शाहू महाराज यांनी आघाडी घेतली आहे. तर कागलमध्ये संजय मंडलिक यांची आघाडी आहे. त्यामुळे कागल वगळता इतर विधानसभा मतदारसंघात शाहू महाराज यांनी मोठी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, कोल्हापूर मतदारसंघाची मतमोजणी रमणमळा येथील शासकीय धान्य गोदामात होत आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. पहिल्यांदा टपाली मतदानाची मोजणी करण्यात आली. सुरवातीच्या टपाली मतदानामध्ये काँग्रेस उमेदवार शाहू महाराज आघाडीवर आहेत. यादरम्यान, कडक बंदोबंदास्त बंदिस्त असलेल्या स्ट्राँग रुम उघडल्या आहेत. कोल्हापूरसाठी सहाही विधानसभा मतदार संघात प्रत्येकी १४ मतमोजणी टेबल संख्या असून चंदगड २८, राधानगरी ३१, कागल २६, कोल्हापूर दक्षिण २४, करवीर २६ आणि कोल्हापूर उत्तरची २३ फेऱ्यातून मतमोजणी पूर्ण होणार आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात यावेळी चुरशीची लढत झाली होती. महायुतीने जोरदार प्रचार केला होता. या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती. तर दुसरीकडे महाविकास आघाडीनेही जोरदार प्रचार केला होता. काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी शाहू महाराज यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. आधी महाविकास आघाडीसाठी एकतर्फी वाटणारी निवडणूक शेवटच्या क्षणी एकतर्फी राहिली नव्हती. महायुतीनेही जोरदार प्रचार केला होता.