राज्याशी कोल्हापूरचा संपर्क तुटला : रस्ते वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 02:08 PM2019-08-08T14:08:09+5:302019-08-08T14:23:41+5:30
पुणे विभागातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
पुणे : घाटमाथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि साताऱ्यातील १ लाख ३२ हजार ३६० नागरीकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून, सुमारे एक लाख नागरीक अजूनही अडकून पडले आहेत. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला असून, कोल्हापूरला जाणारे सर्व रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे कोल्हापूरशी रस्ते संपर्क तुटला आहे. कोल्हापूरामधे प्रथमच इतका मोठा पूर आला असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
पश्चिम महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यामधे निर्माण झालेल्या पूर स्थितीची माहिती म्हैसेकर यांनी दिली. पुणे विभागातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. भीमा खोऱ्यातील धरणपाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने पुण्यातील स्थिती नियंत्रणात आहे. पुढील तीन दिवस कोल्हापूर आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. महाबळेश्वर आणि कोल्हापूरच्या घाटभागात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या खोऱ्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सांगली आणि कोल्हापूरला त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. पुणे बेंगळुरु महामार्गावर हातकणंगले तालुक्यातील किणी आणि शिरोली गावाजवळ रस्त्यावर चार ते साडेचार फूट पाणी आहे. तर, बेळगावीकडून कोल्हापूरकडे येणाऱ्या मार्गावरही पाणी साचल्याने रस्ता बंद करण्यात आला आहे. सांगली-कोल्हापूर मार्ग देखील बंद असल्याने कोल्हापूरचा रस्ते संपर्क तुटला असल्याचे म्हैसेकर म्हणाले.
कोल्हापूरातील १२९, सातारा ६, सांगलीतील ११ गावांचा संपर्क तुटलेला आहे. सुमारे लाखभर नागरीक अजूनही येथे अडकलेले आहेत. या सर्वांना तेथून बाहेर काढणे शक्य नाही. त्यामुळे हवाई मार्गाने येथील नागरिकांना अन्नाचा पुरवठा करण्यात येत आहे. या भागात पाऊस असल्याने उलट ०.१ मीटरने बुधवारी पाणी पातळीत वाढ नोंदविली. कोयना धरणातील विसर्ग १ लाख २१ हजार क्युसेकवरुन १ लाख ९ हजार क्युसेकपर्यंत खाली आणण्यात आला आहे. धोकादायक ठिकाणी अडकेलल्या नागरीकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) आणि नौदलाची मदत घेण्यात येत असल्याचे म्हैसेकर म्हणाले.
--------------
विभागात पूरस्थिती असल्याने शक्यतो नागरिकांनी घराबाहेर पडू नये. पाणी असल्याचे ठिकाणी उतरु नये, तसेच पुराच्या पाण्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह टाळावा. याशिवाय अफवांवर विश्वास ठेवू नये. पूर येण्याची शक्यता असलेल्या भागात जिल्हा प्रशासनाने आवाहन केल्यानंतर नागरिकांनी त्वरित घरातून बाहेर पडावे.
डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त, पुणे
कोल्हापूरशी संपर्क
* अलमट्टीतून चार लाखांचा विसर्ग
कृष्णानदीवर असलेल्या उत्तर कर्नाटकातील अलमट्टी या धरणातून पावणेतीन लाख क्युसेक पाणी सोडण्यात येत होते. सध्या कृष्णेत ३ लाख २ हजार क्युसेक पाणी जमा होत आहे. पावसाचा जोर असल्याने बुधवारी पुराचे पाणी ०.१ मीटरने वाढले आहे. तसेच, येथील घाटमाथ्यावर अतीवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अलमट्टीतून चार लाख क्युसेक पर्यंत विसर्ग वाढविण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक सरकारकडे केली होती. त्याप्रमाणे विसर्ग वाढविण्यात आला आहे. या धरणातून ५ लाख २० हजार क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविता येवू शकतो. कर्नाटकातील रायचूर येथे पूरस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे आणखी विसर्ग वाढविण्यास कर्नाटक सरकार तयार नाही. अलमट्टीतून किमान साडेचार लाख क्युसेक विसर्ग करावा अशी मागणी असल्याचे विभागीय आयुक्त, डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले.
--------------
पूरामुळे झालेले मृत्यू
पुणे ४
सातारा ७
सांगली २
सोलापूर १
कोल्हापूर २
----------------------
सहाशे गावातील पाणी पुरवठा बंद
पुरामुळे पाणी पुरवठा करणारी यंत्रणा पाण्याखाली गेल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील ३९०, सांगलीतील ११३, सातारा ९यथील ९१ गावांतील पाणी पुरवठा बंद असून, कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी बाधित गावातील विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.
--------------
गावांशी संपर्क तुटला
जिल्हा गावांची संख्या अडकलेल्या नागरीकांची संख्या सुरक्षितस्थळी हलविलेले नागरीक
कोल्हापूर १२९ ३५,५१४ ५१,७८५
सातारा ६ ८०० ६२६५
सांगली ११ ४९,००० ५३,२२८
सोलापूर - - ७,७४९
पुणे - - १३,३३६
-----------------------
पूररेषा लवकरच निश्चित करणार
दर पंचवीस वर्षांनी पूररेषा निश्चित केली जाते. त्यात गेल्या पंचवीस वर्षांतील आणि शंभर वर्षांतील सर्वोच्च पावसाचा विचार केला जातो. त्यानुसार हरित (ग्रीन) आणि लाल (रेड) रेषा निश्चित केली जाते. लवकरच या रेषा अंतिम केल्या जातील, असे विभागीय आयुक्तांनी सांगितले.
-------------
पुणे : ग्रामीण भागातील १०३ मोठे व ४३३ छोटे पुलांपैकी ३४ पुल पाण्याखाली गेले आहेत. त्यातील पुणे महानगरपालिका हद्दीतील ३, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील २, पुणे कॅन्टोन्मेंट १, असे ४० पूल पाण्याखाली गेले आहेत.
सातारा : ८ पूल पाण्याखाली गेले असून पर्यायी मार्ग उपलब्ध
सांगली : सहा राज्यमार्ग, १५ जिल्हामार्ग व इतर सहा जिल्हा मार्ग पाण्याखाली
कोल्हापूर : १०४ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आणि ८९ रस्ते पाण्याखाली
--------------------
- कोल्हापूरमधे ६ एनडीआरएफ पथके दाखल असून, ६ पथके रवाना होत आहेत. एक नौदल पथक पोहोचले
- सांगलीमध्ये ३ एनडीआरएफ पथके पोहचली, असून ३ पथके रवाना होत आहेत
- साताऱ्यात १ एनडीआरएफ पथक पोहचले
- टेरिटोरिअल आर्मीचीकोल्हापूरमध्ये ४ व सांगलीमध्ये १ पथक कार्यरत