कोल्हापूर : घराघरांत माहोल नवरात्रौत्सवाचा!--उद्या घटस्थापना :

By admin | Published: September 23, 2014 11:19 PM2014-09-23T23:19:09+5:302014-09-23T23:19:53+5:30

अंबाबाई मंदिराची तयारी अंतिम टप्प्यात; घटाचे साहित्य, फुले, फळे, पूजेच्या साहित्याने बाजारपेठ फुलली

Kolhapur: Mahal Navaratri Chaturvedi in the house! | कोल्हापूर : घराघरांत माहोल नवरात्रौत्सवाचा!--उद्या घटस्थापना :

कोल्हापूर : घराघरांत माहोल नवरात्रौत्सवाचा!--उद्या घटस्थापना :

Next

कोल्हापूर : देशातील प्रमुख शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाईच्या नवरात्रौत्सवासाठी आता करवीरनगरी सज्ज झाली आहे. अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता अंबाबाई मंदिरातील सर्व तयारी पूर्ण झाली आहे, तर घटस्थापनेसाठी लागणाऱ्या पूजेच्या साहित्यांच्या खरेदीसाठी महिलांनी बाजारपेठेत गर्दी केली आहे.
कोल्हापूरच्या अंबाबाईचा शारदीय नवरात्रौत्सव आणि येथील शाही दसरा म्हणजे देशभरातील भाविकांसाठीचे आकर्षणाचे केंद्र. यंदा महिला भाविकांच्या सोयीसाठी भवानी मंडपात, तर पूर्व दरवाजा येथे महालक्ष्मी भक्त मंडळाच्यावतीने मंंडप उभारण्यात येत आहे. मंदिरात गुरुवारी (दि. २५) सकाळी घटस्थापना करण्यात येणार आहे. त्यानंतर शासकीय अभिषेक, दुपारची आरती झाल्यानंतर देवीची सालंकृत पूजा बांधली जाईल. रात्री साडेनऊ वाजता पालखी सोहळा होईल. सोमवारी (दि. २९) ललिता पंचमी आहे. त्यादिवशी सकाळी दहा वाजताचा अभिषेक झाल्यानंतर देवीची पालखी त्र्यंबोली देवीच्या भेटीला जाईल. तेथे दुपारी बारा वाजता कोहळा फोडण्याचा विधी झाल्यानंतर संध्याकाळी उशिरा पालखी पुन्हा मंदिरात येईल. शुक्रवारी (दि. ३ आॅक्टोबर) विजयादशमी आहे.

भरतनाट्यम, सोंगी भजन, गायन, जागर...
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवादरम्यान दरवर्षीप्रमाणे यंदाही भरतनाट्यम, गायन सेवा, सोंगी भजन, जागर अशा सांस्कृतिक कार्यक्रमांनी करवीर निवासिनी अंबाबाईसमोर सेवा अर्पण केली जाणार आहे. अंबाबाई मंदिरातील देवस्थान समितीच्या कार्यालयासमोर गुरुवार (दि. २५)पासून या कार्यक्रमांना सुरुवात होईल. याअंतर्गत रोज सकाळी सात ते आठ या वेळेत भावेकाका यांचे श्रीसूक्त पठण व आठ ते नऊ या वेळेत मंत्रविद्यावाचस्पती मयूरा जाधव यांचे मंत्रोच्चार सादर होणार आहेत. सकाळी नऊ ते अकरा, अकरा ते दुपारी एक, दुपारी एक ते तीन, दुपारी तीन ते सायंकाळी पाच, सायंकाळी पाच ते सात आणि सायंकाळी सात ते नऊ अशा या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या वेळा आहेत. तरी भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा,
पालखीसमोर गायन सेवा
कोल्हापूर : यंदाच्यावर्षी पालखीपुढे महालक्ष्मी भक्तमंडळाच्यावतीने गायन सेवा सादर होणार आहे. त्यानुसार सुजाता हेर्लेकर, श्यामल वाडदेकर (पुणे), धनश्री फडके, राजेंद्र कंदलगावकर (पुणे), नीशा फाटक (कुरुंदवाड), माधुरी पंडितराव, हेमंत वाठारकर, प्रकाश नृत्य कलामंदिर, संदीप जाधव हे कलाकार भावगीते, भक्तिगीते सादर करणार आहेत, तर प्रकाश नृत्यमंदिरचे कलाकार नृत्य करणार आहेत. अश्विन पौर्णिमेला (दि. ८ आॅक्टोबर) सकाळी साडेअकरा वाजता महाप्रसाद होणार आहे. श्री महालक्ष्मी भक्तमंडळाच्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या विद्यमाने त्र्यंबोली यात्रेनिमित्त भाविकांसाठी मोफत बससेवा असेल. सोमवारी पहाटे पाच वाजल्यापासून यात्रा संपेपर्यंत ही बससेवा असेल.

गरबा...रास दांडिया
नवरात्रौत्सवादरम्यान देवीचा जागर करत गरबा-दांडिया खेळला जातो. या रास दांडियासाठी चनिया चोली, घागरा, आॅक्साईडचे दागिने, बाजूबंद आणि दांडियाच्या खरेदीसाठी तरुणाईची, छोट्यांची लगबग आहे.

फळे...ड्रायफ्रूटस
कडक उपवासासाठी बाजारात केळी, सफरचंद, रताळे, चिकू, सीताफळ या फळांची रेलचेल आहे. याशिवाय खजूर, बदाम, काजू अशा ड्रायफ्रूटसह शेंगदाण्याचे लाडू, खोबरे डिंकाचे, राजगिरा लाडू खरेदीसाठी गर्दी होत आहे.

प्लास्टिक पिशव्यांना बंदीच...नागरिकांना आवाहन
मंदिराच्या आत व बाह्य परिसरात पूजेचे साहित्य घेऊन येताना प्लास्टिकच्या पिशव्यांना सक्त मनाई केली आहे. त्यासाठी दुकानदारांना पूजेचे साहित्य प्लास्टिक पिशव्यांऐवजी प्लेटांमधून दिले जावे, अशा सूचना केल्या आहेत. याशिवाय देवस्थान समितीच्यावतीने कापडी पिशव्या देण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी दोन-तीन बँकांशी बोलणी झाल्याची माहिती समितीचे सचिव संजय पवार यांनी दिली.

तुळजाभवानी मंदिरात स्वच्छता...
भवानी मंडपातील जुना राजवाड्यातील तुळजाभवानी मंदिरातही स्वच्छतेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. छत्रपती घराण्याची कुलदैवत असलेल्या तुळजाभवानी देवीची अंबाबाईप्रमाणेच नवरात्राचे नऊ दिवस विविध रूपात पूजा बांधली जाते. कोहळा पंचमीला देवीची पालखी त्र्यंबोली देवीच्या भेटीस जाते, तर अष्टमीला नगरप्रदक्षिणेदरम्यान वाहनारूढ झालेली अंबाबाई तुळजाभवानी देवीची भेट घेते.

सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
गुरुवार (दि. २५) : श्री संतकृपा सोंगी भजनी मंडळ, पार्वती महिला मंडळ (इचलकरंजी), अक्कामहादेवी महिला मंडळ (कुरुंदवाड), हनुमान भक्त मंडळ, शिवशाहू पोवाडा मंच, शिवगंधार संगीत संस्था - मनबावरी गाणी.
शुक्रवार (दि. २६) : भजनी मंडळ आकाशवाणी कलाकार, चौंडेश्वरी महिला भजनी मंडळ (कऱ्हाड), राधा महिला भजनी मंडळ (कऱ्हाड), स्वामी महिला ग्रुप, स्वरगंगा मराठी वाद्यवृंद, स्वरनिनाद संगीत मंच.
शनिवार (२७) : विठूमाउली भजनी मंडळ, साईप्रसाद भजनी मंडळ (पुणे), दत्तकृपा भजनी मंडळ (पुणे), स्त्रीशक्ती जागर, इंद्राणी ग्रुप (पुणे), भक्तिगीतांवर नृत्य - श्रावण सखी ग्रुप (डोंबिवली), श्री महालक्ष्मीचा जागर.
रविवार (दि. २८) : श्रावणधारा महिला भजनी मंडळ, श्री महालक्ष्मी भजनी मंडळ (ग्रुप), कलाश्री महिला भजनी मंडळ (इचलकरंजी), जिव्हाई भजनी मंडळ, चैतन्य ग्रुप मंगळागौर (मुंबई), इंद्रायणी ग्रुपचे नृत्य (सावंतवाडी).
सोमवार (दि. २९) : राधिका भजनी मंडळ, भक्तिसेवा महिला भजनी मंडळ (पुणे), सिद्धिविनायक भजनी मंडळ (इचलकरंजी), मंदार भाटे यांचा स्वरधारा कलामंच, शुभांगी मुळे यांचे भावगीत (पुणे), स्वरशब्दांचा हिंदोळा.
मंगळवार (दि. ३०) : भक्तिसेवा महिला भजनी मंडळ, गोरक्षनाथ महिला भजनी मंडळ (इस्लामपूर), वारणा महिला भजनी मंडळ (वारणानगर), सोंगी भजनी महिला मंडळ, प्रेमानंद पेडणेकर यांची भावगीते व भक्तिगीते.
बुधवार (दि. १ आॅक्टोबर) : माउली महिला, ज्ञानेश्वर माउली महिला भजनी मंडळ (राशिवडे बुद्रुक), साई मंदिर, गजानन माउली सोंगी भजन, दीपा कामत यांचे भरतनाट्यम, पवित्र भट यांचे भरतनाट्यम (मुंबई).
गुरुवार (दि. २) : श्री स्वामी समर्थ महिला भजनी मंडळ, स्वात्मानंद भजनी मंडळ (पुणे), हरिप्रिया सोंगी भजनी मंडळ, उत्तरेश्वर प्रासादिक महादेव भजनी मंडळ, शुभांगी जोशी गायनसेवा (पुणे), ‘कोणार्क’निर्मित स्वरमोहिनी.
शुक्रवार (दि. ३) : कोमल व्हटकर यांचे भरतनाट्यम. अवधूत महिला भजनी मंडळाचे भजन.

Web Title: Kolhapur: Mahal Navaratri Chaturvedi in the house!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.