कोल्हापूर, नाशिकमध्ये महापूर; राज्यात सर्वदूर पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 04:01 AM2019-08-05T04:01:21+5:302019-08-05T04:01:38+5:30
पावसाची दमदार बॅटिंग सुरुच
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाबरोबरच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात पडझड सुरू आहे. पंचगंगा नदीची ४६ फुटांकडे वाटचाल सुरू असून ८६ बंधारे पाण्याखाली गेल्याने पुराचा विळखा अधिक घट्ट होऊ लागला आहे. ११ गावांचा संपर्क तुटला असून, दीड हजाराहून अधिक नागरिकांना प्रशासनाने स्थलांतरित केल्याने जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे.
रविवारी सकाळपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला असून, तो थांबून-थांबून पडत असला तरी जोरदार सरी कोसळत आहेत. सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत ९४३.२३ मिलिमीटर पाऊस झाला. १० तालुक्यांत अतिवृष्टी झाल्याने इतर पाच जिल्हा मार्ग व पाच ग्रामीण मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद असून २५ इतर जिल्हा मार्ग व २६ ग्रामीण मार्गांवरील वाहतूक अंशत: खंडित झाली आहे. वारणा धरणातून प्रतिसेकंद २० हजार ४७२ घनफूट विसर्ग सुरू असल्याने वारणा नदीच्या पुराचे पाणी अस्ताव्यस्त पसरले आहे.
‘अलमट्टी’तून विसर्ग
वारणा, कृष्णा आणि पंचगंगेच्या पुरावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे लक्ष अलमट्टी धरणाच्या विसर्गावर आहे. या धरणातून शनिवारपेक्षा रविवारी विसर्ग वाढविण्यात आला असून, सध्या प्रतिसेकंद २ लाख ८५ हजार ७१० घनफूट पाणी सोडण्यात
येत आहे.
कोयना नदी धोका पातळीकडे
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने अक्षरश: कहर केल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्यातच आता जिल्ह्यातील बहुतांशी धरणांतून विसर्ग सुरू असून, कृष्णा आणि कोयना नदीतील पाण्याने धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. कोयना धरणातील पाणीसाठा ९६.७५ टीएमसीपर्यंत पोहोचला होता. परिणामी पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे सहा दरवाजे ११ फुटांपर्यंत वर उचलण्यात आले. त्यामधून ६७ हजार ९१३ क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.
पुणे जिल्ह्याला झोडपले
पुणे : जिल्ह्यातील बहुतेक सर्व धरणे ओव्हरफ्लो झाली असून, धरणांमधून हजारो क्युसेक्सने पाणी नद्यांमध्ये सोडण्यात येत आहे. मुळा-मुठा, पवना, इंद्रायणी, भामा, मीना-नीरा, गुंजवणी, वेळवंड, घोड आदी बहुतेक सर्व नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. यामुळे पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि अनेक तालुक्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुळा-मुठा खोऱ्यांमध्ये गेल्या ४८ तासांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पानशेत, वरसगाव आणि खडकवासला, पवना, मुळशी धरण शंभर टक्के भरल्याने सकाळी ११ वाजल्यापासून खडकवासला धरणातून तब्बल ३५ हजार ५७४ क्युसेक्सने मुठा नदीत तर मुळशी धरणातून ३५ हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले. यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. खडकवासला धरणातून सायंकाळी विसर्ग तब्बल ४५ हजार क्युसेक्सपर्यंत वाढविण्यात आला. यामुळे मुळा-मुठा नद्यांना आलेल्या पुरामुळे शहरातील तब्बल ६२५ कुटुंबांना पूराचा फटका बसला असून, सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात
नद्यांना पूर
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात शनिवारच्या तुलनेत रविवारी पहाटेपासून पावसाने जोर वाढविल्याने नदी, ओहोळांची पाण्याची पातळी वाढली आहे. रविवारी दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना
पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसाबरोबरच देवगड तालुक्यातील साळशी गावाला वादळाचा फटका बसला आहे. त्यामुळे परिसरातील झाडांची पडझड, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोल्हापूर - रत्नागिरी मार्गावर मलकापूर जवळील निळे गावात रस्त्यावर पूराचे पाणी आल्याने संबंधित मार्ग वाहतूकीसाठी बंद ठेवला आहे. परिणामी रत्नागिरी - मुंबई याशिवाय रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील एसटीची वाहतूक बंद आहे.
कसारा रेल्वेमार्गावर दरड कोसळली
नाशिक : मुसळधार पावसामुळे रस्ते मार्गावर दरड कोसळल्यानंतर दरड हटविण्याचे काम पूर्ण होत नाही तोवर कसारा घाटातील रेल्वे मार्गावरदेखील दरड कोसळल्यामुळे इगतपुरीहून मनमाडकडे निघालेल्या रेल्वे गाड्या या कसारा स्थानकात थांबविल्या आहेत. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून दरड दूर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेची यंत्रणा कोलमडून पडलेली असतानाच दरड कोसळल्यामुळे सेवा पूर्ववत सुरू होण्यास आणखी विलंब होण्याची शक्यता आहे.
रत्नागिरीत अनेक गावांचा संपर्क तुटला
रत्नागिरी : गेले तीन कोसळणाºया मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला रविवारीही शब्दश: झोडपून काढले. पावसामुळे ग्रामीण भागातील रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. चिपळूण तालुक्यातील दादर - कळवणे मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने ८ गावांचा संपर्क तुटला आहे. चिपळूण शहरात पुन्हा पूर आला असून, शहरातील व्यवहार ठप्प झाले आहेत. राजापूर तालुक्यातील अर्जुना, कोदवली नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पुराचे पाणी शहरात शिरले होते. पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. तर अनेक ठिकाणची एस्. टी. बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. सायंकाळी रत्नागिरी तालुक्यातील उक्षी येथे एक इको कार नदीत वाहून गेली. त्यातील बाहेर फेकले गेलेले चारजण बचावले. मात्र एकजण कारसह बेपत्ता झाला आहे.
नाशिक : जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि नाशिकह अन्य तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे. गंगापूर धरणात ९४ टक्के पाणी साठा झाल्याने ४५ हजार क्यूसेक पाणी सोडण्यात आल्याने गोदावरी नदीला महापूर आला आहे. नांदूरमधमेश्वर येथून १ लाख ५८ हजार क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सायखेडा आणि चांदोरीला पुराचा वेढा पडला आहे. त्याठिकाणी एनडीआरएफचे पथक बचावकार्यासाठी तैनात करण्यात आले आहे तर नाशिक शहरात गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, पुरात अडकलेल्या किमान दोनशे ते अडीचशे जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे. दरम्यान या पावसाने रेल्वे तसेच रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. दोन दिवसांपासून शहरात पावसाचा जोर वाढला असून रविवारी (दि.४) सर्वात भीषण परिस्थिती निर्माण झाली. गोदावरी नदीसह अन्य नद्यांना महापूर आला आहे. गोदावरी नदीच्या पुरामुळे निफाड तालुक्यातील सायखेडा आणि चांदोरीला पुराचा वेढा पडला आहे
वारणाकाठी धोकादायक परिस्थिती
सांगली : जिल्ह्यातील पूरस्थिती दिवसेंदिवस
गंभीर होत असून, कृष्णा, वारणा नदीकाठी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
कोयना व वारणा नदीतून वाढणाºया विसर्गामुळे
चिंतेचे ढग दाट होत आहेत. सांगली जिल्ह्यात कृष्णा व वारणा नदीकाठच्या हजारो घरांना, पिकांना आता जलसमाधी मिळत आहे. नागरिकांच्या स्थलांतराबरोबर आता व्यापारी पेठांमधील साहित्याचेही स्थलांतर
सुरू झाले आहे.
पर्यटकांची गाडी धबधब्यात कोसळली
कºहाड : कामरगाव येथील पाबळनाला धबधबा पात्रात शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसात रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे पुणे येथील पर्यटकांची गाडी धबधब्यात कोसळली. या गाडीत दोनजण असल्याचा अंदाज असून, यातील नितीन शेलार यांचा मृत्यू झाला आहे. दुसºया पर्यटकाचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
नगर जिल्ह्यात भीमा नदीला महापूर
अहमदनगर : नाशिक व पुणे जिल्ह्यातील धुवाधार पावसामुळे गोदावरी व भीमा नदीला महापूर आला आहे़ नांदूरमधमेश्वर बंधाºयातून गोदावरीत तर, दौंड पुलावरून भीमा नदीत सुरू असलेल्या विसर्गात रविवारी सायंकाळी कमालीची वाढ झाली़ रात्रीतून हा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे़ त्यामुळे नदीकाठच्या चारशेहून अधिक कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे़ नाशिक जिल्ह्यातील नांदूरमधमेश्वर बंधाºयातून सायंकाळी २ लाख ७० हजार क्सुसेकने विसर्ग सुरू होता़ पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या धुव्वाधार पावसामुळे दौंड पुलावरून भीमा नदीत १ लाख २८ हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरू होता़ पुणे व नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे़ त्यामुळे नगर जिल्ह्यातून वाहणाºया भीमा व गोदावरी नदीतील विसर्ग आणखी वाढणार आहे़ गोदावरीच्या विसर्गात वाढ होऊन रात्री तो ३ लाख १५ हजार क्युसेक होईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे़ त्यामुळे कोपरगाव, श्रीरामपूर आणि नेवासा तालुक्यातील गावांना पाण्याचा वेढा पडू शकतो़