कोल्हापूर - ‘महिलाराज’ प्रशासनात, हद्दपार राजकारणात

By admin | Published: October 3, 2014 12:03 AM2014-10-03T00:03:54+5:302014-10-03T00:04:22+5:30

जिल्ह्यात चौघीच रिंगणात : निवडणूक प्रक्रियेत प्रमुखपदांवर २७ महिला अधिकारी कार्यरत

Kolhapur - In the 'Mahilaraj' administration, expatriate politics | कोल्हापूर - ‘महिलाराज’ प्रशासनात, हद्दपार राजकारणात

कोल्हापूर - ‘महिलाराज’ प्रशासनात, हद्दपार राजकारणात

Next

अतुल आंबी - इचलकरंजी- कोल्हापूर जिल्ह्यातील निवडणुकीच्या प्रक्रियेत बारा मतदारसंघांतील महत्त्वाच्या २७ पदांवर महिला अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा विधानसभा निवडणूक २०१४ या निवडणुकीच्या निर्णय प्रक्रियेत ‘महिलाराज’ दिसून येत आहे. त्यामुळे चूल आणि मूल ही संकल्पना मागे पडत महिलाही पुरुषांच्या बरोबरीने मुख्य पदांवर नियुक्त झाल्याचे दिसत आहे. निवडणुकीच्या निमित्ताने या महिला अधिकाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार वाढला असला तरी या महिला अधिकाऱ्यांना संसार सांभाळून दोन्हीकडे न्याय द्यावा लागतो.
जिल्हा उपनिवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संगीता चौगुले या काम पाहत आहेत. त्यांच्या सहायक म्हणून नायब तहसीलदार शोभा कोळी या आहेत. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यातील मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) व्यवस्थापनाची प्रमुख जबाबदारी भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख यांच्याकडे आहे. जिल्ह्यातील निवडणूक साहित्य वाटप विभागाची जबाबदारी कोल्हापूर महापालिकेच्या उपायुक्त अश्विनी वाघमळे यांच्याकडे आहे. प्रसारमाध्यम व संपर्क व्यवस्थापन (एमसी एमसी) विभागाची प्रमुख जबाबदारी संपदा बिडकर यांच्याकडे आहे. जिल्ह्यातील सर्व केंद्रांचे आदेश तयार करणे या विभागाच्या प्रमुख म्हणून महसूल तहसीलदार वर्षा सिंघन या आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील प्रांताधिकारीपदी नियुक्त असलेल्या महिला अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. यामध्ये इचलकरंजी मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे आहेत. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कोल्हापूर शहर संजय गांधी योजना विभाग तहसीलदार जयश्री आव्हाड, तर आचारसंहिता पथकप्रमुख, कायदा व सुव्यवस्था, भरारी, देखरेख व स्थिर निरीक्षण पथक प्रमुखपदी इचलकरंजी नगरपालिकेच्या अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार आहेत.
हातकणंगले मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर या आहेत, तर सहायक म्हणून नायब तहसीलदार तेजस्विनी पाटील व रूपाली सूर्यवंशी आहेत. शिरोळ मतदारसंघात सहायक म्हणून पुरवठा विभागाच्या तहसीलदार मनीषा देशपांडे व नायब तहसीलदार अर्चना पाटील आहेत.
कागल मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी मोनिका सिंग व सहायक म्हणून नायब तहसीलदार सरस्वती पाटील आहेत. राधानगरी मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी कीर्ती नलवडे, आजरा मतदारसंघात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार शिल्पा थोकडे, भुदरगड मतदारसंघात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार शिल्पा ओसवाल, चंदगड मतदारसंघात सहायक म्हणून नायब तहसीलदार शीतल देसाई, शाहूवाडी मतदारसंघात सहायक म्हणून नायब तहसीलदार रोहिणी शंकरदास, पन्हाळा मतदारसंघात सहायक म्हणून नायब तहसीलदार अपर्णा भोरे, कोल्हापूर उत्तर मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी, सहायक म्हणून तहसीलदार कल्पना ढवळे, सुनिता नेर्लेकर, नायब तहसीलदार शैलजा पाटील व माधवी शिंदे यांचा समावेश आहे.

कोल्हापूर : पुरोगामित्वाचा वारसा असलेल्या, महाराणी ताराराणीची ओळख सांगणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन मतदारसंघात अवघ्या चारच महिलांचा समावेश आहे. त्यामुळे उमेदवारीबाबत महिलचिंी अनास्था तर निवडणूक प्रक्रियेत प्रमुखपदावर सुमारे २७ महिला अधिकारी कार्यरत असल्याने येथे ‘महिलाराज’ दिसून येत आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी व नेत्यांनी महिलांचा राजकारणांसाठी सोयीस्कर वापर केल्याचे जिल्ह्यातील चित्र दिसते.


संतोष मिठारी - कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन मतदारसंघातील अवघ्या चारच महिलांचा समावेश आहे. यात दोघी पक्षाद्वारे, तर अन्य दोघी अपक्ष म्हणून नशीब आजमावित आहेत. महिला सबलीकरणांचे कवित्व करणाऱ्या राजकीय पक्षांनी, नेतेमंडळींनी सोयीस्करपणे महिलांना उमेदवारी देण्याकडे दुर्लक्ष केले आहे.
जिल्ह्णात दहा विधानसभा मतदारसंघांपैकी चंदगड, राधानगरी आणि हातकणंगले मतदारसंघातून चार महिला निवडणूक लढवित आहेत. यातील चंदगडमध्ये माजी आमदार संध्यादेवी कुपेकर या ‘राष्ट्रवादी’, तर माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या स्वाती कोरी ‘जनता दल सेक्युलर’च्या माध्यमातून एकमेकींविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. देशातील पहिला महिला कारखाना असलेल्या भुदरगडमधील इंदिरा महिला सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष विजयमाला देसाई या राधानगरीतून आणि हातकणंगलेतून सुरेखा कांबळे अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.
अन्य मतदारसंघातील काही पुरुष उमेदवारांनी आपल्या कुटुंबातील महिलांचे अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले होते. यात अंजना रेडेकर, गंधालीदेवी संग्रामसिंह कुपेकर (चंदगड), प्रतिमा सतेज पाटील (कोल्हापूर दक्षिण), शैलाबाई नरके (करवीर), वैशाली राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर), भाग्यश्री कर्णसिंह गायकवाड (शाहूवाडी), स्मिता राजू आवळे, (हातकणंगले), स्वरूपा पाटील (शिरोळ) यांचा समावेश आहे. यांनी माघार घेतली, तर शौमिका महाडिक (कोल्हापूर दक्षिण) यांचा अर्ज ए. बी. फॉर्म नसल्याने अवैध ठरला. छाननीच्या वेळी काही दगाफटका झाल्यास तजवीज म्हणून या महिलांचे अर्ज संबंधित मतदारसंघांमधील पुरुष उमेदवारांनी भरल्याचे दिसून आले. कागल आणि इचलकरंजी मतदारसंघात उमेदवारी अथवा डमी अर्ज दाखल करण्यात देखील महिलांचा समावेश नाही. जिल्ह्यात लोकसंख्या तसेच मतदारांच्या तुलनेत असलेली पुरुषांसमवेतची बरोबरी तसेच राजकीय संघटन व प्रचारातदेखील आघाडीवर असूनही गेल्या ४२ वर्षांत आमदारकीची उमेदवारी बोटावर मोजण्याइतक्याच महिलांना मिळाली आहे. एकंदरीतपणे पाहता राजकीय पक्षांची उमेदवारी देण्याबाबतची भूमिका महिला सबलीकरणाला खीळ घालणारी असल्याचे दिसून येते.

आकडेवारी दृष्टिक्षेपात
-जिल्ह्यातील महिलांची संख्या (२०१४ नियोजित) : १९,४६,३७२
-महिला मतदारांची संख्या : १४,०३,६६७
-कर्मचारी महिला मतदारांची संख्या : ४,५३०
-महिला मतदारांची टक्केवारी : ७२.१४
निवडणुकीत यशस्वी महिला
कागल मतदारसंघातून १९५७ मध्ये ‘अपक्ष’ लढलेल्या विमलताई बागल या निवडून आल्या. त्यांना संयुक्त महाराष्ट्र समितीने पाठिंबा दिला होता. १९८५ मध्ये शिरोळ मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार सरोजिनी खंजिरे या ४९,१०३ मतांनी विजयी झाल्या होत्या. शाहूवाडी मतदारसंघाची आॅक्टोबर २००० मध्ये पोटनिवडणूक झाली. यात काँग्रेसच्या संजीवनीदेवी संजयसिंह गायकवाड यांनी ५५,२०९ मतांनी बाजी मारली होती. गतवर्षी झालेल्या चंदगडमधील पोटनिवडणुकीत संध्यादेवी बाबासाहेब कुपेकर विजयी झाल्या.
जिल्ह्यातील महिला आमदार
-विमलताई बागल - कागल (१९५७, अपक्ष)
-सरोजिनी खंजिरे-शिरोळ (१९८५, काँग्रेस)
-संजीवनीदेवी गायकवाड - शाहूवाडी (२००३, काँग्रेस)
-संध्यादेवी कुपेकर- चंदगड (२०१३, राष्ट्रवादी)

यांचाही सहभाग
उपजिल्हाधिकारी : डॉ. स्वाती देशमुख
महसूल तहसीलदार : वर्षा सिंघन
मनपा उपायुक्त : अश्विनी वाघमळे
अतिरिक्त मुख्याधिकारी: प्रज्ञा पोतदार
तहसीलदार : मनीषा देशपांडे
तहसीलदार : शिल्पा थोकडे
तहसीलदार : शिल्पा ओसवाल
नायब तहसीलदार : सरस्वती पाटील, शोभा कोळी, तेजस्विनी पाटील, रूपाली सूर्यवंशी, अर्चना पाटील

प्रमुख अधिकारी
उपजिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी : संगीता चौगुले
इचलकरंजी मतदार संघ निवडणुक निर्णय अधिकारी : अश्विनी जिरंगे
हातकणंगले मतदार संघ निवडणुक निर्णय अधिकारी : विद्युत वरखेडकर
कागल मतदार संघ निवडणूक निर्णय अधिकारी : मोनिका सिंग
राधानगरी मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी : कीर्ती नलवडे
कोल्हापूर उत्तर मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी : किरण कुलकर्णी

Web Title: Kolhapur - In the 'Mahilaraj' administration, expatriate politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.