कोल्हापूर महापालिका सभेत ‘पुजारी हटाव’ ठराव मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 01:59 AM2017-07-21T01:59:46+5:302017-07-21T01:59:46+5:30
पंढरपूर, शिर्डी, तुळजापूर येथील मंदिराप्रमाणे करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरातील तथाकथित हक्कदार पुजारी हटवावेत, बहुजन समाजातील लायक
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पंढरपूर, शिर्डी, तुळजापूर येथील मंदिराप्रमाणे करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरातील तथाकथित हक्कदार पुजारी हटवावेत, बहुजन समाजातील लायक, चारित्र्यसंपन्न, निर्व्यसनी, सुशिक्षित पुजाऱ्यांची पगारी नोकर म्हणून नेमणूक करावी, अशा स्वरूपाचा ठराव महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. अंबाबाईची वेशभूषा परंपरेप्रमाणे काठापदराची साडी हे वस्त्रच कायम असले पाहिजे, कोल्हापूर-मुंबई या मार्गावर धावणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेस रेल्वेगाडीचे नाव अंबाबाई एक्स्प्रेस करण्यात यावे, कोल्हापूर-तिरुपती मार्गावर धावणाऱ्या हरिप्रिया एक्स्पे्रस गाडीचे नाव हरिमाता असे ठेवण्यात यावे, असेही ठरावात म्हटले आहे. राजर्षी शाहू महाराज यांचे वटहुकूम व सनद आज्ञापत्रे हे तथाकथित आहेत असे लेखी पत्रक काढून शाहू महाराजांचा अवमान करणाऱ्या पुजाऱ्यांचा निषेध करण्यात आला.
श्रीपूजकांविरोधात आणखी ३०० पानी पुरावे सादर
श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ मागणीसाठी समितीने जिल्हाधिकाऱ्यांसमोर ३०० पानी पुरावे सादर केले. यात शाहूकालीन आणखी वटहुकूम, वहिवाटदाराला दहा रुपयांच्या वर उत्पन्न घेण्याचा अधिकार नसलेला आदेश, भारत सरकार व छत्रपती संस्थानचा करार, प्रधानांची वहिवाट रद्द केल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अशा पुराव्यांचा समावेश आहे.