कोल्हापूर, सांगली, साताऱ्याला वळीवाने झोडपले
By admin | Published: May 4, 2017 04:08 AM2017-05-04T04:08:53+5:302017-05-04T04:08:53+5:30
गेले अनेक दिवस हुलकावणी देणाऱ्या वळवाने अखेर बुधवारी सायंकाळी कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यात दमदार हजेरी लावली
मुंबई/कोल्हापूर : गेले अनेक दिवस हुलकावणी देणाऱ्या वळवाने अखेर बुधवारी सायंकाळी कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. कऱ्हाडसह परिसरात वादळी वाऱ्याने थैमान घातले.सुमारे तासभर झालेल्या गारपिटीने शहराला अक्षरश: झोडपून काढले. उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला. कोकणासह मराठवाड्यातील काही भागातही पावसाने हजेरी लावली.
कधी नव्हे ते यंदा उष्णतेच्या लाटेत पश्चिम महाराष्ट्रातील बागायती पट्टाही होरपळून गेला आहे. कडाक्याच्या उन्हाने नागरिक हैराण झाले असताना दुसऱ्या वेळी वळीवाने परिसराला झोडपले.वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आल्याने कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. दसरा चौकातील जुने डेरेदार झाड, तर नागाळा पार्क येथील चिपडे सराफ यांच्या दारातील झाड भुईसपाट झाले. अनेक ठिकाण डिजिटल फलक तुटून पडले होते.
सांगली शहरासह शिराळा, तासगाव तालुक्यात गारपीट झाली. तासगाव शहरासह सावळज परिसरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. दुपारच्या सुमारास शिराळा तालुक्यातील येळापूर, मेणीसह गुढे-पाचगणी परिसरात वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह गारपीट झाली. एक तास मुसळधार पाऊस पडल्याने नाले, गटारींसह ओढे भरून वाहत होते. कोकणात सिंधुदुर्ग जिल्हावासीयांना पावसाने काहीसा दिलासा दिला. सावंतवाडी तालुक्यातील वेर्ले, शिरशिंगे व सांगेली या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वैभववाडी तालुक्यातही हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे आठवडा बाजाराला आलेल्यांची तारांबळ उडाली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सांगलीत शेतकऱ्याचा मृत्यू
आष्टा (जि. सांगली) : येथील माणिक दत्तात्रय बावडेकर (वय ४३, रा. बसुगडे मळा) या शेतकऱ्याचा विजेचा धक्का बसल्याने मृत्यू झाला. खानापूर तालुक्यातील पळशी येथे वीज कोसळून डोंगरपायथ्याशी चरत असलेल्या १९ शेळ्या मृत्युमुखी पडल्या.
मराठवाडा : वीज पडून शेतकरी ठार
उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील येणेगूर येथे अंगावर वीज पडल्याने चंद्रकांत जयवंता गाडेकर (५६) या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. येणेगूरसह परिसरात सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. हिंगोली परिसरातही सायंकाळी पाऊस झाला. दहा मिनिटं झालेल्या पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेली हळद काही प्रमाणात भिजली़
आज विदर्भात वादळी पावसाची शक्यता
विदर्भातील गोंदिया, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, अमरावती या परिसरात गुरुवारी आकाश ढगाळ राहणार असून, गडगडाटी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़