कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पूरस्थिती कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 02:44 AM2019-08-09T02:44:47+5:302019-08-09T02:45:23+5:30
मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी : पाणीपातळी झाली कमी पण अडचणी वाढल्या; पेट्रोल, पाणी, दुधाची टंचाई
कोल्हापूर : कोयना धरणातून कमी झालेला पाण्याचा विसर्ग, राधानगरी धरणक्षेत्रामध्ये तुलनेत कमी झालेला पाऊस यामुळे कोल्हापूर शहरातील पाण्याची पातळी थोडी कमी झाली आहे. मात्र पेट्रोल, डिझेल, पिण्याचे पाणी, दूध, भाजीटंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शिरोळ तालुक्यातील पूरस्थिती मात्र अजूनही गंभीरच आहे. गुरुवारी सायंकाळच्या माहितीनुसार कोयना धरणातून विसर्ग कमी करण्यात आला असून राधानगरी धरणाचे ३ दरवाजे बंद झाल्याने थोडा दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सहकारी मंत्र्यांसह कोल्हापूर, सांगलीचा दौरा केला. जिल्ह्यातील २३३ गावे बाधित असून १८ गावांना पुराचा वेढा आहे. २१ हजार कुटुंबांना झळ बसली असून आतापर्यंत १ लाख लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. सध्या ६० बोटींच्या सहकार्याने ४२५ जवान नागरिकांची सुटका करीत आहेत. स्वयंसेवी संस्था आणि कार्यकर्त्यांच्या समन्वयातून अजूनही नागरिकांना अपार्टमेंटमध्ून बाहेर काढण्यात येत आहे. शिरोळ तालुक्यातील आठ गावे पुराच्या पाण्याने वेढली असून तेथे मात्र अजूनही मदत आवश्यक आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातून गोकूळ संघ रोज ९ लाख ५० हजार लीटर दुधाचे संकलन करतो. मात्र गुरुवारी संकलन झाले नाही. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग बंद असल्याने पुणे आणि मुंबई येथे दुधाचा एक थेंब पाठविण्यात आला नाही. भाजीपालाटंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे कोल्हापूरच्या रस्त्यांची चाळण झाली असून दुसरीकडे पेट्रोल आणी डिझेल टंचाईने नागरिक त्रस्त झाले आहेत.
सांगली : ३५ हजारांवर लोक अडकले; मदतयंत्रणा अपुरी
सांगली : जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील विविध गावांमध्ये महापुराच्या कचाट्यात ३५ हजारांहून लोक अडकल्याने त्यांच्या मदतकार्यामध्ये अडचणी येत आहेत. कोयना व वारणा धरणातील विसर्ग कमी झाल्याने पूरग्रस्तांना दिलासा मिळाला असून, शुक्रवारी सकाळपासून पाणीपातळी उतरण्यास सुरुवात होईल, असा अंदाज आहे.
पलूस तालुक्यात अजूनही ५ हजारांवर नागरिक महापुरात अडकले आहेत. यात भिलवडीतील संख्या अधिक आहे. कुणी घराच्या दुसऱ्या मजल्यावर, तर कुणी घराच्या टेरेसवर बसून मदतकार्याची प्रतीक्षा करीत असल्याचे चित्र आहे. ३५ हजारांवर लोक अडकले असताना जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण पथक, लष्कर यांच्याकडे असलेली बचावकार्यातील यंत्रणा अत्यंत कमी आहे. बुधवारी दिलेल्या अहवालानुसार बचावकार्यात केवळ २२ बोटी होत्या. अडकलेल्या पूरग्रस्तांची संख्या व बोटींची संख्या मर्यादित असल्यामुळे मदतकार्यास मर्यादा येत आहेत. अडकलेल्या लोकांचे अन्न-पाण्यावाचून मोठे हाल होत आहेत.
कऱ्हाडलाही दिलासा
सातारा : कºहाड आणि पाटण तालुक्यातील पूरस्थिती कमी होऊ लागली असली तरी अजूनही जनजीवन पूर्वपदावर आलेले नाही. त्यातच पाऊस पडत असल्याने नागरिकांत पुराची धास्ती कायम आहे. तर कोयना धरणाचे दरवाजे आठ फुटांपर्यंत खाली आणल्याने विसर्ग कमी झाला असून, पाटणसह तालुक्यातील वीजपुरवठा खंडित आहे. कºहाडचा महापुराचा विळखा सैल झालाय.
सांगली पाण्यात, पालकमंत्री पुण्यात
पुणे : पुरात अडकलेल्या सांगलीला वाºयावर सोडून सांगलीचे पालकमंत्री तथा सहकार मंत्री सुभाष देशमुख पुण्यात भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बैठकीला गुरुवारी उपस्थित राहिले. त्यांनी उपस्थित बुथकेंद्र कार्यकर्त्यांना मतदारांबरोबर संपर्क कसा ठेवायचा याचा सल्लाही दिला. मात्र, सांगली जिल्ह्यात भयानक पूरस्थिती असताना पालकमंत्री पुण्यात बैठकीत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
डीपी रस्त्यावरील एका कार्यालयात ही बैठक झाली. पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघांतील पक्षाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. देशमुख यांच्याकडे भाजपचे पुणे शहराचे प्रभारी म्हणून संघटनात्मक जबाबदारी आहे, मात्र ते पालकमंत्री असलेल्या सांगलीला पुराच्या पाण्याने वेढले असून लोक भयभीत झाले आहेत. त्यांना दिलासा देण्याऐवजी मंत्री देशमुख संघटनेच्या बैठकीला आवर्जून उपस्थित होते. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून, नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
राष्ट्रवादीचे खासदार, आमदार देणार एक महिन्याचा पगार
मुंबई : राज्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग हे जिल्हे पुराचा सामना करीत आहेत. १० जिल्ह्यांत पूरग्रस्त परिस्थिती असताना मुख्यमंत्री प्रचारात मग्न होते. माध्यमांधून ओरड झाल्यानंतर ते आज त्या भागात गेले, हे बेजबाबदारपणाचे लक्षण आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष म्हणून पदभार घेतल्यानंतर ते बोलत होते. राज्यात पूरपरिस्थिती असताना मुख्यमंत्री कॅबिनेट बैठकीत जमीनवाटपाची चर्चा करतात. विरोधक आपली जबाबदारी बजावत आहेत. आमचे आमदार, खासदार आपला एक महिन्याचा पगार पूरग्रस्तासाठी देतील असे मलिक यांनी सांगितले.
२६ जुलै २००५ रोजी पूरपरिस्थिती आली होती तेव्हा विलासराव देशमुख यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून तत्काळ यंत्रणा सक्षम केली होती. याआधी कोल्हापूर पुरात सापडले होते तेव्हा आघाडी सरकारचे अर्धे मंत्रिमंडळ तेथे मुक्काम ठोकून होते; मात्र पालकमंत्री चंद्रकांत पाटीलही पहिले तीन दिवस फिरकले नाहीत. मागील दहा दिवसांपासून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. कित्येक ठिकाणी अन्नाचा तुटवडा निर्माण झाल्याचेही मलिक यांनी सांगितले.
अलमट्टीतून ५ लाख क्युसेक पाणी सोडा - मुख्यमंत्री
कोल्हापूर : सांगली आणि कोल्हापूरची पूरस्थिती गंभीर आहे. त्यामुळेच चार लाखांवरील पाणी विसर्ग पाच लाख क्युसेक करा, अशी मागणी मी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याकडे केली आहे. त्याच पद्धतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही येडियुरप्पा यांना तशी सूचना केली आहे. त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर परिस्थिती सुधारेल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
सांगली कºहाडच्या पूरस्थितीची हवाई पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले, पूर ओसरल्यानंतरही मोठे सहकार्य करावे लागणार आहे. ज्यांच्या घराचे नुकसान झाले आहे त्यांना मदत केली जाईल. पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांनाही नुकसानभरपाई दिली जाईल. केंद्र सरकारचे संपूर्ण सहकार्य मिळत आहे.
पूरग्रस्तांबाबत सरकारला गांभीर्य नाही - थोरात
मुंबई : कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांमधील लाखो लोक पुरामुळे बेघर झाले आहेत. पण महाजनादेश यात्रेच्या जल्लोषात मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत पूरग्रस्तांचा व्यथा पोहोचू शकल्या नाहीत. पालकमंत्री जिल्ह्यात फिरकलेही नाहीत. या सरकारमध्ये पालकमंत्री फक्त ध्वजारोहण करण्यासाठीच नेमले आहेत का, असा संतप्त सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळसाहेब थोरात यांनी केला.
राज्य आणि केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्यामुळेच पूर परिस्थिती एवढी गंभीर झाली आहे. एरव्ही प्रत्येक गोष्टीवर ट्विट करणाºया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील पूरस्थितीची अद्याप साधी दखलही घेतली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.