कोल्हापूर-सांगलीत महापुरामुळे ७९५ जनावरे दगावली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 05:04 AM2019-08-17T05:04:38+5:302019-08-17T05:05:35+5:30
कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात प्रलयकारी महापुराने जनजीवन उद्ध्वस्त झाले
कोल्हापूर/सांगली : कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात प्रलयकारी महापुराने जनजीवन उद्ध्वस्त झाले असून शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. या तीन जिल्ह्यांत ७९५ जनावरे पुराच्या पाण्यात दगावल्याने गोठेच्या गोठे ओस पडले आहेत.
सांगली व कोल्हापुरात पोल्ट्री उद्योगाचेही मोठे नुकसान झाले असून तब्बल ४० हजार ६७६ कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या आहेत. पूर ओसरू लागल्याने मृत जनावरे सापडत आहेत. हा आकडा वाढण्याची भिती प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. शेतीला जोडधंदा म्हणून दूध व कुक्कुटपालन व्यवसायास ग्रामीण भागात सुरूवात झाली. पण लहरी हवामान व शेतीमालाच्या दरातील अनिश्चितेमुळे शेती अडचणीत आली. त्यावेळी दूध व्यवसायाने शेतकऱ्यांना सावरले. किंबहुना दुधामुळेच शेतक-यांचे संसार उभे राहिले. दुभती जनावरे घरात नाही, असे एक घर येथे बघायला मिळत नाही. त्यामुळे गेल्या दहा वर्षात पशुधनात दीडपटीने वाढ झाली आहे.
पोल्ट्रीचेही मोठे नुकसान झाले. आठ दिवसांत जिल्ह्यात १९,५३० कोंबड्या दगावल्या असून सर्वाधिक ८६७० कोंबड्या गडहिंग्लज तालुक्यातील आहेत. पोल्ट्री उद्योगावर अस्मानी संकट कोसळल्याने पोल्ट्री चालक हवालदिल झाले आहेत.
पोल्ट्री उद्योगाबरोबरच जनावरांनाही पुराचा झटका बसला आहे. पुराच्या पाण्यात जिल्ह्यातील अडीचशेहून अधिक जनावरे मृत्यूमुखी पडली. आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात २५४ जनावरांची विल्हेवाट लावण्यात प्रशासनाला यश आले आहे.
सांगली नगर वाचनालयाचे कार्यवाह अतुल गिजरे म्हणाले की, वाचनालयातील अनमोल ग्रंथसंपदा नष्ट झाली आहे. व्यवहार मूळ पदावर यायला किमान तीन-चार महिने लागतील. भिजलेली पुस्तके बाहेर आणून टाकली आहेत.
सर्व व्यवहार सुरळीत होण्यास सुरुवात
कोल्हापूर शहरासह पूरग्रस्त भागातील व्यवहार काही प्रमाणात सुरळीत होण्यास सुरूवात झाली आहे. पूरग्रस्त भागात स्वच्छतेचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणची एटीएम मशीन पूर परिस्थितीमुळे बाधीत झाली आहेत. त्यामुळे बँकांमध्ये शुक्रवारी दिवसभर रोकड काढण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. तर शहरातील व्यापारी, दुकाने, कार्यालये आदींमध्ये स्वच्छता मोहीम तीव्र करण्यात आली आहे.
विश्वजीत कदम यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
कडेगाव (जि.सांगली) : नुकसान भरपाईच्या दुप्पट रक्कम पूरग्रस्तांना द्यावी, १०० टक्के कर्जमाफीचा निर्णय घ्यावा आदी १५ मागण्या प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत नुकसानीचा आढावा घेऊन ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
पंंचनाम्यांसाठी अन्य जिल्ह्यांतून तलाठी
पूरग्रस्तांची संख्या पाहता पंचनाम्यासाठी इतर जिल्ह्यांतून तलाठी, अव्वल कारकून आणि अभियंते मागविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी घेतला आहे. रेल्वे वाहतूक शुक्रवारी सुरू झाली. जिल्हा परिषदेत असलेले जिल्हाधिकारी कार्यालय पुन्हा मूळ ठिकाणी कार्यरत झाले आहे.