कोल्हापूर, सांगलीसह नगर, नाशिकला पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 07:13 AM2019-06-24T07:13:40+5:302019-06-24T07:13:52+5:30
नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल मध्य महाराष्ट्राचा आणखी काही भाग, मराठवाड्याचा बहुतांश भागांत व विदर्भात सुरू झाली आहे.
- मुंबई/कोल्हापूर/औरंगाबाद/
नागपूर/नाशिक : नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल मध्य महाराष्ट्राचा आणखी काही भाग, मराठवाड्याचा बहुतांश भागांत व विदर्भात सुरू झाली आहे. रविवारी कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह नाशिक, अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यातील काही भागांत तसेच विदर्भात चांगला पाऊस झाला.
कोल्हापूरला सायंकाळी तासभर पावसाने झोडपून काढले. त्यामुळे शहरात पाणीच पाणी झाले. सांगली जिल्ह्याच्या बहुतांश भागात पाऊस झाला. सातारा शहरातही पावसाने हजेरी लावली. कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. अहमदनगर जिल्ह्यात ब्राह्मणगावात शनिवारी रात्री अतिवृष्टी झाली. अडीच तासांत १२५ मिलिमीटर पाऊस झाला. धारणगाव, कोपरगाव येथे घरांमध्ये पाणी शिरले होते.
औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी रात्री व रविवारी सकाळी अनेक भागांत दमदार पाऊस झाल्याने बळीराजा आनंदला आहे. नाशिक जिल्ह्यात येवला तालुक्यात शनिवारी रात्री पहिल्याच पावसाने दाणादाण उडविली. विदर्भात भंडारा, नागपूर, यवतमाळ, वर्धा, अमरावती जिल्ह्यात पाऊस झाला. वादळी पावसाने अमरावती जिल्ह्यात १०५ घरांचे नुकसान झाले आहे. राज्यात मान्सून सक्रीय झाला असला, तरी पावसाचे प्रमाण कमी आहे.
मान्सून उत्तर प्रदेशात, मुंबई कोरडीच!
अनुकूल हवामानामुळे मान्सूनचा प्रवास आता पूर्वोत्तरेकडील राज्यांच्या दिशेने वेगाने होत आहे. रविवारी मान्सूनने मध्य महाराष्ट्राचा काही भाग, मराठवाड्यासह विदर्भाचा काही भाग आणि उत्तर प्रदेशचा आणखी काही भाग व्यापला आहे. पूर्वोत्तरेकडील राज्यांच्या दिशेने मान्सून आगेकूच करत असतानाच, दुसरीकडे मुंबई मात्र कोरडीच आहे. मान्सून मुंबईत दाखल होण्यास मंगळवार उजाडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.