कोल्हापूर, सांगलीत छापे
By Admin | Published: October 22, 2016 11:43 PM2016-10-22T23:43:01+5:302016-10-23T00:54:57+5:30
साखर वाहतुकीत घोटाळा : रेल्वेला कोट्यवधीचा गंडा; सीबीआय पथकाकडून तपासणी
मिरज : रेल्वेद्वारे साखर वाहतुकीत कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयच्या पथकाने कोल्हापूर व सांगली येथील रेल्वे अधिकारी, कर्मचारी व मालवाहतूक ठेकेदारांच्या घरावर छापेटाकून तपासणी केली. सांगलीतील एका साखर कारखान्यास वाहतुकीसाठी नियमबाह्य सवलत देऊन रेल्वेचे कोट्यवधींचे नुकसान केल्याप्रकरणी सीबीआयने कागदपत्रे ताब्यात घेतली असून, संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली सुरू असल्याने खळबळ उडाली आहे.
सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील साखर कारखान्यांची साखर रेल्वेद्वारे मोठ्या प्रमाणात निर्यात करण्यात येते. महिन्याला लाखो टन साखर देशभरात निर्यात होत असल्याने माल वाहतुकीपासून रेल्वेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. साखर वाहतुकीसाठी रेल्वेकडून साखर कारखान्यांना सवलत देण्यात येते. साखर निर्यात करणाऱ्या कारखान्यांना दरवर्षी वेगवेगळ्या टक्केवारीनुसार रेल्वेकडून वाहतूक दरात सवलत मिळते. मालवाहतुकीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठीही साखर वाहतूकदारांना मालवाहतूक भाड्यात सवलत देण्यात येते.
कोल्हापूर व सांगली रेल्वेस्थानकातील मालधक्क्यावरून दरमहा लाखो टन साखर निर्यात होते. तीन वर्षांपूर्वी सांगलीतून एका कारखान्याची साखर आसाम येथे पाठविण्यात आली. मालगाडीत साखर भरण्याची जबाबदारी कोल्हापुरातील राजू नामक ठेकेदाराकडे आहे. राजू याने
संबंधित साखर कारखान्यास १० टक्के सवलत द्यावयाची असताना ३० टक्के सवलत दिली. २० टक्केजादा सवलत देण्यात आल्यामुळे रेल्वेचे सुमारे ९८ लाखांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणाची तक्रार रेल्वे प्रशासनाने केंद्रीय अन्वेषण विभागाकडे केल्यानंतर पुणे येथील सीबीआयच्या पथकाने आठ दिवसांपूर्वी कोल्हापुरातील ठेकेदार राजू, सांगलीत रेल्वे मालवाहतूक पर्यवेक्षक व लिपिकांच्या घरावर छापे टाकून तपासणी केली.
छाप्यात कागदपत्रे ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली. जप्त
केलेल्या कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांवर सीबीआयकडून अपहाराचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)
ठेकेदार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना वसुलीची नोटीसरेल्वे प्रशासनाने ठेकेदार राजू व तत्कालीन मालवाहतूक अधिकारी, कर्मचाऱ्यांना वसुलीची नोटीस बजावली आहे. त्यांनी कारखान्याशी संगनमत करून रेल्वेचे नुकसान केल्याचा आरोप आहे. सांगलीतील संबंधित साखर कारखान्याचे अधिकारीही याप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात आहेत. मालवाहतूक विभागाचे रेल्वे अधिकारी हिशेबातील चूक असल्याचे सांगून याप्रकरणी सारवासारव करीत आहेत.