कोल्हापुरात राज्यातील सर्वात उंच 303 फूट उंचीचा तिरंगा
By Admin | Published: May 1, 2017 10:03 AM2017-05-01T10:03:29+5:302017-05-01T11:41:29+5:30
पोलीस मुख्यालय परिसरातील पोलीस उद्यानात देशातील दुसरा व राज्यातील सर्वात उंच राष्ट्रध्वज स्तंभ उभारण्यात आला आहे
>ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 1 - वाघा बॉर्डरनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच अशा 303 फुट उंचीच्या ध्वजस्तंभावर सोमवारी पहाटे 5 वाजून 48 मिनिटांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तिरंगा डौलाने आसंमतात फडकला. हा क्षण डोळ्यात साठवताना प्रत्येकजण उंच मान करुन आकाशात डौलाने फडकणाऱ्या राष्ट्रध्वजाकडे अभिमानाने पाहात होता.
कोल्हापूर रस्ते सौदर्यीकरण प्रकल्पातंर्गत कोल्हापूर पोलीस उद्यानामध्ये 303 फुट उंचीच्या ध्वजस्तंभ उभारण्यात आला असून आज सकाळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रिमोटच्या सहाय्याने राष्ट्रध्वज फडकावण्यात आला. यावेळी पालकमंत्र्यांच्या पत्नी सौ. अंजली चंद्रकांत पाटील, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील व त्यांच्या पत्नी सौ. रुपाली विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधिक्षक महादेव तांबडे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, केएसबीपीचे सुजय पित्रे यांच्यासह अनेक मान्यवर, अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
दुरवस्था झालेल्या पोलीस उद्यानाचा कोल्हापूर रस्ते सौदर्यीकरण प्रकल्पातंर्गत कायापालट करण्यात आला असून या पोलीस उद्यानामध्ये देशातील दुसऱ्या क्रमांकाचा आणि राज्यातील सर्वात ऊंच असा 303 फूट उंचीचा भव्य ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. या ध्वजस्तंभावर 90 फुट लांब व 60 फुट रुंद अशा 5 हजार 400 चौरस फुटाचा राष्ट्रध्वज आज फडकवण्यात आला.
कोल्हापूर शहराच्या सर्व बाजूंनी हा राष्ट्रध्वज सहज दिसू शकेल, इतका उंच असून उद्यानात 1857 ते 1947 या काळातील भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची मांडणी महालढ्याचं महाकाव्य या रुपात जयगान अंतर्गत भव्य प्रदर्शन साकारण्यात आले आहे.
याबरोबरच बलिदान, शांतता आणि समृद्धी याचं प्रतिक असणाऱ्या केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या रंगातून भित्तीचित्र साकारण्यात आले आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांपासून देशासाठी बलिदान केलेल्या अनेक स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमा केशरी रंगामध्ये रेखाटल्या आहेत, तर पांढऱ्या रंगामध्ये महात्मा गांधी आणि गौतम बुद्ध यांच्या शांतीचा संदेश देणाऱ्या प्रतिमा आहेत.
तसेच हिरव्या रंगामध्ये समृद्धीने नटलेला भारत रेखाटला आहे. "आय लव्ह कोल्हापूर" या अक्षरांमधून कोल्हापूरची सर्व वैशिष्टे दर्शवणारा सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला आहे. तसेच राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमाही लावण्यात आल्या आहेत. तर विविध फुलझाडांनी उद्यान आकर्षक बनविले आहेच पण त्यातून केलेल्या रंगीबेरंगी रोषणाईने वातावरण अधिकच मोहक बनविले आहे.
303 फुट उंचीच्या ध्वजस्तंभ हा कोल्हापूरच नव्हे तर देशातील जनतेचा अभिमान वाढवणाराच असून हा सुंदर प्रकल्प कोल्हापुरात साकारला याचा सार्थ अभिमान वाटतो, अशा शब्दात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कोल्हापूर रस्ते सौदर्यीकरण प्रकल्पातंर्गत कोल्हापूर पोलीस उद्यान अधिक आकर्षक आणि देखणं झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
ध्वजस्तंभाची वैशिष्ट्ये
उद्यानातील प्रशस्त जागेत हा ३०३ फूट उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. वजन २४ टन, ध्वजस्तंभाचा बेस ५ फूट, तिरंगा ध्वज ९0 फूट लांब व साठ फूट रूंद म्हणजे ५४00 चौरस फुटांचा आहे. उंचावरील वाऱ्याच्या झोताने ध्वजाचे नुकसान होऊ नये म्हणून त्यासाठी स्पेशल पॉलिस्टर पॅराशुट फॅब्रिक्सचे कापड वापरले आहे. त्यामुळे शहराच्या कोणत्याही भागातून या स्तंभावर फडकणारा तिरंगा लक्ष वेधून घेणार आहे. तो चौवीस तास विद्युत रोषणाईच्या झोतात फडकणार आहे. त्यासाठी स्वतंत्र जनरेटरची सोय केली आहे. ध्वजसंहिता नियमानुसार त्याची तंतोतंत अंमलबजावणी केली जाणार आहे. उद्यान व ध्वजस्तंभाच्या देखभाल दूरस्तीसाठी सात कर्मचारी ठेवले जातील. दोन पोलीस शिपाई चोवीस तास पहारा देतील. याठिकाणी येणा-या पर्यटकांना माहिती सांगण्यासाठी प्रशिक्षक (गाईड) ठेवला जाणार आहे. या ध्वजस्तंभाचा महिना ७० हजार रुपये दूरुस्ती खर्च आहे.