कोल्हापूरमध्ये टोलने केला भाजपाचा घात!
By admin | Published: November 3, 2015 02:33 AM2015-11-03T02:33:45+5:302015-11-03T02:33:45+5:30
तीन पक्षांतून कुटुंबातील तिघे राजकारण करणारे आमदार महादेवराव महाडिक शहाणे की कोल्हापूरची जनता, असा प्रश्न या निवडणुकीत उपस्थित झाला होता. अत्यंत अटीतटीने झालेल्या निवडणुकीत
- विश्वास पाटील (कोल्हापूर विश्लेषण)
तीन पक्षांतून कुटुंबातील तिघे राजकारण करणारे आमदार महादेवराव महाडिक शहाणे की कोल्हापूरची जनता, असा प्रश्न या निवडणुकीत उपस्थित झाला होता. अत्यंत अटीतटीने झालेल्या निवडणुकीत जनतेने दोन्ही काँग्रेसकडे सत्ता सोपवून महाडिक यांच्या राजकारणाला चपराक दिली. शिवाय, त्यांची संगत करणाऱ्या भाजपालाही फटकारले. पक्षीय निष्ठा, राजकीय बांधिलकी गुंडाळून ठेवून तुम्ही रोज एक भूमिका घेणार असाल, तर जनता अद्दल घडविल्याशिवाय राहत नाही, याची चुणूक दाखविणारा हा निकाल आहे.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीत टोलच्या प्रश्नाने भाजपाचा पुरता घात केल्याने, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता कायम राखण्यात बाजी मारली. ही निवडणूक अनेक अर्थाने लक्षवेधी ठरली होती. भाजपा-शिवसेनेच्या राज्यस्तरीय संबंधावर परिणाम करणारी निवडणूक म्हणूनही तिच्याकडे पाहिले गेले. कारण याच निवडणुकीच्या प्रचारात या दोन सत्तेतल्या पक्षांनी एकमेकांना शड्डू ठोकले.
विधानसभेच्या निवडणुकीनंतर झालेल्या या निवडणुकीत मुख्यत: भाजपाचे भवितव्य पणाला लागले होते, परंतु मतदारांनी भाजपाच्या पारड्यात मर्यादित यश टाकले. शिवसेनेचा दारुण पराभव झाला. या पक्षाला कशाबशा चारच जागा मिळाल्या. ‘शिवसेनेपेक्षा जास्त जिंकायचे’ भाजपाचे स्वप्न साकार झाले, तरी त्यांना महापालिकेवर मात्र सत्तेचे कमळ फुलविता आले नाही. विधानसभा निवडणुकीत जे लोकमानस होते, तेच वर्षभरानंतर कायम आहे का, याचीही लिटमस टेस्ट म्हणून या निकालाकडे पाहिले गेले, परंतु त्यामध्ये भाजपाचा त्या वेळेचा जनाधार कमी झाल्याचे निकालाने दाखवून दिले. या निवडणुकीत भाजपाने काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार महादेवराव महाडिक यांच्याशी हातमिळवणी केल्यामुळे, त्यांच्यावर टीकेचा भडिमार झाला. भाजपाने काही मटकेवाले, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनाही उमेदवारी दिली. साधनशुचितेचा आव आणणारा पक्ष सत्तेसाठी कोणालाही मिठ्या मारतो, असे चित्र त्यातून लोकांना पाहायला मिळाले. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी एकाकी झुंज देऊन काँग्रेसला सर्वाधिक जागा जिंकून दिल्या. विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपाही त्यांनी या निकालाने काढला. काँग्रेसच्या राजकारणात महाडिक व सतेज पाटील यांच्यातील संघर्षाची धारही या लढतीला होती. त्यात सतेज यांनी बाजी मारली असून, त्यांचे यापुढील टार्गेट आता महाडिक यांची विधान परिषदेची निवडणूक असणार हेदेखील निश्चित झाले. महाराष्ट्राच्या राजकारणात गाजलेल्या टोलने विधानसभेला सतेज पाटील यांचा पराभव केला, परंतु तोच टोल रद्द करण्याचे आश्वासन देऊनही भाजपाचा पराभव वाचवू शकला नाही. राज्य सरकारने दिलेले आश्वासन मतदारांना भुरळ घालू शकले नाही. विधानसभा निवडणुकीत १०पैकी ६ जागा शिवसेनेला आणि प्रत्येकी २ भाजपा व राष्ट्रवादीला मिळाल्या होत्या. काँग्रेसचा दारुण पराभव झाला
होता. त्यामुळे महापालिकेत काँग्रेसची स्थिती काय राहणार? याबद्दल लोकांत उत्सुकता होती, परंतु या निवडणुकीने काँग्रेसचा झेंडा पुन्हा फडकल्याचे चित्र शहरात दिसले. शिवसेनेला मर्यादित यश मिळाले. पक्षाचे चारच नगरसेवक होते, तेवढेच या वेळेलाही निवडून आले. ताकदीच्या उमेदवारांची वानवा, संघटनात्मक पाया नाही आणि आर्थिक बळ कमी पडल्याने शिवसेना पराभूत झाली. मतदारांनी प्रस्थापित उमेदवारांना पराभवाची धूळ चारली. पैशांचा प्रचंड वापर झाला, तरीही मतदारांनी ज्यांना निवडून द्यायचे आहे, त्यांनाच मतदान केल्याचेही निकालावरून दिसले.