पर्यटनाच्या रडारवर कोल्हापूर

By admin | Published: July 16, 2015 12:40 AM2015-07-16T00:40:12+5:302015-07-16T00:40:12+5:30

पाठपुराव्याची गरज : आराखडा दोन वर्षापूर्वीच तयार होवूनही बंद कपाटात

Kolhapur on tourism radar | पर्यटनाच्या रडारवर कोल्हापूर

पर्यटनाच्या रडारवर कोल्हापूर

Next

भारत चव्हाण -कोल्हापूर
देशातील एक सुंदर शहर, हिरवागार निसर्ग, जगप्रसिद्ध धबधब्यांशी स्पर्धा करणारे लहान-मोठे धबधबे, जिभेचे चोचले पुरविणाऱ्या स्वादिष्ट खाद्यपदार्थांची रेलचेल, ऐतिहासिक वारशाची साक्ष देणाऱ्या वास्तू आणि किल्ले, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिलालेख व पेंटिंग्जचा खजिना, धार्मिक सणावळी व उत्सवांची मांदियाळी, लोकनृत्यांची परंपरा आणि मर्दानी खेळांचा इतिहासकालीन बाज, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ फुलविणाऱ्या फुलांच्या बागा असं पर्यटनाच्या दृष्टीनं कोल्हापूरला मिळालेलं वैभव जगासमोर नव्यानं मांडणारा कोल्हापूरचा पर्यटन आराखडा विधानसभेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने चर्चेत आला आहे. कोल्हापूरला जगाच्या पर्यटन नकाशावर घेऊन जाणारा हा आराखडा तयार करून दोन वर्षे पूर्ण झाली; पण आजअखेर तो मंत्रालयातील बंद कपाटात पडून आहे.

कोल्हापूर जिल्ह्याला जसे निसर्गाचे वरदान लाभले आहे, तशी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती ताराराणी, राजर्षी शाहू महाराज यांची पुण्याईही लाभली आहे. विविध प्रकारच्या वनस्पती, लहानमोठी धरणे यांमुळे कोल्हापूरची भूमी विविधतेने नटली आहे. ऐतिहासिक वारसा, निसर्गाचा वरदहस्त पाहता आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्याकडे एक पर्यटनस्थळ म्हणून कोणीच गांभीर्याने पाहिलेले नाही. ना सरकारने, ना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी! कोल्हापूरच्या राज्यकर्त्यांनाही त्याबाबत कधी स्वारस्य वाटले नाही.
सारं काही कोल्हापुरात असूनही अनेक कोल्हापूरवासीय देश-विदेशांतील पर्यटनस्थळांना भेट देतात; परंतु कोल्हापूर जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने विकसित केला, तर केवळ जिल्ह्याचाच सर्वांगीण विकास होणार नाही; तर राज्याचाही बहुमान होणार आहे. त्यामुळेच दोन वर्षांपूर्वी मूळचे कोल्हापूरचेच असलेले तत्कालीन प्रभारी जिल्हाधिकारी आप्पासाहेब धुळाज (मुगळी, ता. गडहिंग्लज) यांनी जिल्ह्याचा पर्यटन आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आणि त्या दृष्टीने कामालाही सुरुवात केली.
पर्यटन क्षेत्राचा अनुभव असलेल्या ‘मित्र’ नावाच्या संस्थेवर या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली. ‘मित्र’ने आधी कोल्हापूरचा इतिहास, संस्कृती, धार्मिक परंपरा, पौराणिक तसेच ऐतिहासिक घटना यांचा अभ्यास केला. त्यानुसार आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य व स्थानिक अशा चार दर्जांची पर्यटनस्थळं तयार केली. त्यानंतर धार्मिक, ऐतिहासिक व पुरातत्त्व, कृषी, जलदर्शन, शैक्षणिक, औद्योगिक, वन, निसर्ग व पर्यावरण, संग्रहालय व वैद्यकीय, आदी नऊ प्रकारची पर्यटनस्थळं विकसित होऊ शकतात, याबाबत सूचना केल्या आहेत.
ही नऊ पर्यटन स्थळे विकसित करताना त्यामध्ये काय-काय करता येऊ शकेल, पर्यटकांना आकर्षित करण्याकरिता कशा प्रकारच्या सेवा-सुविधा देता येतील, त्यासाठी कसा निधी उपलब्ध होऊ शकतो, याबाबतही मार्गदर्शन संस्थेने केले आहे. आता आवश्यकता आहे, ती आराखड्याची अंमलबजावणी कधी करायची, कामाला सुरुवात कोठून करायची, प्राधान्यक्रम कोणत्या कामाला द्यायचा हे ठरविण्याची!


५२५ कोटींचा आराखडा
जिल्ह्याचा पर्यटन आराखडा ५२५ कोटी रुपयांचा आहे. आराखड्याची अंमलबजावणी करताना प्राधान्यक्रम ठरविला गेला पाहिजे. एकाच वेळी सगळा निधी मिळणे अशक्य असले तरी पुढील पाच वर्षांत तो पूर्णपणे कार्यान्वित झाला पाहिजे, अशी अपेक्षा आहे.

जिल्ह्याच्या पर्यटनवाढीसाठी प्रचंड वाव आहे. तयार आराखड्याची अंमलबजावणी केली तर भविष्यात कोल्हापूरला पर्यटनाचा लाभ होईल.
- उदय गायकवाड, मित्र संस्था


पर्यटन आराखड्यातील वैशिष्ट्ये
कोल्हापूर पर्यटन विकास मंडळाची स्थापना करण्यात यावी. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली या मंडळावर शासकीय अधिकारी, तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी संचालक म्हणून असावेत. पर्यटन विकास आणि गुणवत्ता नियंत्रणासाठी या मंडळाने काम करावे. पर्यटकांना विविध ठिकाणी घेऊन जाण्यासाठी खास बसेस उपलब्ध करून द्याव्यात. जिल्ह्याच्या पर्यटनाची माहितीपुस्तिका, वेबसाईट, जाहिराती करण्याची जबाबदारी मंडळाने घ्यावी.

कोल्हापूर विमानतळाजवळ मॉल
कोल्हापुरात विमानतळास लागून प्रशस्त जागेत चार मजली इमारतीत भव्य मॉल उभारला जावा. त्यामध्ये तळमजल्यावर कोल्हापूरच्या वैशिष्ट्यपूर्ण इतिहासाची माहिती देणारे फलक असावेत. दुसऱ्या माळ्यावर विविध वस्तूंची उदा. गूळ, काकवी, चप्पल, तयार कपडे, विविध प्रकारचे फेटे, बचत गटांची उत्पादने, सोन्या-चांदीचे दागिने, तिखट मिरची, कोल्हापुरी मसाले, विविध प्रकारचे खाद्यपदार्थ यांची विक्री करावी. तिसऱ्या माळ्यावर सांस्कृतिक सभागृह तयार करून सर्व प्रकारची लोकनृत्ये, गाण्यांचे कार्यक्रम, मर्दानी खेळ यांचे प्रदर्शन करण्यात यावे. या मॉलला वस्तूंचा पुरवठा होण्याकरिता सात तालुक्यांत प्रक्रिया उद्योगांना प्राधान्य द्यावे.

वनौषधी पार्क
आजरा तालुक्यात महिपालगडाच्या पायथ्याशी वैद्यनाथ व आरोग्य भवानी देवीचे मंदिर आहे. या परिसरात सगळी वनौषधी वृक्षांची लागवड करून ते विकसित करता येईल. वनौषधांची तसेच वृक्षांची माहिती या केंद्रात दिली जावी.
नदी पर्यटन
कोल्हापूर जिल्हा हा पंधरा नद्या वाहणारा जिल्हा आहे. काही नद्या बारमाही वाहणाऱ्या आहेत.पंचगंगा नदीत नदीपर्यटनाचा उपक्रम राबविता येऊ शकतो. प्रयाग चिखली ते पंचगंगा घाट, कसबा बावडा आणि नृसिंहवाडी ते खिद्रापूर अशा दोन मार्गांवर नदीतून बोटीच्या साहाय्याने विहार करता येऊ शकतो.

वैद्यकीय पर्यटनास प्रोत्साहन
कोल्हापूर शहर ‘मेडिकल हब’ म्हणून पुढे येत आहे. येथे चांगली वैद्यकीय सुविधा आणि कमी खर्चात मिळत असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे परदेशातून तसेच अन्य राज्यातून रुग्णांनी येथे उपचार घेण्यासाठी वैद्यकीय पर्यटनास प्रोत्साहनाची सूचना आहे.

फुड अ‍ॅँड फ्लॉवर मॉल
शिरोळ तालुक्यात अनेक हरितगृहे आहेत. याच भागात चविष्ट खवा, बासुंदी, खरवस, कवठ्याची बर्फी, कंदी पेढे, भडंग, आदी खाद्यपदार्थ तयार केले जातात. येथे एक मोठे फुड अ‍ॅँड फ्लॉवर मॉल उभारता येण्यासारखे आहे.

प्राचीन इतिहास संग्रहालय
ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्यावर प्राचीन इतिहासाचे तसेच शिलालेखांचे संग्रहालय उभारता येईल. या संग्रहालयात बुद्धकालीन इतिहासापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंतचा इतिहास, शिलालेख, ऐतिहासिक शस्त्रे त्यांच्या माहितीसह ठेवण्यात यावीत. सध्या जिल्ह्यात ८० हून अधिक शिलालेख असून त्यांचे वाचन झाले आहे.मराठीकरणही झाले आहे.

जैवविविधता उद्यान
राधानगरी व दाजीपूर अभयारण्य परिसरात जैवविविधता उद्यान निर्माण करता येऊ शकते. अशा उद्यानात विविध वृक्षांची माहिती, वनौषधी वृक्षांची लागवड, मोठी नर्सरी, संशोधनाच्या सुविधा येथे उपलब्ध करून देता येतील.

साहसी क्रीडा केंद्र
'गगनबावड्यासारख्या डोंगराळ भागात साहसी क्रीडा प्रकारांचे केंद्र उभारता येईल. अशा ठिकाणी गिर्यारोहण, प्रत्यारोहण, अश्वसवारी यांची सोय करण्यात यावी. या परिसरात खाण्याची व राहण्याची चांगली सोय केली जावी.

धार्मिक पर्यटन स्थळे
करवीरनिवासिनी अंबाबाई, जोतिबा, नृसिंहवाडी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळांची यादी तयार करून तेथे पर्यटकांना नेण्याची सोय करण्यात यावी. पर्यटकांच्या आवडीनिवडीनुसार एक-दोन दिवसांच्या सहलींचे नियोजन करावे. अशा ठिकाणी निवास न्याहारी योजना सुरू कराव्यात, प्रशिक्षित गाईड तयार करावेत, पर्यटकांना नेण्यासाठी खास बसेस तयार कराव्यात.

Web Title: Kolhapur on tourism radar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.