कोल्हापूर : तरुणाईच्या सर्जनशीलतेवर विश्वास ठेवा : रघुनाथ माशेलकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 05:56 PM2018-11-14T17:56:33+5:302018-11-14T17:58:18+5:30
भारतीयांनी केलेले सिस्टीमॅटिक इनोव्हेशन हे कमी खर्चात, गुणवत्तापूर्ण आणि सर्वसमावेशक आहे. या तरुणाईच्या टॅलेंट, टेक्नॉलॉजीवर विश्वास ठेवा, परंपरेच्या पगड्याची मानसिकता बदला, मी हे करू शकतो, भारत हे करीलच, असा आत्मविश्वास बाळगा... असा वडीलकीचा सल्ला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी बुधवारी दिला. येथील १२५ कोटी भारतीयांच्या चेहऱ्यांवर हास्य आणणारे संशोधन सर्वश्रेष्ठ असल्याचे त्यांनी सांगितले.
कोल्हापूर : भारतीयांनी केलेले सिस्टीमॅटिक इनोव्हेशन हे कमी खर्चात, गुणवत्तापूर्ण आणि सर्वसमावेशक आहे. या तरुणाईच्या टॅलेंट, टेक्नॉलॉजीवर विश्वास ठेवा, परंपरेच्या पगड्याची मानसिकता बदला, मी हे करू शकतो, भारत हे करीलच, असा आत्मविश्वास बाळगा... असा वडीलकीचा सल्ला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी बुधवारी दिला. येथील १२५ कोटी भारतीयांच्या चेहऱ्यांवर हास्य आणणारे संशोधन सर्वश्रेष्ठ असल्याचे त्यांनी सांगितले.
शाहू स्मारक भवनात सह्याद्री प्रकाशन, अक्षर दालन, निर्धार प्रतिष्ठानच्या वतीने ‘शतकोत्तर अक्षरगप्पा’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ‘अक्षर दालन’चे रवींद्र जोशी उपस्थित होते. डॉ. सागर देशपांडे लिखित ‘पुस्तकात न मावणारी माणसं’ या पुस्तकाचे यावेळी प्रकाशन झाले.
डॉ. माशेलकर म्हणाले, आपल्या पूर्वजांनी आयुष्याच्या प्रयोगशाळेतून ज्ञानभांडार तयार केले आहे. हे पारंपरिक ज्ञान पुस्तकांत ४०० कोटी पानांत बंद न राहता सर्वांच्या कल्याणासाठी वापरले गेले पाहिजे. भारतीय आयुर्वेद, ज्ञान, येथील संशोधन यांची बायोपायरसी रोखली पाहिजे. त्यामुळे आयुर्वेद आणि अॅलोपॅथीने न भांडता एकत्र येऊन देशासाठी काम केले पाहिजे.
ते म्हणाले, आज जग वेगाने बदलतंय. या स्पर्धेत टिकायचे असेल तर सर्जनशीलतेला पर्याय नाही. आज तंत्रज्ञानाने मोठा विस्तार केला आहे. माणसाला रोबोसारखे पर्याय आले आहेत. अशा वेळी केवळ शिक्षणाचा हक्क यावर न थांबता योग्य शिक्षण आणि शिक्षणाचा योग्य मार्ग निवडला पाहिजे. त्यासाठी शिक्षकांनी वेळेच्या पुढे जाऊन विद्यार्थ्यांना शिकविले पाहिजे. समीर देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. रवींद्र जोशी यांनी स्वागत केले. डॉ. सागर देशपांडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
इंडोव्हेशन स्वस्त आणि मस्त
भारतीय संशोधनाबद्दल माशेलकर म्हणाले, भारतीयांनी केलेल्या संशोधनाला मी इंडोव्हेशन म्हणतो. येथील संशोधन हे स्वस्त आणि मस्त आहे; कारण ते गरिबातल्या गरीब माणसालाही परवडणारं आणि तितकंच गुणवत्तापूर्णही आहे. हे इंडोव्हेशन संशोधन जगभरातील देशांकडून स्वीकारले जाते. आपण मंगळयान तयार केले; पण ‘मंगळ’ असलेली मुलगी स्वीकारत नाही. चंद्रावर पाणी शोधले; पण महिलांना पाण्यासाठी कोसो दूर जावे लागते. ही परिस्थिती बदलली पाहिजे.