पुणे विभागात कोल्हापूर ‘झेड.पी.’ नंबर वन
By admin | Published: January 2, 2015 12:04 AM2015-01-02T00:04:31+5:302015-01-02T00:17:20+5:30
यशवंत पंचायतराज अभियान : कोकरुड ग्रामपंचायत प्रथम
कोल्हापूर : यशवंत पंचायतराज अभियान तथा पंचायत सबलीकरण व उत्तरदायित्व प्रोत्साहन योजनेंतर्गत यंदा अत्युत्कृष्ट जिल्हा परिषद म्हणून पुणे विभागीय स्तरावर कोल्हापूर जिल्हा परिषदेने नंबर वन मिळविला. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या नावलौकिकात भर पडली आहे. कागल पंचायत समिती प्रथम, तर गडहिंंग्लज पंचायत समितीने द्वितीय क्रमांक मिळविला आहे. जिल्हा परिषद आणि दोन पंचायत समित्यांनी क्रमांक मिळविल्याने विभागीय स्तरावर कोल्हापूर जिल्ह्याने चांगली कामगिरी केल्याचे स्पष्ट आहे.
पुणे येथे नुकत्याच झालेल्या विभागीय पारितोषिक निवड समिती तथा उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. केंद्र शासनाने पंचायत राजव्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी २००५-०६ या वर्षापासून विभाग व राज्य अशा दोन्ही स्तरांवर ‘यशवंत पंचायत राज अभियान’ ही पुरस्कार योजना सुरू करण्यात आली. या योजनेतून प्रत्येक वर्षी पंचायत राज संस्थांमधून प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती यांना रोख बक्षीस, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविले जाते. प्रशासकीय व्यवस्थापन, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, पूर्ण केलेले भौतिक व आर्थिक उद्दिष्ट, लेखापरीक्षण या महत्त्वाच्या मुद्द्यांवर तपासणी केली जाते. विभागीय स्तरावर क्रमांक मिळविलेल्यांची राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी निवड होते.
सन २०१४-१५ वर्षात येथील जिल्हा परिषदेने पुणे विभागात पहिला क्रमांक पटकावून राज्य स्तरावरील क्रमांकासाठी पात्र ठरली आहे. कोल्हापूरसह राज्यातील सहा विभागांतून पहिला क्रमांक मिळविलेल्या सहा जिल्हा परिषद, नऊ पंचायत समित्या, ४२ ग्रामपंचायतींची तपासणी करण्यासाठी लवकरच राज्यस्तरावरील पथक येणार आहे.
दरम्यान, विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक आलेल्या जिल्हा परिषदेस बक्षीस नाही. मात्र राज्यस्तरावर क्रमांक मिळविलेल्या जिल्हा परिषदांना अनुक्रमे २५ लाख, १५ लाख, १० लाख; तर विभागीय स्तरावर क्रमांक मिळविलेल्या पंचायत समितींना अनुक्रमे १० लाख, ७ लाख, ५ लाख असे बक्षीस आहे. विभागीय स्तरावरील ग्रामपंचायतींना अनुक्रमे ३ लाख, २ लाख, १ लाख बक्षीस आहे. मुंबई येथे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी १२ मार्च रोजी बक्षीस वितरण केले जाते.
गटनिहाय अनुक्रमे निकाल
जिल्हा परिषद : कोल्हापूर.
पंचायत समिती : कागल, गडहिंग्लज, कऱ्हाड.
ग्रामपंचायत : कोकरूड (जि. सांगली), मन्याचीवाडी (सातारा), ठिकेकरवाडी (पुणे), सुलतानपूर (सोलापूर), जखीणवाडी (सातारा)