‘रंकाळा प्रदूषणमुक्ती’साठी सरसावले कोल्हापूरकर
By admin | Published: December 26, 2015 01:32 AM2015-12-26T01:32:18+5:302015-12-26T01:32:18+5:30
रंकाळा तलावाच्या प्रदूषणमुक्तीसाठी शुक्रवारी सकाळी रंकाळा संवर्धन व संरक्षण समितीतर्फे ‘मानवी साखळी’ करण्यात आली. यामध्ये महापौर अश्विनी रामाणे याही सहभागी झाल्या होत्या.
कोल्हापूर : रंकाळा तलावाच्या प्रदूषणमुक्तीसाठी शुक्रवारी सकाळी रंकाळा संवर्धन व संरक्षण समितीतर्फे ‘मानवी साखळी’ करण्यात आली. यामध्ये महापौर अश्विनी रामाणे याही सहभागी झाल्या होत्या.
या मानवी साखळीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या मानवी साखळीनिमित्त समितीतर्फे ‘स्वच्छ व सुंदर रंकाळा हवा. सांडपाणी रोखून प्रदूषणमुक्त रंकाळा करावा,’ ऐतिहासिक परंपरा लाभलेला रंकाळा तलावातील ‘संध्यामठ,’ रंकाळा टॉवर, राजघाट यांचीही तातडीने दुरुस्ती-देखभाल करून विकास व्हावा. उद्यानातील पदपथांची दुरुस्ती करावी. अनधिकृत बांधकामे होऊ नयेत, म्हणून रंकाळा व परिसर संरक्षित वास्तूमध्ये समावेश करावा, आदी मागण्या करण्यात आल्या.
कोल्हापूर शहराचे पर्यावरण संतुलन सांभाळणारा रंकाळा तलाव १९९० पासून प्रदूषणाच्या समस्येत अडकला आहे. महापालिका प्रशासनाने लाखो रुपये खर्च केले आहेत; परंतु प्रदूषणाची समस्या जैसे थे आहे. त्यामुळे रंकाळा संवर्धन व संरक्षण समितीतर्फे रंकाळा वाचविण्यासाठी गेल्या वर्षीपासून विविध उपक्रम राबविले जात आहेत.