लेकीचा हट्ट पुरवताना सुचली गणेश सजावटीची कल्पना; बार्बी डॉलची कोल्हापुरात चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 08:36 PM2022-08-25T20:36:37+5:302022-08-25T20:37:41+5:30
लेकीचा हट्ट पुरवताना सुचली गणपती सजावटीची कल्पना
दुर्वा दळवी
कोल्हापूर - घरोघरी गणपती येणार म्हटले की सगळेच जण सजावटीच्या विविध कल्पना सुचवीत असतात. सार्वजनिक मंडळांच्या देखव्यांसोबत आता घरगुती गणपतीसाठी ही देखावे साकारले जातात. कोल्हापुरातील कलाकार संपुर्णा राऊळ यांनी खेळण्यातील बार्बी डॉलपासून देखव्यांचे सेट तयार केले आहेत. वारकरी, ढोल ताशा पथक, बैलगाडीची सजावट, गावाकडील संस्कृती दाखविणारे सेटचा यांत समावेश आहे.
गणेशोत्सवासाठी बाजारात आलेला हा नवा ट्रेंड सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. नऊवारी साडी नेसलेली बाहुली आरतीचे तबक, मोदकाचे ताट हातात असलेली, जात्यावर पीठ दळणारी महिला ते ढोल ताशा वादन करणाऱ्या महिला अशा वेगवेगळ्या रूपात या बाहुल्या सजविल्या आहेत. ग्राहकांच्या मागणीनुसार दागदागिने यांच्यासह पारंपरिक पोशाख परिधान करून या बाहुल्यांचे सेट हे सेट राऊळ कुटुंबीय घरीच तयार करून देतात.
गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात संपुर्णा यांच्या लेकीच्या खेळण्यातील बार्बी डॉलचा ड्रेस खराब झाला त्यांनतर त्यांनी बाजारपेठ बंद असल्याने घरीच त्या डॉलचा पेहराव बदलला. त्याचवेळी त्यांना ही कल्पना सुचली की अशा बाहुल्यांचे वेगवेगळे पोशाख तयार करून त्याचे सेट रुखवत, मुंज, वाढदिवस यासाठी भेटवस्तू म्हणून देण्यास आपण तयार करू शकतो. त्यांनतर त्यांनी गणपतीसाठी असे वेगवेगळे सेट तयार करण्यास सुरुवात केली. या सेटला कोल्हापूरकर उत्तम प्रतिसाद देत आहेतच त्याचबरोबर नांदेड, पुणे, रत्नागिरी या जिल्ह्यांसह गुजरात, हैद्राबाद या राज्यातून ही त्यांना ऑर्डर मिळाली आहे. आज त्यांच्याकडे या सेटची मागणी अधिक असून दरदिवशी सजावटीच्या सेटची विक्रमी विक्री होत आहे.
कोल्हापुरात हे सजावटीचे सेट कुठे मिळतील..
कोल्हापुरातील पापाची टिकटी या परिसरात राऊळ यांनी स्टॉल लावला असून येणाऱ्या ग्राहकांची संख्या अधिक आहेच. पण याचसोबत सेट पाहायला येणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. या सेटची साधारणपणे साडे पाचशे रुपयांपासून ते पंधरा हजारपर्यंत ह्याची किंमत आहे.
घरच्या गणपतीची तयारी सोडून आई वडील लेकीच्या मदतीला
संपूर्णा हीचे माहेर रत्नागिरी. लग्नानंतर ती कोल्हापुरात स्थायिक झाली. पण तिच्या व्यवसायाला चालना मिळाली नी तिच्या मदतीला तिचे आईवडील आणि दोन बहिणी धावून आले आहेत. रत्नागिरीतील घरी गणेशोत्सवाची तयारी अजून करावयाची असून तिचे आईवडील मुलगीसाठी खास कोल्हापुरला आले आहेत.