कोल्हापूरचा निर्णय मुंबईनंतर
By admin | Published: March 3, 2017 12:57 AM2017-03-03T00:57:30+5:302017-03-03T00:57:30+5:30
उद्धव ठाकरे : शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सादर केला अहवाल; जिल्हा परिषदेचे सत्ताकारण
कोल्हापूर : मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवडीनंतरच कोल्हापूरचा निर्णय घेऊ, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची चर्चा करताना स्पष्ट केले. एका विवाह समारंभाच्या निमित्ताने गुरुवारी संध्याकाळी ठाकरे कोल्हापुरात आले होते. यावेळी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीचा अहवाल त्यांच्यासमोर सादर केला.
संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ठाकरे यांचे कोल्हापूरच्या विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर ते थेट हॉटेलवर आले. परिवहन मंत्री दिवाकर रावते, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचेही हॉटेलवर आगमन झाले. यावेळी सुमारे अर्धा तास त्यांनी कोल्हापूरचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक, जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, मुरलीधर जाधव, आमदार चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर, प्रकाश आबिटकर, सत्यजित पाटील, उल्हास पाटील यांच्याशी जिल्हा परिषदेच्या यशा-पयशाबाबत चर्चा केली. मंडलिक यांनी जिल्ह्यातील आढावा सांगतानाच नेमकी राजकीय स्थिती स्पष्ट केली.
जिल्ह्यातील लढविलेल्या जागा, आलेले यश, कमी मतांच्या फरकाने पराभूत झालेले उमेदवार याबाबतची माहिती ठाकरे यांना देण्यात आली. हा सर्व आढावा ऐकल्यानंतर मुंबईचा विषय झाला की मग कोल्हापूरबाबत निर्णय घेऊ, असे यावेळी ठाकरे यांनी उपस्थितांना सांगितले. गरज पडली तर मुंबईला या, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, ठाकरे यांचे अतिशय जल्लोषी वातावरणात हॉटेलवर स्वागत करण्यात आले. ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणांनी हॉटेल आणि परिसरही दुमदुमून गेला. ठाकरे यांना भेटण्यासाठी शिवसेनेच्या जुन्या, नव्या कार्यक र्त्यांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, प्रचंड गर्दी आणि कमी वेळ असल्याने ठाकरेंशी वैयक्तिक भेट कुणालाही घेता आली नाही. यावेळी महापालिकेचे परिवहन सभापती नियाज खान, महिला आघाडीप्रमुख शैलजा साळोखे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सदस्य शिवाजी जाधव, रवी चौगुले, सुनील शिंत्रे, भूषण पाटील, बाजीराव पाटील यांच्यासह शिवसेनेचे नूतन जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.
-----------
0२0३२0१७-कोल- उध्दव ठाकरे
कोल्हापुरात गुरुवारी संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हॉटेलवर जल्लोषी वातावरणामध्ये स्वागत करण्यात आले.
मुंबई महापालिकेसाठी पर्यायमुंबई महापालिकेत शिवसेनेचे ८८ सदस्य असून, आणखी दोनजण आले तर सदस्यसंख्या ९० होणार आहे. शिवसेना व भाजपच्या उमेदवारांखेरीज काँग्रेसने उमेदवार दिला तर राष्ट्रवादी (९) आणि मनसे (७) ची मते घेऊन शिवसेना आपला महापौर बसवू शकते.
शिवसेनेकडे असलेली ९० मते आणि राष्ट्रवादी व मनसेची मते घेऊन शिवसेना आपला महापौर बसवू शकते. काँग्रेसने निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची भूमिका घ्यायची.
शिवसेनेच्या ९० मतांवरच भाजपने हल्ला चढविला व फाटाफूट करण्याचा प्रयत्न केला असेल तर काँग्रेसमधील १५ ते १७ नगरसेवकांचा गट फोडून आपला महापौर बसवायचा. यापूर्वी १९९६ मध्ये काँग्रेसचे महापौरपदाचे उमेदवार पुष्पकांत म्हात्रे यांचा शिवसेनेने २२ नगरसेवक फोडून पराभव केला होता.
‘किंगमेकर’ ठरल्याबद्दल समाधान
जिल्हा परिषदेच्या सत्ताकारणामध्ये शिवसेना ही ‘किंगमेकर’च्या भूमिकेत असल्याचे उद्धव ठाकरे यांना सांगण्यात आले. जिल्हा परिषदेचे बलाबल पाहता ‘जिकडे शिवसेना, तिकडे सत्ता’ अशी परिस्थिती असल्याचे सांगितल्यानंतर ठाकरे यांनी याबद्दल समाधान व्यक्त केले.
प्रचंड चेंगराचेंगरी
उद्धव ठाकरे यांचे हॉटेलवर आगमन झाल्यानंतर आणि पुन्हा ते विवाह समारंभाकडे जात असताना दोन्हीवेळा प्रचंड गर्दी झाली. त्यांना भेटण्यासाठी, पुष्पगुच्छ देण्यासाठी आणि मोबाईलवर फोटो काढण्यासाठी एवढी गर्दी झाली की, अखेर त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी अनेकांना अक्षरश: ओढून बाजूला काढले. यावेळी झाडांच्या कुंड्यांवरही काहीजण पडले. हॉटेलमध्ये आणि परिसरात चोख पोलिस बंदोबस्त तैनात होता.
...अन् मुक्काम रद्द
पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ठाकरे हे गुरुवारी कोल्हापुरात मुक्काम करणार होते. ते आल्यानंतर अंबाबाईच्या दर्शनालाही जाणार होते; परंतु त्यांनी सर्व कार्यक्रम आणि मुक्काम रद्द करून विवाह समारंभ झाल्यानंतर ते कारने बेळगावला गेले व तेथून ते विमानाने मुंबईला गेले. ठाकरे यांचा मुक्काम रद्द झाल्याने कार्यकर्ते नाराज झाले.