कोळी बांधवांना आश्वासने नको
By admin | Published: July 11, 2017 03:42 AM2017-07-11T03:42:57+5:302017-07-11T03:42:57+5:30
सर्वच राजकीय पक्ष निवडणूक आल्यानंतर कोळी बांधवांना फक्त आश्वासने देतात, हेच आजपर्यंत पाहत आलो आहोत.
विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : सर्वच राजकीय पक्ष निवडणूक आल्यानंतर कोळी बांधवांना फक्त आश्वासने देतात, हेच आजपर्यंत पाहत आलो आहोत. मात्र यापुढे हे चालू देणार नाही आणि म्हणून येत्या २७ जुलै २०१७ रोजी मुंबईत आझाद मैदान येथे संविधानात हक्क असणाऱ्या सर्व आदिवासी जमाती एकत्रित येऊन शासनाला जाब विचारणार असल्याचे प्रतिपादन आदिवासी कोळी समाज संघटना कोकण विभाग प्रमुख महेंद्र चोगले यांनी केले आहे.
अलिबाग तालुक्यातील रेवस कोळीवाडा येथील राममंदिराच्या पटांगणात रविवारी रेवस - बोडणी कोळी बांधवांच्या कार्यक्रमात चोगले बोलत होत. ते म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी सांगितले होते, आमचे केंद्रामध्ये सरकार आहे. महाराष्ट्रातील कोळी जमातीतील बांधवांनी आम्हाला निवडून दिल्यास पहिल्याच अधिवेशनात जातीचा दाखला व वैधता प्रमाणपत्र देण्याचे जाहीर केले. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आश्वासने देऊन तीन वर्षे पूर्णे होऊ न सुध्दा आश्वासनाचा पूर्तता केली नसल्याचे त्यांनी सांगितले.
कोळी ही मुख्य आदिवासी जमात असून महादेव, मल्हार, टोकरे, ढोर आदी उपजमाती आहेत. याचा उल्लेख भारतीय संविधानात आहे. महादेव कोळी ही जमात अस्तित्वात नाही. महादेव हे स्थळ वाचक नाव आहे. कोळी जमातीची रुढी परंपरा या महादेव कोळी जमातीच्या रुढी परंपरा म्हणून जाहीर केल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये १९५० पूर्वीच्या सर्वांच्या मूळ नोंदी या कोळी आदिवासी कोळी आहेत. परंतु ही परिस्थिती शासनाला व राजकीय पक्षांना माहीत असून सुध्दा या प्रश्नाकडे गेली ३५ वर्षे दुर्लक्ष केल्यामुळे संपूर्ण कोळी जमातीवर अन्याय केला असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी रत्नागिरी आदिवासी कोळी समाज समन्वय समिती सदस्य रमण पावसे व रायगड आदिवासी कोळी समाज समन्वय समिती जनार्दन पाटील व नारायण चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
रेवस-पाली पदयात्रा मंडळ रेवस गाव अध्यक्ष धर्मा कोळी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी गणेश कोळी, नवनाथ कोळी, अंबर नाखवा, हरेश्वर कोळी, रंजित पेढवी, बी.एन.कोळी, डी.के.कोळी, दत्ता कोळी, मोरेश्वर नाखवा, गजानन कोळी व मंडळाचे सर्व पदाधिकारी रेवस ते पाली पदयात्रा मंडळाच्या वतीने सर्वांचे स्वागत करण्यात
आले.
जातीच्या दाखल्यांचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी रेवस ते पाली पदयात्रा मंडळाच्या वतीने रेवस-बोडणी परिसरातील कोळी बांधवांनी हजारोंच्या संख्येत राज्याचे मुख्यमंत्री व राष्ट्रपतींना रजिस्टर पोस्टाने निवेदने पाठविली आहेत त्याबद्दल महेंद्र चोगले यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
कोळी ही मुख्य आदिवासी जमात असून महादेव, मल्हार, टोकरे, ढोर आदी उपजमाती आहेत.