गणेश विसर्जनासाठी कोळी बांधवांना मिळणार आता विम्याचे संरक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 03:09 PM2017-08-22T15:09:37+5:302017-08-22T15:27:19+5:30
कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचा निर्णय, कोळी बांधवामध्ये आनंदाचे वातावरण
कल्याण, दि. 22 - कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने गेल्या कित्येक वर्षापासून कोणत्याही अपेक्षेविना गणेश विसर्जन काळात आपली सेवा देणा-या कोळी बांधवाना यंदा विम्याचे संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कोळी बांधवामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. गणेश विर्सजन काळात कोळी बांधवांची नेहमीच महत्त्वाची भूमिका असते. गेल्या काही वर्षात घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ लक्षात घेता या कोळी बांधवांवरील जबाबदारी ही तेवढीच वाढली आहे.
मात्र आपल्या जीवावर उदार होऊन सर्व अडचणींना बाजूला सारत ही मंडळी बाप्पांचे निविघ्नपणे विसर्जन करीत आहेत. याकडे डोळेझाक करून चालणार नाही. या गोष्टींची दखल कल्याण शहर सावर्जनिक गणेशोत्सव महामंडळाने घेत त्यांना विम्याचे संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळांचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय मोरे आणि कार्याध्यक्ष डॉ. पंकज उपाध्याय यांनी पुढाकार घेत प्रत्येक कोळी बांधवांचा ३ लाख रूपयांचा अपघाती विमा काढण्याचे काम सुरू केले आहे.गणेश विसर्जन काळातील कोळी बांधवांचे योगदान अजिबात दुर्लक्षून चालणार नाही. त्यांनी कोणतेही अपेक्षा ठेवलेली नसली तरी त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी उचलणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजत असल्याची प्रतिक्रिया मंडळांचे अध्यक्ष संजय मोरे यांनी दिली.
आतापर्यंत हे मंडळ केवळ बॅनर आणि होर्डिंग्जपुरताच मर्यादित असल्याची चर्चा केली जायची. मात्र यंदाच्या नवनिर्वाचित कार्यकारीणीने या प्रतिमेला छेद देत एक चांगला उपक्रम राबविला असून या भूमिकेचे निश्चितपणे स्वागत व्हायला हवे असे बोलले जात आहे.