जातपडताळणीमुळे कोळी समाज नाराज
By admin | Published: July 7, 2014 04:04 AM2014-07-07T04:04:07+5:302014-07-07T04:04:07+5:30
राज्यातील कोळी समाजाच्या दाखल्यासंदर्भात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडून अन्याय होत असल्याचा आरोप कोळी महासंघाने केला आहे.
मुंबई : राज्यातील कोळी समाजाच्या दाखल्यासंदर्भात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडून अन्याय होत असल्याचा आरोप कोळी महासंघाने केला आहे. येत्या सात दिवसांत सरकारने सेवेत असलेल्या कोळी समाजाच्या कर्मचाऱ्यांना नोकरीत संरक्षण दिले नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी दिला आहे.
अनुसूचित जाती व जमातीमधील कर्मचाऱ्यांच्या जातपडताळणी प्रमाणपत्र तपासणीचे कारण देत शासन कोळी समाजाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संख्येत कपात करीत आहे, असा आरोप पाटील यांनी केला. ते म्हणाले, युती सरकारने १५ जून १९९५ साली परिपत्रक काढत कोळी समाजाच्या कर्मचाऱ्यांना नोकरीत संरक्षण दिले होते, मात्र आघाडी सरकार ते संरक्षण काढून घेत आहे.
परिणामी, २०१० सालापर्यंतच्या कर्मचाऱ्यांना नोकरीत संरक्षण देण्यात यावे, नाहीतर येत्या विधानसभा निवडणुकीदरम्यान आघाडी सरकारला कोळी समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल. जातपडताळणी प्रमाणपत्र तपासणीमुळे केंद्र व राज्य शासनात कार्यरत असलेल्या सुमारे १५ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या नोकरीवर गदा येणार असल्याचे महासंघाचे म्हणणे आहे. त्यात उपायुक्त स्तरावरील अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे राज्यभर बैठका आणि मेळावे घेत महासंघ तीव्र आंदोलनाची तयारी करीत आहे.
राज्यातील ५ विभागांत असलेल्या ७ जातपडताळणी समित्यांच्या कार्यालयाबाहेर सुरुवातीला मोर्चा आणि निदर्शने करीत लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. मात्र त्यानंतर महासंघ रस्त्यावर उतरून आक्रमकरीत्या आंदोलन करीत समिती बंद करणार असल्याची माहिती एका पदाधिकाऱ्याने दिली. (प्रतिनिधी)