‘कोल्हाट्याचं पोर’ची आई मदतीसाठी फिरतेय दारोदारी !
By Admin | Published: October 26, 2016 01:42 AM2016-10-26T01:42:58+5:302016-10-26T01:42:58+5:30
‘कोल्हाट्याचं पोर’ या आत्मचरित्राने मराठी साहित्य विश्वाला हादरा देणाऱ्या डॉ. किशोर काळे यांची आई शांताबाई मुलाच्या मृत्यूच्या चौकशीसाठी केलेल्या दाव्याला पैसे नाहीत
- दत्ता थोरे, लातूर
‘कोल्हाट्याचं पोर’ या आत्मचरित्राने मराठी साहित्य विश्वाला हादरा देणाऱ्या डॉ. किशोर काळे यांची आई शांताबाई मुलाच्या मृत्यूच्या चौकशीसाठी केलेल्या दाव्याला पैसे नाहीत म्हणून राजकीय नेत्यांचे उंबरठे झिजवत आहेत. लातूर येथील लोकप्रतिनिधींना भेटून काही आर्थिक मदत मिळते का, यासाठी त्या मंगळवारी येथे आल्या.
एकेकाळी ‘किशोर शांताबाई काळे’ या नावाने महाराष्ट्रावर गारुड केले होते. त्यांचे पुस्तक म्हणजे तमासगीराच्या घरात जन्मलेल्या बंडखोर मुलाचा प्रवास होता. किशोर यांचे सात वर्षापूर्वी निधन झाले अन् त्यांची आई शांताबाई पोरकी झाली.
सख्ख्या भावाशी वाद झाले आणि करमाळा तालुक्यातील नेरले हे माहेर तुटले. डोईवरचे छप्पर गेले. सोलापुरात पत्रा तालीम येथील बुरळे यांच्या दहा बाय दहाच्या खोलीत महिना दीड हजार भाडे भरून त्या राहतात. वयाच्या सत्तरीत असलेला कधीमधी घरी येणारा दादासाहेब काळे हा चुलतभाऊ सोडला तर त्या एकट्याच. ‘कलावंत’ म्हणून राज्य शासनाचे मिळणारे तुटपुंजे मानधन आणि किशोर काळेंच्या पुस्तकातून मिळणारी रॉयल्टी हीच त्यांची ‘रोजीरोटी’.
नवे सरकार आल्यापासून दोन वर्षांत त्यांना ‘कलावंता’चे मानधन एकदाच मिळाले तेही चार हजार आणि तुटपुंजी रॉयल्टी, जिचाही वर्षापासून पत्ता नाही. भावाशीसोबत घराचा वाद माढ्याच्या कोर्टात तर किशोर काळेंच्या मृत्यूच्या चौकशीचा लढा औरंगाबादला. शांताबाईंना हा खर्च परवडणार तरी कसा?, यासाठी मदतीची आस घेऊन त्या लोकप्रतिनिधींच्या भेटी घेत आहेत.
किशोर गेला अन् पोरकी झाले
कलावंत असल्याचा अभिमान आहे. परंतु ते जिणं पुन्हा कुणाच्या वाट्याला येऊ नये, अशी माझी भावना आहे. कोल्हाटी समाजात सुधारणा व्हावी, यासाठी किशोर खूप आग्रही होता. परंतु काळाने त्याच्यावर झडप घातली. त्याच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी इच्छा आहे. किशोर गेला अन् मी घरा-दाराला पारखी झाले. - शांताबाई काळे