कोकणवर ठाण्याचा वरचष्मा
By Admin | Published: January 21, 2017 04:30 AM2017-01-21T04:30:33+5:302017-01-21T04:30:33+5:30
कोकण विभाग मतदारसंघात समाविष्ट असलेल्या पाच जिल्ह्यांपैकी ठाणे जिल्ह्याचे वर्चस्व अधिक सिद्ध होत आहे.
सुरेश लोखंडे,
ठाणे- कोकण विभाग मतदारसंघात समाविष्ट असलेल्या पाच जिल्ह्यांपैकी ठाणे जिल्ह्याचे वर्चस्व अधिक सिद्ध होत आहे. विद्यमान आमदार येथील असून सर्वाधिक मतदार आणि मातब्बर आणि कडवी झुंज देणारे उमेदवार जिल्ह्यात आहे. यामुळे सर्वांगीण विचार करता कोकण विभाग शिक्षक मतदारसंघावर ठाणे जिल्ह्याचा वरचश्मा राहणार आहे.
विधान परिषदेवर या निवडणुकीद्वारे शिक्षकांनी एक आमदार निवडून द्यायचा आहे. त्यासाठी माध्यमिक शिक्षकांसह महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना मतदानाचा हक्क आहे. विद्यमान आमदार रामनाथ मोते यांचा कार्यकाळ ५ डिसेंबर रोजी संपलेला आहे. यामुळे त्या जागेसाठी ही निवडणूक होत आहे. यासाठी ३ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील ३७ हजार ६४४ शिक्षक, प्राध्यापक या निवडणुकीत मतदान करणार आहेत. त्यातील सर्वाधिक १५ हजार ७६६ जिल्ह्यातील आहेत.
यात पहिल्या फेरीत निवडून येण्यासाठी ५० टक्के मतदान अपेक्षित आहे. त्यासाठी तीन हजार ५६ मतदार ठाणे जिल्ह्यात कमी आहेत. परंतु, अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक मतदार ठाणे जिल्ह्यात आहे. याशिवाय, सत्ताधारी भाजपाचा पाठिंबा असलेले शिक्षक परिषदेचे वेणुनाथ कडू विद्यमान आमदार, पण अपक्ष उमेदवार रामनाथ मोते, सत्ताधारी शिवसेनेचा पाठिंबा असलेले ज्ञानेश्वर म्हात्रे आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी लढा असल्याचे सांगून निवडणूक रिंगणात असलेले लोकभारतीचे अशोक बेलसरे असे उमेदवार आहेत.
या आधीच्या निवडणुकांमध्ये सक्रिय असलेले शेतकरी कामगार पक्षाचे नेते तथा या निवडणुकीतील बलाढ्य उमेदवार बाळाराम दत्तात्रेय पाटील रायगडचे आहेत. ते पुरोगामी शिक्षक आघाडीचे उमेदवार असून त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे. महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे नरसू पाटील (उरण) आदी या निवडणुकीत नशीब आजमावत आहेत.
अंतिम रिंगणात १० उमेदवार
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात १० उमेदवार शिल्लक राहिले आहेत. सुमारे २७ उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली होती. मात्र, शुक्रवारी १७ जणांनी उमेदवारी मागे घेतली. यामध्ये तीन उमेदवारांचे अर्ज बाद झाले. काही उमेदवारांनी दोनदोन दाखल केलेले उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवशी मागे घेतले.
या मतदारसंघात शिक्षकसेनेचे ज्ञानेश्वर म्हात्रे आणि लोकभारतीचे अशोक बेलसरे यांना संघटनांचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले आहे. तर, अपक्ष उमेदवारांमध्ये अशोक बहिरव, वेणुनाथ कडू, केदार जोशी, नरसू पाटील, बाळाराम पाटील, महादेव सुळे , मिलिंद कांबळे आणि रामनाथ मोते हे आठ उमेदवार अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
उस्मान रोहेकर यांचे प्रतिज्ञापत्र नसल्यामुळे तर दिलीप गव्हाळे यांनी प्रतिज्ञापत्र नोटरी न केल्याने तसेच तुळशीदास जाधव यांच्या प्रतिज्ञापत्रात त्रुटी आढळल्याने या हे उमेदवार बाद झाले आहेत. या निवडणुकीतून माघार घेतलेल्यांमध्ये काशिनाथ म्हात्रे, राजाराम पाटील, अंबादास काळे यांचा समावेश आहे.
> चुरस वाढली
मुंबई : कोकण विभाग शिक्षक मतदार संघात शिक्षक परिषदेच्या वेणूनाथ कडू यांना भारतीय जनता पार्टीसह रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) या राजकीय पक्षांच्या पाठिंब्यासह आता अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांनीही समर्थन दिले आहे. त्यामुळे येथील निवडणूक अधिक चुरशीची होणार असल्याचे दिसत आहे.
कोकण विभागातील खैर ए उम्मत ट्रस्ट संस्थेच्या विविध शाळा, उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ, लाडशाखीय वाणी समाज, ब्राह्मण सभा यांनी शिक्षक परिषदेला लेखी पाठिंबा दिला आहे. शिवाय कडू यांच्या प्रचारात उतरण्याचेही आश्वासन दिले आहे.