कोकणची एसी डबल डेकर ट्रेन दक्षिणेला चालवण्याचा घाट
By Admin | Published: December 24, 2014 02:32 AM2014-12-24T02:32:10+5:302014-12-24T02:32:10+5:30
कोकणवासियांसाठी चालवण्यात आलेली विशेष एसी डबल डेकर ट्रेन रेल्वे प्रशासनाकडून दक्षिण विभागात (चैन्नई, मदुराई, तिरुचिरापल्ली, सालेम, पलक्कड, थिरुवनंतपुरम) चालवण्याचा घाट घालण्यात येत
सुशांत मोरे, मुंबई
कोकणवासियांसाठी चालवण्यात आलेली विशेष एसी डबल डेकर ट्रेन रेल्वे प्रशासनाकडून दक्षिण विभागात (चैन्नई, मदुराई, तिरुचिरापल्ली, सालेम, पलक्कड, थिरुवनंतपुरम) चालवण्याचा घाट घालण्यात येत आहे. यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्नही सुरू असल्याचे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. कोकणवासियांसाठी फक्त दोन वेळा धावलेल्या या ट्रेनला रेल्वेच्या नियोजशून्य कारभारामुळे कमी प्रतिसाद मिळाला होता आणि त्यानंतर ही ट्रेन धावलीच नाही.
सध्या कांदिवली येथील यार्डमध्ये उभ्या असलेल्या एसी डबल डेकर ट्रेनचा मुक्काम देखभाल आणि दुरुस्तीसाठी लोअर परेल येथील वर्कशॉप होणार आहे. ही ट्रेन पुन्हा कोकण मार्गावर सुरू ठेवायची की नाही यावर महिनाभरानंतर निर्णय होईल. गणपतीत ही गाडी सुरू करण्यात आली. मात्र कोकणात जाणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या खिशाला या प्रिमियम ट्रेनमुळे मोठी कात्रीच लागणार असल्याने त्याकडे पाठ फिरवण्यात आली. त्यामुळे दिवाळीत ही ट्रेन नॉन प्रिमियम म्हणून चालवण्यात आली. मात्र कमी प्रतिसादामुळे सेवा थांबवण्यात आली आणि देखभाल-दुरुस्तीसाठी ती पश्चिम रेल्वेकडे सोपवण्यात आली.
ही ट्रेन येत्या तीन ते चार दिवसांत लोअर परेल वर्कशॉपमध्ये परिक्षण आणि दुरुस्तीसाठी येईल. त्यासाठी बराच वेळ लागणार असल्याने साधारणपणे एक ते सव्वा महिना ती वर्कशॉपमध्ये मुक्काम करणार असल्याचे रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. महत्वाची बाब म्हणजे हा मुक्काम झाल्यावर ही ट्रेन कोकण मार्गावर विशेष ट्रेन म्हणून पुन्हा सुरू करायची की नाही याचा विचार रेल्वे प्रशासनाकडून वरिष्ठ पातळीवर केला जाणार आहे. त्याचप्रमाणे रेल्वेकडून एसी डबल डेकर ट्रेन दक्षिण विभागात चालवण्याचा घाटही घातला जात आहे. त्यावर वरिष्ठ पातळीवर चर्चाही सुरू असल्याचे सांगण्यात आले. ही संपूर्ण ट्रेन दक्षिण विभागात चालवायची कि त्याचे काही डबे हलवायचे यावरही विचार केला जात आहे. एसी डबल डेकर ट्रेन पुन्हा कोकणवासियांना कधी पाहण्यास मिळेल हादेखिल मोठा प्रश्न आहे. मात्र रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे कोकणाशी जवळचे नाते असल्याने ते काय निर्णय घेतात यावर सर्व अवलंबून असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.
‘एसी डबल डेकर लोअर परेल वर्कशॉप देखभालीसाठी जाणार आहे. हे नक्की आहे. मात्र ही ट्रेन दक्षिणेकडे चालवण्याचा विचार नाही,’ अशी माहिती जनसंर्क अधिकारी ए.के.सिंह यांनी दिली.