कोकण मंडळाने घेतला ५५ जागांचा शोध
By admin | Published: July 18, 2015 02:09 AM2015-07-18T02:09:07+5:302015-07-18T02:09:07+5:30
म्हाडाचे कोकण मंडळाने गृह प्रकल्प उभारणीसाठी जागा उपलब्ध नसल्याने मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात ५५ जमिनींचा शोध घेतला आहे. यापैकी अनेक जमिनी विविध सोयीसुविधांपासून
मुंबई : म्हाडाचे कोकण मंडळाने गृह प्रकल्प उभारणीसाठी जागा उपलब्ध नसल्याने मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात ५५ जमिनींचा शोध घेतला आहे. यापैकी अनेक जमिनी विविध सोयीसुविधांपासून खूपच दूर असल्याने या जमिनी वगळून आवश्यक असलेल्या जमीन खरेदीचे प्रस्ताव शासनाकडे सादर करणार आहे.
जमिनीअभावी सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करणे शक्य होत नसल्याने मंडळाने मुंबई महानगर क्षेत्रात शासकीय विभागाच्या जमीन खरेदीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये मंडळाने भिवंडी, पनवेल, पेन, वसई आदी भागातील जमिनींची पाहणी केली आहे. यापैकी काही जमिनी रस्ते, पाणी आणि इतर सोयीसुविधांपासून कोसो दूर आहेत. त्यामुळे सोयीसुविधा उपलब्ध असणारी ठिकाणे निवडून ती जमीन खरेदी करण्याचा प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्यात येणार असल्याचे मंडळाचे मुख्याधिकारी विजय लहाने यांनी सांगितले. कोकण मंडळामार्फत सध्या विरार-बोळिंज येथे दुसऱ्या टप्प्यातील घरांचे काम सुरू आहे. या ठिकाणी ३ हजार ६८३ घरे उभारण्याचे काम सुरू आहे. यामध्ये एलआयजी गटातील १ हजार २५१ आणि एमआयजी गटातील २ हजार ४३२ घरांचा समावेश आहे. या घरांची लॉटरी जानेवारी महिन्यात काढण्यात येणार असल्याचेही लहाने म्हणाले.
२0१६मध्ये घराचा ताबा
२0१४ मध्ये काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या विजेत्यांच्या कागदपत्रांची छाननी येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल. तसेच विरार-बोळिंज येथील घरांचे काम अंतिम टप्प्यात असून हे काम पूर्ण झाल्यानंतर २0१४ आणि २0१६ मधील लॉटरीतील व्यक्तींना ताबा देण्याची प्रक्रिया सुरू होईल, असेही लहाने यांनी सांगितले.