कोकण, नाशिक, कोल्हापूर, नांदेडसह गडचिरोली, पुण्याला पावसाचा तडाखा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2019 03:21 AM2019-08-04T03:21:57+5:302019-08-04T06:49:51+5:30
अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग; अनेक भागांत सतर्कतेच्या सूचना
नाशिक, कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, गडचिरोली : मुंबईबरोबरच शनिवारी नाशिकसह, कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, गडचिरोली या जिल्ह्यांनाही पावसाने झोडपले. नांदेडमध्ये पावसामुळे आलेल्या पुरात दोघे जण वाहून गेले, तर अन्य भागांमध्ये नद्यांकाठची पिके व घरे पाण्याखाली गेली. या पावसाने पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. नगरमधील भंडारदरा धरण ओव्हरफ्लो होऊ न वाहू लागले असून, कोयना धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत, याशिवाय मुंबईला पाणीपुरवठा करणारे अप्पर वैतरणा धरणही भरून वाहू लागले आहे. पुण्याहून सोलापूरसाठी पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी लोकांना स्थलांतर करावे लागले असून, बऱ्याच ठिकाणी रहिवाशांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नाशिकच्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून, सकाळपासून विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे मराठवाड्यासाठी जायकवाडीला पाणी सोडण्यात आले. रामसेतूवरून पुराचे पाणी गेल्याने नाशिककरांचे पारंपरिक पूरमापक असलेली दुतोंड्या मारुतीची मूर्ती पाण्यात बुडाली. गोदावरीच्या काठालगत अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. इगतपुरी तालुक्याच्या भाम, भावली, दारणा, वाकी खापरी धरण परिसरात जाण्यास पर्यटकांना मज्जाव करण्यात आला आहे. नगरचे भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे जलसंपदा विभागाने जाहीर केले. त्यामुळे धरणाचे वक्र दरवाजे उघडत धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली. गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे इंद्रावती व गोदावरी या दोन नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. त्यामुळे नदीकाठच्या ५० पेक्षा अधिक गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
कोल्हापुरात पूरस्थिती गंभीर असून, पंचगंगा नदी ४४.१ फुटांवर गेल्याने पुराचे पाणी अस्ताव्यस्त पसरले आहे. जिल्ह्यातील शेकडो कुटुंबांचे स्थलांतर करावे लागले आहे. ८४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. वारणा, कृष्णा आणि पंचगंगेने रौद्ररूप घेतल्याने अलमट्टी धरणातून विसर्ग वाढविला. सांगली जिल्ह्यातील वारणा, कृष्णा या नद्यांची पूरस्थिती तीव्र होत आहे. कोयना व वारणा धरणातून विसर्ग वाढल्यामुळे दोन्ही नद्यांच्या पाणीपातळीत वेगाने वाढ होत असून, नदीकाळची पिके, घरे पाण्याखाली जात आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवबाग गावाला सागरी अतिक्रमणाचा तडाखा बसला आहे. कर्ली खाडीपात्राचे पाणी गावात घुसले. समुद्राला आलेल्या उधाणामुळे देवबागमधील ख्रिश्चनवाडी, मोबारवाडीला फटका बसला.मोबारवाडीतील २५० गुंठे जमीन समुद्राने गिळंकृत केली आहे.माणगाव खोऱ्यात मुसळधार पावसामुळे आंबेरी निर्मला नदीला पूर आला. त्यामुळे सायंकाळपर्यंत परिसरातील २७ गावांचा संपर्क तुटला. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असून त्यामुळे ठिकठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.
रत्नागिरी जिल्ह्याला पाऊस व वादळी वाऱ्यांनी दणका दिला. या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी पुलावरील वाहतूक आज सकाळी बंद करण्यात आली. या महामार्गावरील बावनदीचे पाणीही सायंकाळनंतर वाढले होते. बावनदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने या मार्गावरील वाहतूक धिम्यागतीने सुरू होती. कशेडी घाटात रायगड जिल्ह्याच्या हद्दीत दरड कोसळल्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. महामार्गावरील वाहतूक विन्हेरे, मंडणगड मार्गे वळवण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात पावसामुळे दोघांना जलसमाधी मिळाली. मारोती व्यंकटी शिळे (ता. नायगाव) व संतोष विनायक राठोड (किनवट) अशी मृतांची नावे आहेत.