कोकणी उत्पादने स्थानकांवर
By admin | Published: March 3, 2015 09:11 PM2015-03-03T21:11:06+5:302015-03-03T22:18:21+5:30
बचत गटांना हातभार : ‘कोकण रेल्वे’ने खरेदी केला ४७ हजारांचा माल
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नत्ती अभियानांतर्गत कोकण रेल्वेने स्टॉलवरील विक्रीसाठी जिल्ह्यातील बचत गटांकडून ४६ हजार ९०० रूपयांचा माल खरेदी केला आहे. भविष्यात खाद्यपदार्थ खरेदी करताना कोणत्याही समस्या येऊ नयेत, यासाठी ‘कोकणरत्न’ बचत गट फेडरेशन स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कोकणी पदार्थ किंवा कोकणी मेवा रेल्वे स्टॉलवर विक्रीसाठी ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार कोकणी पदार्थ कोकण रेल्वे स्थानकातील स्टॉलवर ठेवण्यात येणार आहेत. कोकणी मालाला हक्काची बाजारपेठ मिळावी व ती स्थानिक स्तरावरच उपलब्ध व्हावी, या दोन्ही हेतूंबरोबरच विविध ठिकाणांहून महाराष्ट्रात येणाऱ्या पर्यटकांना महत्त्वाच्या स्थानकांवर कोकणी मेवा उपलब्ध व्हावा यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. त्यांपैकी नेरूळ (नवी मुंबई) येथील एका स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले आहे. काजूगर, कोकम, कुळीथपीठ, मोदकपीठ, भाजणीपीठ, नाचणीपीठ, आंबोळीपीठ, डांगर, कोकम सरबत, आवळा सरबत, आमरस, आंबावडी, आंबा जेली, भंडग, लसूण चटणी, तमालपत्र, मसाले, विविध चटण्या, पापड, हातसडीचे तांदूळ आदींची खरेदी करण्यात आली आहे.खाद्यपदार्थ विक्रीला ठेवताना त्यासाठी आकर्षक पॅकिंग, वेष्टन असणे आवश्यक आहे. मात्र, ते प्रत्येक बचत गटाला जमेलच असे नाही. शिवाय प्रत्येक खाद्यपदार्थाची न्यूट्रीशन्स तपासणी करून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून त्याबाबत पॅकिंगवर माहिती दिल्यास ग्राहकाला खरेदी करणे सोपे होते. शिवाय संबंधित माल मॉल किंवा मुंबई, पुण्यामध्ये विक्रीस पाठवणे सोपे होते. फेडरेशनची स्थापना झाल्यानंतर बचत गटांचा माल खरेदी करून पॅकिंग करून विक्रला ठेवता येईल. शिवाय बचत गटांना खाद्यपदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण देणे सोपे होईल. लागणारे घटक व त्याचे प्रमाण याची माहिती देता येईल. अन्य तांत्रिक माहितीबरोबर स्टॉलकडे बचतगटाचा माल विक्रीसाठी पाठवणे सोपे होणार आहे. (प्रतिनिधी)