कोकण रेल्वेला दरवर्षी तीनशे कोटींचा तोटा

By Admin | Published: February 24, 2015 11:45 PM2015-02-24T23:45:34+5:302015-02-25T00:10:20+5:30

१९९० मध्ये रोहा ते मंगलोर अशा ७६१ किलोमीटरच्या रेल्वेमार्गाची निर्मिती करण्यात आली; पण १९९८ ला कोकण रेल्वे पूर्णत: सुरू झाली, तेव्हा ७४१ किलोमीटरपर्यंतच धावू लागली.

Konkan Railway annually losses of 300 crores | कोकण रेल्वेला दरवर्षी तीनशे कोटींचा तोटा

कोकण रेल्वेला दरवर्षी तीनशे कोटींचा तोटा

googlenewsNext

अनंत जाधव - सावंतवाडी -रोहा ते मंगलोर या १९९० ला मंजुरी मिळालेल्या कोकण रेल्वेचा ७६१ किलोमीटरपैकी २० किलोमीटरचा ठोकूर ते मंगलोर हा भाग दक्षिण रेल्वेने बळकावल्याने कोकण रेल्वेला दरवर्षी ३०० कोटी रुपयांचा तोटा होत आहे. यामुळे कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी रेल्वे मंत्रालयाला परिस्थितीजन्य पुरावे देत हा वीस किलोमीटरचा भाग पुन्हा कोकण रेल्वेला जोडला जावा, अशी मागणी केली आहे. मात्र, तिला रेल्वे मंत्रालयाने केराची टोपली दाखविली आहे. याप्रकरणी बंगलोर येथील उच्च न्यायालयात याचिकाही दाखल झाली आहे.कोकण रेल्वे ही महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व केरळ या चार राज्यांतून धावते. १९९० मध्ये रोहा ते मंगलोर अशा ७६१ किलोमीटरच्या रेल्वेमार्गाची निर्मिती करण्यात आली; पण १९९८ ला कोकण रेल्वे पूर्णत: सुरू झाली, तेव्हा ७४१ किलोमीटरपर्यंतच धावू लागली. या रेल्वेचा ठोकूरपर्यंतचा भाग कोकण रेल्वेत घेण्यात आला, तर पुढील २० किलोमीटरचा भाग दक्षिण रेल्वेने काबीज केला. तत्कालीन रेल्वेचे अधिकारी (पान ८ वर)

कोकणच्या रेल्वेमंत्र्यांकडून अर्थसंकल्पात अपेक्षा
ठोकूर (कर्नाटक) ते मंगलोर बंदरपर्यंतचा भाग सद्य:स्थितीत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यामुळेच मिळू शकतो, अन्यथा हा मार्ग मिळणे कोकण रेल्वेसाठी कठीण आहे. याबाबत कोकण रेल्वेने तत्कालीन रेल्वेचे अधिकारी ई. श्रीधरन यांच्यासह रेल्वे मंत्रालयाशी झालेला करार रेल्वे मंत्रालयाच्या दरबारी ठेवला असून, हा मार्ग कोकण रेल्वेला मिळावा यासाठी कर्नाटक पॅसेंजर असोसिएशनने २०१३ मध्ये बंगलोर उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. रेल्वे अर्थसंकल्पात प्रभू याबाबत काही घोषणा करणार का? याकडे कोकणवासीयांचे लक्ष आहे.आणि कोकण रेल्वे प्रत्यक्षात कृतीत आणणारे ई. श्रीधरन यांनीही १९९८ ला रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहून ठोकूर ते मंगलोर बंदरपर्यंतचा दक्षिण रेल्वेला जोडलेला भाग पुन्हा कोकण रेल्वेला जोडला जावा, अशी मागणी केली होती; पण या मागणीला रेल्वे मंत्रालयाने केराची टोपली दाखवली.दक्षिण रेल्वेने मंगलोरपर्यंतचा वीस किलोमीटरचा भाग आपल्या ताब्यात घेतल्याने कोकण रेल्वेचे दरवर्षी साधारणत: तीनशे कोटींचे नुकसान होत आहे. कोकण रेल्वे स्वत:चे उत्पादन घेईल, अशी कोणतीही उपाययोजना नाही. कोकण रेल्वेच्या ताब्यात सद्य:स्थितीत कोणतेही बंदर नाही. एकमेव मंगलोर बंदरावर दक्षिण रेल्वेने अधिकार सांगितला आहे. याशिवाय डिझेल तसेच रेल्वेभाडे आदी बाबींवर कोकण रेल्वेचे कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. तसेच कोकण रेल्वे सुरू करण्यासाठी घेतलेले कर्ज अद्याप देणे बाकी आहे. यामुळे कोकण रेल्वे आर्थिक अडचणीत असतानाच कोकण रेल्वेला फायदा करून देणारे मंगलोर बंदर तरी आपणास मिळावे, यासाठी कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांची धडपड सुरू आहे.


१६ वर्षांत पाच हजार कोटींचा तोटा
कोकण रेल्वेला ठोकूरपर्यंतचा भाग जोडण्यात आला आहे, तर मंगलोर बंदर दक्षिण रेल्वेने ताब्यात घेतले आहे. त्यामुळे १९९८ ला सुरू झालेल्या कोकण रेल्वेला गेल्या १६ वर्षांत पाच हजार कोटींचा तोटा सहन करावा लागला असून, वर्षाला कोकण रेल्वे सरासरी तीनशे कोटी रुपयांनी तोट्यात आहे.

रोहा ते मंगलोर हा कोकण रेल्वेचा ७६१ किलोमीटरचा पट्टा आहे. मग वीस किलोमीटरचा भाग आम्ही कसा सोडू? त्याच्यावर आमचा दावा असून, मी याबाबत खासदार येदियुरप्पा यांचीही भेट घेऊन हा मार्ग मिळावा, अशी मागणी केली आहे. तसेच रेल्वे मंत्रालयाच्याही संपर्कात आहे.
- भानू प्रकाश तायल, संचालक, कोकण रेल्वे

Web Title: Konkan Railway annually losses of 300 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.