गणेशोत्सवासाठी 4 महिने आधीच कोकण रेल्वे फुल्ल
By Admin | Published: May 9, 2016 11:58 AM2016-05-09T11:58:57+5:302016-05-09T11:58:57+5:30
गणेशोत्सवाला अजून 4 महिने बाकी असतानाच कोकणात जाणा-या रेल्वे गाड्यांचं बुकिंग फुल्ल झालं आहे
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 09 - गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात जाण्याची तयारी करत असाल आणि रेल्वेच तिकीट बुक केलं नसेल तर मग आता दुसरा पर्याय शोधायला घ्या. कारण गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या रेल्वे गाड्यांचं बुकिंग फुल्ल झालं आहे. गणेशोत्सवाला अजून 4 महिने बाकी असतानाच गाड्यांचं आरक्षण झालं आहे.
गणेशोत्सव काळात कोकणात जाणा-यांची संख्या खूप असते. त्यासाठी रेल्वे गाड्यांची संख्यादेखील वाढवलेली असते. ऐन वेळेत गेल्यास जागा मिळत नाही त्यामुळे अनेकजण अगोदरच आरक्षण करुन ठेवतात. 5 सप्टेंबरला जाणा-या रेल्वे तिकीटाची बुकिंग रविवारी सकाळी सुरु करण्यात आली होती. आणि थोड्याच वेळात बुकिंग फुल्ल झालं. काही गाड्यांची वेटिंग लिस्ट तर 500 वर पोहोचली आहे.
3 आणि 4 सप्टेंबरलादेखील कोकणात जाणा-या गाड्यांची बुकिंग फुल्ल झाली आहे. कोकणकन्या, मांडवी एक्स्प्रेस, राज्यराणी एक्स्प्रेस आणि जनशताब्दीसह कोकणात जाणा-या साऱ्याच गाड्या आतापासूनच फुल्ल झाल्या आहेत. रेल्वे फुल्ल झाल्याने प्रवाशांकडे आता एसटी आणि खाजगी बसचा पर्याय शिल्लक आहे. मात्र एसटी बसेसही फुल्ल होत आहेत. प्रवाशांकडे पर्याय नसल्याने खासगी बसेस तिप्पट ते चौपट भाडं आकारतात. त्यामुळे उशिरा जागे झालेल्य़ा प्रवाशांवरील खिशाचा भार वाढणार आहे.