Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या, या तारखेपासून सुरू होणार आरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2023 11:06 AM2023-06-25T11:06:41+5:302023-06-25T11:06:41+5:30
Special Trains Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये, यादृष्टीने मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी मुंबई - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये, यादृष्टीने मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विविध १२ मार्गावर या गाड्या सोडल्या जाणार आहेत, उत्सव काळात १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत या विशेष गाड्या धावणार आहेत.
मुंबई सीएसएमटी ते सावंतवाडी रोड ही विशेष गाड़ी दररोज रात्री १२:२० वाजता सुटेल. ती त्याच दिवशी दुपारी २:२० मिनिटांनी सावंतवाडी रोडला पोहोचेल. परतीच्या प्रवासात सावंतवाडी ते मुंबई सीएसएमटी ही विशेष दैनिक गाडी सावंतवाडी रोड स्थानकातून दररोज दुपारी ३:१० वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी पहाटे ४:३५ वाजता सीएसएमटी स्थानकात पोहोचेल. दिवा जंक्शन ते रत्नागिरी ही मेमू स्पेशल दिवा जंक्शन येथून दररोज सकाळी ७:२० वाजता सुटेल, ती त्याच दिवशी दुपारी २:५५ वाजता रत्नागिरी स्थानकात पोहोचेल.
लोकमान्य टिळक टर्मिनलवरून सुटणाऱ्या गाड्या
लोकमान्य टिळक टर्मिनल ते कुडाळ दरम्यान गणेशोत्सवाच्या काळात दोन्ही दिशेने चोवीस विशेष फेऱ्या होणार आहेत. ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनलवरून रात्री १०:१५ वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी रात्री ९:३० वाजता कुडाळ स्थानकात पोहोचेल. त्याचप्रमाणे मुंबई ते मडगाव ही विशेष दैनिक गाडी १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या दरम्यान सोडण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. करमाळी पनवेल आणि पनवेल- करमाळी ही विशेष साप्ताहिक गाडी २६, २३ आणि ३० सप्टेंबर रोजी सोडण्यात येणार आहे.
पुणे जंक्शन ते करमाळी विशेष साप्ताहिक
पुणे जंक्शन ते करमाळी दरम्यान १५, २२ आणि २९ सप्टेंबर रोजी विशेष साप्ताहिक गाडी सोडण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. ती दर शुक्रवारी सायंकाळी ६:४५ वाजता पुणे जंक्शनहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता करमाळीला पोहोचेल. त्याचप्रमाणे कुडाळ ते पुणे जंक्शन ही विशेष साप्ताहिक गाडी कुडाळ स्थानकातून २७, २४ सप्टेंबर तसेच २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४:०५ वाजता सुटेल. ही गाडी त्यादरम्यानच्या स्थानकात थांबेल.