‘कोकण सम्राट’ रॉकिंग!
By admin | Published: June 9, 2015 03:30 AM2015-06-09T03:30:26+5:302015-06-09T03:30:26+5:30
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी शोधलेल्या साकाविरहित आणि दरवर्षी हमखास उत्पादन देणाऱ्या ‘कोकण सम्राट’ या आंबा कलमांना राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
शिवाजी गोरे, दापोली
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी शोधलेल्या साकाविरहित आणि दरवर्षी हमखास उत्पादन देणाऱ्या ‘कोकण सम्राट’ या आंबा कलमांना राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. मात्र, कृषी विद्यापीठाच्या वेंगुर्ले व दापोली फळ संशोधन केंद्रात कोकण सम्राट कलमाची रोपे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना अजून पाच ते दहा वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कोकण कृषी विद्यापीठाच्या वेंगुर्ले फळसंशोधन केंद्रातील डॉ. भरत साळवी, डॉ. अविनाश शिंदे, डॉ. मुराद बुरोंडकर या शास्त्रज्ञांनी १९९७मध्ये साकाविरहित आणि दरवर्षी हमखास उत्पादन देणाऱ्या जातीच्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरू केले. तब्बल १६ वर्षांच्या अथक प्रयत्नांती त्यांना यश आले. हापूस व इस्रायली जातीच्या टॉमी अॅटकिन्स या दोन जातीच्या संकरातून ‘कोकण सम्राट’ ही जात विकसित करण्यात आली. हंगामाच्या सुरुवातीला मराठवाडा, विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकणातून कोकण सम्राटला प्रचंड मागणी आहे.
हापूसमधील उणिवा दूर
हापूसमधील साका व एक वर्ष आड पीक येणे हे हापूसमधील दोष कोकण सम्राटमध्ये आढळत नाहीत. कोकण सम्राटच्या जातीला दरवर्षी आंबे लागतील आणि त्यामध्ये साका धरणार नाही.
वाणाची वैशिष्ट्ये
> फळे मध्यम आकाराची २८४.५० ग्रॅम, गराचे प्रमाण ७३.२८ टक्के आहे. एकूण विद्राव्य घटकाचे प्रमाण २०.३० ब्रिक्स आहे. फळाची आम्लता ०.२५ टक्के असून, या वाणामध्ये संयुक्त फुलांचे प्रमाण २७.५२ टक्के आहे.
> हापूस आणि वाण असलेला दुसरा संकर आणि परदेशी मादीवाण असलेला हा पहिला संकर आहे.
> फायबरचे प्रमाण कमी व चव गोड, रंग आकर्षक
> फळमाशी, करपा, बुरशी या रोगांचा फारसा परिणाम होत नाही.
‘लोकमत’ने पोहोचवला राज्यभर
‘हापूसमधील उणिवा दूर करणारा कोकण सम्राट विकसित’ अशा स्वरूपाची बातमी ‘लोकमत’मध्ये २० आॅगस्ट २०१४ रोजी राज्यभर प्रसिद्ध झाली होती. या बातमीची दखल घेऊन त्याच दिवशी औरंगाबाद, लातूर, बीडपासून अनेक जिल्ह्यांमधून ‘कोकण सम्राट’ची माहिती विचारणारे दूरध्वनी ‘लोकमत’कडेही आले.