कोकणची राखरांगोळी होऊ देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 04:54 AM2018-04-24T04:54:35+5:302018-04-24T04:54:35+5:30
कोकण हा निसर्गरम्य आहे. मात्र कोकणात विनाशकारी प्रकल्प आणून या भूमीची राख करण्याचे षडयंत्र रचले असून शिवसेना त्याला विरोध करील.
राजापूर (जि. रत्नागिरी) : रिफायनरीसारखे कोकणची राखरांगोळी करणारे प्रकल्प लादण्याचे प्रयत्न झाले तर ते अजिबात खपवून घेणार नाही. प्रसंगी हातात कायदा घेवून शासनाला अद्दल शिकविल्याशिवाय राहणार नाही’, असा हल्लाबोल शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला.
सोमवारी उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत सागवे येथील कोचाळी मैदानावर नाणार रिफायनरी प्रकल्पग्रस्तांसाठी सभा झाली. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी रिफायनरी प्रकल्पाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करीत असल्याची घोषणा केली. उपस्थितांनी त्याचे जोरदार स्वागत केले. देसाई यांच्या त्या घोषणेचा आधार घेवून पक्षप्रमुख ठाकरे यांनी शासनावर जोरदार टीका केली.
कोकण हा निसर्गरम्य आहे. मात्र कोकणात विनाशकारी प्रकल्प आणून या भूमीची राख करण्याचे षडयंत्र रचले असून शिवसेना त्याला विरोध करील. मुख्यमंत्र्यांनी गुजरात अथवा नागपूर, हवा तिकडे हा प्रकल्प न्यावा. पण असा विनाशकारी प्रकल्प कोकणात नको. उद्योगमंत्र्यांनी ती अधिसुचना रद्द केल्याची घोषणा केली आहे. आता येथील भूमीत तो प्रकल्प होणार नाही. नाणार परिसरातील शेतकरीबांधव, बागायतदार, मच्छीमार यांना देशोधडीला लावून कोकणचा विकास नको आहे, असे ठाकरे म्हणाले. नाणार परिसरात मोदी, शहा, जैन अशी मंडळी कधीच वास्तव्याला नसताना मग आताच ही मंडळीआली कोठून? परप्रांतातील मंडळींना अगोदर प्रकल्पाची माहिती कशी मिळाली? असे सवाल उपस्थित करीत त्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला. यावेळी रिफायनरीविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष कमलाकर कदम, मज्जीद भाटकर, नाणारचे सरपंच ओमकार प्रभुदेसाई, भाई सामंत यासहित प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांना कुणी विचारत नाही
जर स्थानिकांचा विरोध असेल तर प्रकल्प लादणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिले होते. मात्र केंद्र्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सौदी अरेबियाशी सामंजस्य करार केला. त्यावरुन मुख्यमंत्र्यांना कुणीच विचारीत नाही व त्यांच्या शब्दाला दिल्लीत कवडीचीही किंमत नसल्याची टीका उध्दव ठाकरे यांनी केली.