कोकणातील गणेशभक्तांना टोलमाफी!
By admin | Published: August 7, 2015 01:50 AM2015-08-07T01:50:57+5:302015-08-07T01:50:57+5:30
कोकणात गणेशोत्सवाकरिता जाणाऱ्या गणेशभक्तांच्या खासगी वाहनांच्या रांगा टोलनाक्यावर लागून वाहतूक खोळंबा होऊ नये याकरिता १३ ते १६ सप्टेंबर या काळात गणेशभक्तांना टोलमाफी देण्यात येईल
मुंबई : कोकणात गणेशोत्सवाकरिता जाणाऱ्या गणेशभक्तांच्या खासगी वाहनांच्या रांगा टोलनाक्यावर लागून वाहतूक खोळंबा होऊ नये याकरिता १३ ते १६ सप्टेंबर या काळात गणेशभक्तांना टोलमाफी देण्यात येईल, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली.
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या एसटी बस व खासगी गाड्या यांना पुरवायच्या सेवासुविधांबाबत सर्व संबंधित मंत्र्यांची गुरुवारी बैठक झाली. त्यानंतर रावते यांनी निर्णयांचा माहिती दिली. रावते म्हणाले की, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी याबाबत चर्चा करून निर्णय घेतला आहे. तसेच याच कालावधीत मुंबईपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत ट्रक, कंटेनर अशा अवजड वाहनांची वाहतूक बंद केली जाणार आहे. रावते म्हणाले की, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांकरिता यंदा एसटीच्या २३५० बसगाड्या सोडण्यात येतील. ६० ते ७० हजार खासगी वाहने याच कालावधीत कोकणात जातात. यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते. ही कोंडी टाळण्याकरिता वाहतूक पोलिसांच्या सायरन असलेल्या गाड्यांसोबत एसटी वाहतूक केली जाईल.
यंदा कुंभमेळा व गणेशोत्सव एकाचवेळी आहे. त्यामुळे कुंभमेळ्याकरिता लोकांना सोडायला गेलेल्या १४०० एसटी बस वाहतूक पोलिसांच्या देखरेखीखाली १३ तारखेला मुंबईत आणण्यात येतील व त्यानंतर त्या कोकणाकडे सोडण्यात येतील. ज्या दिवशी नाशिकमधून या एसटी बस आणण्यात येतील त्या दिवशी नाशिक-मुंबई रस्त्यावरील अवजड वाहतूक बंद केली जाईल, असे रावते यांनी सांगितले.