कोपर्डे हवेलीच्या चवळीला मुंबईत भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 11:12 AM2018-10-06T11:12:00+5:302018-10-06T11:12:39+5:30
क-हाड तालुक्यातील कोपर्डे हवेली (जि. सातारा) येथील शेतकरी मधुकर चव्हाण यांनी संकरित चवळीचे पीक घेतले असून, या शेंगेला मुंबईच्या बाजारपेठेत चांगला भाव मिळत आहे.
शंकर पोळ (कोपर्डेहवेली, सातारा)
कमी खर्चात जादा उत्पादन देणारी माळव्याची पिके शेतकरी घेतात. कधी दर मिळतो, तर कधी दराअभावी उत्पादन खर्चही निघत नाही, तर कमी खर्च करून घेतलेली पिकेही फायद्याची ठरतात. असेच पीक क-हाड तालुक्यातील कोपर्डे हवेली (जि. सातारा) येथील शेतकरी मधुकर चव्हाण यांनी घेतले. त्यांनी संकरित चवळीचे पीक घेतले असून, या शेंगेला मुंबईच्या बाजारपेठेत चांगला भाव मिळत आहे.
कोपर्डे हवेली येथील मधुकर चव्हाण यांनी कमी खर्चाचे व कमी दिवसांत जादा उत्पादन देणाऱ्या चवळीचे पीक घेतले आहे. २५ गुंठे क्षेत्रावर या पिकाची लागवड करण्यात आली असून, अंतर्गत भुईमुगाचे पीक आहे. साडेचार फुटी सरीत जूनच्या पहिल्या आठवड्यात संकरित चवळीचे टोकण केले. वेल दोन फुटांचे झाल्यानंतर ते तारेवर चढवले. ६५ दिवस पूर्ण झाल्यानंतर चवळीचे तोडे सुरू झाले. एका चवळी शेंगेची लांबी दीड ते दोन फुटांची असून, गडद हिरव्या रंगाची शेंग आहे.
या शेंगा विक्रीसाठी मुंबईच्या बाजारपेठेत पाठवल्या जातात. एका पेंढीत ४० ते ४५ शेंगा बसतात. एक दिवसाआड करून त्याचे तोडे सुरू आहेत. २५० ते ३०० किलो शेंगा मिळतात. इतर माळव्याच्या पिकाच्या तुलनेत चवळीला बरा दर मिळत आहे. सध्याचा दर मुंबई बाजारपेठेत दहा किलोला साधारणपणे २०० ते २५० रुपये आहे. त्यामुळेच ही चवळी मार्के टमध्ये चांगला भाव खात आहे. आतापर्यंत चव्हाण यांचे चवळीचे चार तोडे झाले आहेत. एका तोड्याचा खर्च जाऊन चार ते साडेचार हजार रुपये मिळाले आहेत.
चवळीच्या पिकाचा कालावधी पाच महिन्यांचा आहे. १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर चवळीच्या उत्पादनात वाढ होणार आहे. महिन्याला ६० हजारांचे उत्पन्न धरले, तर पाच महिन्यांत अंदाजे तीन लाख होतात. खर्च वजा करता चव्हाण यांना अडीच लाखांचा नफा होऊ शकतो. आतापर्यंत १५ हजार रुपये उत्पादन खर्च झाला आहे. या परिसरात संकरित चवळीच्या शेंगांचे प्रथमच उत्पादन घेतले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी भेटी देत आहेत. अनेकांनी माहिती घेऊन आपल्या जमिनीत चवळी शेंगेचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या भागात चवळीचे आणखी क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.
चवळीच्या शेंगेला मागणी वाढली असून, साधारणपणे २५ ते ३० रुपये किलो दराने चवळी बाजारात विक्री होत आहे. नाशिक, अकोला जिल्ह्यातील चवळीचे पीक सातारा जिल्ह्यात आले असून, वातावरण पोषक असल्याने भविष्यात या पीक क्षेत्रात वाढ होणार आहे. चवळीच्या शेंगांचे उत्पादन पहिल्यांदाच घेतले असून, मुंबई बाजारपेठेत इतर पिकांच्या तुलनेत जादा दर मिळत आहे, शेंगा भरपूर आहेत, असाच दर राहिला तर खर्च वजा जाता पाच महिन्यांत दोन ते अडीच लाखांचा नफा अपेक्षित आहे, असे मधुकर चव्हाण यांनी सांगितले.