कोपर्डी खटला: मुख्यमंत्र्यांच्या निवेदनाची सीडी न्यायालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 03:51 AM2017-09-05T03:51:42+5:302017-09-05T03:51:56+5:30
कोपर्डी खटल्यातील आरोपीच्या भावाने केलेल्या विनंतीवरून माध्यमांत प्रसारित झालेल्या बातम्यांच्या तयार केलेल्या सीडी बचाव पक्षाचे साक्षीदार रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी न्यायालयात सादर केल्या.
अहमदनगर : कोपर्डी खटल्यातील आरोपीच्या भावाने केलेल्या विनंतीवरून माध्यमांत प्रसारित झालेल्या बातम्यांच्या तयार केलेल्या सीडी बचाव पक्षाचे साक्षीदार रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी न्यायालयात सादर केल्या. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री विनोद तावडे, विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियावर कोपर्डी संदर्भात दिलेल्या निवेदनाचे व्हिडीओ असलेल्या सीडींचा समावेश आहे.
भवाळ याला कायदेशीर मदत व्हावी, या उद्देशातून या सीडी तयार केल्याची साक्ष बचाव पक्षाचे साक्षीदार रवींद्र चव्हाण यांनी न्यायालयात दिली़ कोपर्डी खटल्याची येथील जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सोमवारी चव्हाण यांची सरतपासणी व उलट तपासणी झाली़ भवाळ याचे वकील बाळासाहेब खोपडे यांनी चव्हाण यांची सरतपासणी घेतली़ त्यानंतर सरकारी पक्षातर्फे अॅड़ निकम यांनी उलट तपासणी घेतली़
कोपर्डी येथील घटनेनंतर आरोपी संतोषचा भाऊ बाळू भवाळ याने तुमच्याकडे कोणती मदत मागितली, या अॅड. निकम यांच्या प्रश्नावर चव्हाण यांनी न्यायालयात सांगितले की, भवाळ याने आर्थिक मदत व रोजगार देण्याची तसेच कायदेशीर मदत मागितली होती़ त्यानंतर माध्यमांत प्रसारित झालेले वार्तांकन हे ‘यू ट्यूब’वरून डाऊनलोड करून त्याच्या सीडी तयार केल्या. बचाव पक्षाने दिलेल्या सीडीपैकी एका सीडीतील व्हिडीओ न्यायालयात दाखविला़ त्यात अॅड़ निकम हे एका चॅनेलवर बोलताना दिसत आहेत़ हा व्हिडीओ एडिट केल्याचा दावा निकम यांनी केला़ पुढील सुनावणी १६ सप्टेंबर रोजी होणार आहे़