कोपर्डी खटला - नोेंदवही नसल्याने सुनावणी स्थगित
By admin | Published: December 24, 2016 04:42 AM2016-12-24T04:42:17+5:302016-12-24T04:42:17+5:30
कोपर्डी खटल्यात शुक्रवारी सरकारी पक्षातर्फे कुळधरण ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांची साक्ष नोंदविण्यात आली़ मात्र,
अहमदनगर : कोपर्डी खटल्यात शुक्रवारी सरकारी पक्षातर्फे कुळधरण ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांची साक्ष नोंदविण्यात आली़ मात्र, उलटतपासणीदरम्यान आरोपी पक्षाकडून रुग्णालयात रुग्ण आणल्यानंतर नोंद केली जाणाऱ्या नोंदवहीची मागणी करण्यात आल्याने पुढील सुनावणी स्थगित करावी लागली़ .
कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून खटल्याची जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या न्यायालयासमोर सुनावणी सुरू आहे़ शुक्रवारी या खटल्यातील साक्षीदार असलेले डॉक्टर व पीडित मुलीच्या वर्गशिक्षकांची साक्ष होणार होती़ सरकारी पक्षातर्फे अॅड़ उज्ज्वल निकम यांनी डॉक्टरची साक्ष नोंदविली़ या वेळी डॉक्टरांनी न्यायालयात सांगितले की, सदर अत्याचारित मुलीस कुळधरणच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच ती मृत झाली होती़ तिच्या अंगावर जखमा होत्या तसेच हातांनाही मार लागलेला होता. या डॉक्टरांच्या उलटतपासणीदरम्यान आरोपी क्रमांक २ संतोष भवाळ याचे वकील अॅड़ बाळासाहेब खोपडे यांनी रुग्णालयात रुग्ण दाखल केल्यानंतर केल्या जाणाऱ्या नोंदीचे रजिस्टर दाखविण्याची मागणी केली़ डॉक्टरांनी हे रजिस्टर न्यायालयात आणले नसल्याने अॅड़ खोपडे यांनी रजिस्टर असल्याशिवाय साक्षीदाराची उलटतपासणी घेता येणार नसल्याचे न्यायालयाला सांगितले़ (प्रतिनिधी)