कोपर्डी खटला -फिर्यादीने ओळखली आरोपीची दुचाकी
By admin | Published: December 23, 2016 04:36 AM2016-12-23T04:36:08+5:302016-12-23T04:36:08+5:30
बहुचर्चित कोपर्डी अत्याचार व खून खटल्यातील न्यायालयात सादर केलेली आरोपीची दुचाकी व पीडित मुलीची लाल रंगाची
अहमदनगर : बहुचर्चित कोपर्डी अत्याचार व खून खटल्यातील न्यायालयात सादर केलेली आरोपीची दुचाकी व पीडित मुलीची लाल रंगाची सायकल फिर्यादीने गुरूवारी जिल्हा न्यायालयात उलटतपासणीदरम्यान ओळखली़ पीडित मुलीचा शोध घेण्यासाठी बॅटरीचा वापर केल्याची नवीन माहिती यावेळी फिर्यादीने दिली़
कोपर्डी खटल्याची जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे़ सुनावणीचा गुरुवारी तिसरा दिवस होता़ या खटल्यातील मुख्य फिर्यादीची साक्ष विशेष सरकारी वकील अॅड़ उज्ज्वल निकम यांनी बुधवारी नोंदविली होती़ त्याआधारे आरोपीचे वकील अॅड़ योहान मकासरे यांनी फिर्यादीची उलटतपासणी घेतली़ आरोपीच्या वकिलाने घटना घडली, त्या जागेबाबतही फिर्यादीची उलट तपासणी घेतली़ घटना घडलेली जागा हीच आहे काय? पीडित मुलगी कुठे होती? आरोपीचा पाठलाग कुठून सुरू केला? असे काही मुद्दे उपस्थित झाले़ त्याची उत्तरेही फिर्यादीने दिली. ज्यावेळी पीडित मुलीला कुळधरण येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले, त्यावेळी डॉक्टरांनी काय झाले, असे विचारले होते़ त्यांना घटनेची माहिती दिली़ डॉक्टरांना माहिती देताना पीडित मुलीची बहिणही उपस्थित होती. काही वेळानंतर डॉक्टरांनी पीडित मुलीला मयत घोषित केले, अशी दुसरी नवीन माहिती फिर्यादीने दिली. (प्रतिनिधी)