कोपर्डी - खटला दुसऱ्या जिल्ह्यात चालवा
By admin | Published: November 10, 2016 06:34 AM2016-11-10T06:34:38+5:302016-11-10T06:34:38+5:30
कोपर्डी अत्याचार व खून खटल्यातील तिघा आरोपींविरोधात बुधवारी जिल्हा न्यायालयात अल्पवयीन मुलीवर कट रचून अत्याचार व खून केल्याचा दोषारोप निश्चित करण्यात आला़
अहमदनगर : कोपर्डी अत्याचार व खून खटल्यातील तिघा आरोपींविरोधात बुधवारी जिल्हा न्यायालयात अल्पवयीन मुलीवर कट रचून अत्याचार व खून केल्याचा दोषारोप निश्चित करण्यात आला़ तिसरा आरोपी नितीन भैलुमेने खटला दुसऱ्या जिल्ह्यात चालवावा, अशी मागणी केली. याबाबत उच्च न्यायालयात अर्ज करण्याचे जिल्हा न्यायालयाने स्पष्ट केले़
कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून खटल्याची जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे़ बुधवारी दोषारोप ठेवलेल्या जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे, संतोष गोरख भवाळ व नितीन गोपीनाथ भैलुमे (तिघे रा़ कोपर्डी, ता़ कर्जत) यांच्याविरोधात कट करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून केल्याचा दोषारोप निश्चित करण्यात आला़ आरोपींना जिल्हा न्यायालयात आणतेवेळी त्यांना मारहाण, शिवीगाळ व धमकी देण्याचे प्रकार झाल्याने खटला दुसऱ्या जिल्ह्यात चालवावा, अशी मागणी भैलुमेचे वकील प्रकाश आहेर यांनी केली. भैलुमेच्या घराला पोलिसांनी टाळे लावल्याने उच्च न्यायालयात व इतर कामकाजास लागणारी कागदपत्रे घेता आली नाहीत़ त्यामुळे हे घर पोलिसांनी उघडून द्यावे, अशी मागणी आहेर यांनी केली़ त्यावर सरकारी पक्षातर्फे अॅड़ उज्ज्वल निकम यांनी भूमिका स्पष्ट करत न्यायालयासमोर तपास अधिकाऱ्यांचे प्रतिज्ञापत्र सादर केले. भैलुमे याच्या घराला कसलेही टाळे लावले नसल्याचे सांगितले़ (प्रतिनिधी)
सुनावणी तहकूब आरोपी भैलुमे याला खटल्यातून वगळावे यासाठी उच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे़ तसेच त्याचे रेशन कार्ड व शैक्षणिक कागदपत्र घेणे बाकी असल्याचे त्याच्या वकिलांनी सांगितल्यानंतर जामीन अर्जावरील सुनावणी तात्पुरती स्थगित केली आहे़
खटल्याची २० ते २३ डिसेंबर सुनावणी होणार असून, सरकारी पक्षाच्या वतीने १६ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या जाणार आहेत़
भैलुमेचे वकील आहेर यांनी तपासादरम्यान कर्जत पोलीस व तपास अधिकाऱ्यांनी त्याच्या नातेवाइकांना गावातून हाकलल्याचा आरोप केला़ खटल्यात खोटी साक्ष देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे सांगितले़ मात्र सरकारी पक्षाच्या वतीने अॅड़ निकम यांनी हा साक्षीदारांना धमकाविण्याचा प्रकार असल्याचा युक्तिवाद करत आहेर यांच्या मुद्द्याला विरोध केला़