कोपरखैरणेच्या ‘त्या’ महिलेचा गर्भपात
By admin | Published: February 13, 2017 03:48 AM2017-02-13T03:48:51+5:302017-02-13T03:48:51+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केईएम रुग्णालयात अर्भकात व्यंग असल्याने, २४ आठवड्यांनंतर कोपरखैरणेतील ‘त्या’ महिलेचा गर्भपात करण्यात आला.
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केईएम रुग्णालयात अर्भकात व्यंग असल्याने, २४ आठवड्यांनंतर कोपरखैरणेतील ‘त्या’ महिलेचा गर्भपात करण्यात आला. या प्रकरणात महिलेच्या अर्भकाला दोन्ही मूत्रपिंडे नव्हती, त्यामुळे महिलेने गर्भपाताच्या परवानगीसाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.
२० आठवड्यांनंतर गर्भपात करण्यापूर्वी महिलेची प्रकृती स्थिर असणे आवश्यक असते. त्यामुळे प्राथमिक तपासणी आणि वैद्यकीय चाचण्यांनंतर गर्भपात केला जातो, अशी माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
जन्मलेले अर्भक ६८० ग्रॅम वजनाचे होते. तपासणीत अर्भकाची दोन्ही मूत्रपिंडे नसल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती डॉ. सुपे यांनी दिली. केईएम रुग्णालयातील २०१७ या वर्षातील २० आठवड्यानंतरचा हा दुसरा गर्भपात करण्यात आला. या महिलेची प्रकृती स्थिर असून, तिला शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. असेही डॉक्टरांनी सांगितले. (प्रतिनिधी)