कोरेगाव भीमा प्रकरण : ‘एल्गार’मधील भाषणांमुळे दंगल भडकली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 05:42 AM2018-11-06T05:42:03+5:302018-11-06T05:44:57+5:30
पुण्यात आयोजित केलेल्या एल्गार परिषदेतील भाषणे जनसमुदायात प्रक्षोभ वाढविणारी होती. त्याची परिणती कोरेगाव भीमा हिंसाचारात झाल्याचे प्रतिज्ञापत्र पुण्याचे अप्पर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगांवकर यांनी चौकशी आयोगाकडे शुक्रवारी सादर केले.
मुंबई - पुण्यात आयोजित केलेल्या एल्गार परिषदेतील भाषणे जनसमुदायात प्रक्षोभ वाढविणारी होती. त्याची परिणती कोरेगाव भीमा हिंसाचारात झाल्याचे प्रतिज्ञापत्र पुण्याचे अप्पर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगांवकर यांनी चौकशी आयोगाकडे शुक्रवारी सादर केले.
कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने चौकशीसाठी अनेक बड्या पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार रवींद्र सानेगांवकर (पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर) यांनी चौकशी आयोगात प्रतिज्ञापत्र सादर केले. सुरुवातीला या हिंसाचाराला समता हिंदू आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांना जबाबदार ठरवून, त्यांच्यावर गुन्हा नोंदविणाºया पुणे पोलिसांनी भूमिकेत बदल करत, आता घटनेला एल्गार परिषदेतील प्रक्षोभक भाषणांना जबाबदार ठरविले आहे.
देशात घटनेद्वारे प्रस्थापित लोकशाही शासन व्यवस्था हिंसेच्या जोरावर उलथवून टाकण्यासाठी देशव्यापी मोठे कट कारस्थान माओवादी संघटनेने आखले आहे. त्यांनी आखलेल्या पूर्वनियोजित कटाच्या अनुषंगाने या गुन्ह्यातील आरोपींचे कामकाज सुरू आहे. या संघटनेने व संघटनेच्या काही सदस्यांनी सदर गुन्ह्याचा कट केल्याचे दिसून येते आणि एल्गार परिषदेचे आयोजन म्हणजे, या कटाचाच एक भाग आहे, असे सानेगांवकर यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
बंदोबस्तासाठी पुरेसे पोलीसबळ होते
एल्गार परिषदेमधील वक्त्यांची भाषणे, वक्तव्य व इतर कार्यक्रम आक्षेपार्ह, भडक व प्रक्षोभक होते. त्यामुळे कायदा व सुव्यस्थेची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आणि त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले, असेही प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. कोरेगाव भीमामध्ये बंदोबस्तासाठी पुरेसे पोलीसबळ उपस्थित नव्हते, असे साक्षीदारांनी आयोगापुढे सांगितले. त्यांचा हा आरोप पोलिसांनी फेटाळला.